पैसे, मोबाईल रिचार्जचे आमिष दाखवून मुलावर लैंगिक अत्याचार

सलग तीन वर्षे कुकृत्य; सेल्फ डिफेन्स ट्रेनरसह दोघांवर गुन्हा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd December 2022, 12:01 Hrs
पैसे, मोबाईल रिचार्जचे आमिष दाखवून मुलावर लैंगिक अत्याचार

पणजी : पैसे, चाॅकलेट व मोबाईल रिचार्जचे आमिष दाखवून डिचोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलावर तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी महिला पोलिसांनी सेल्फ डिफेन्स ट्रेनरसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित न्यायालयीन कोठडीत असून पोलिसांनी दुसऱ्या संशयिताला शुक्रवारी अटक केली आहे.
एका बिगर सरकारी संस्थेच्या सदस्यांनी वरील प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, संशयित सेल्फ डिफेन्स ट्रेनरने एका अल्पवयीन मुलावर, तो १४ वर्षांचा असल्यापासून मागील ३ वर्षे लैंगिक अत्याचार करत होता. पैसे, चाॅकलेट व मोबाईल रिचार्जचे आमिष दाखवून त्याच्यावर हा अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच ट्रेनरच्या साथीदाराने पीडित मुलाला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून त्याच्यावर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ काढल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
वरील तक्रारीनुसार, महिला पोलीस स्थानकाच्या निरीक्षक संध्या गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रसाई शेट्ये यांनी संशयित ट्रेनरसह आणखी एका संशयिताच्या विरोधात गोवा बाल कायदा, बाल लैंगिक शोषणविरोधी कायदा २०१२ (पॉक्सो) कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सेल्फ डिफेन्स ट्रेनरवरील हा चौथा गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या संशयिताविरोधातील हा पहिला गुन्हा आहे. दरम्यान, दुसऱ्या संशयिताला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडीसाठी शनिवारी प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.