इंग्लंड सलग दुसऱ्यांदा बाद फेरीत

फिफा विश्वचषक : वेल्सचा ३-० ने पराभव; मार्कस रॅशफोर्डचे दोन गोल

|
30th November 2022, 11:11 Hrs
इंग्लंड सलग दुसऱ्यांदा बाद फेरीत

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
दोहा :
फिफा विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी इंग्लंडने वेल्सला ३-० ने पराभूत केले. मार्कस रॅशफोर्ड (५०, ६८व्या) आणि फिल फोडेन (५१व्या) यांनी केलेल्या गोलने विजय खेचून आणला. १९६६चा चॅम्पियन इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा बाद फेरी गाठली आहे. इंग्लंड आणि वेल्सला पूर्वार्धात एकही गोल करता आला नाही. पण उत्तरार्धात इंग्लंडने दोन मिनिटांत दोन गोल करत सामन्याचे चित्रच पालटले.
रॅशफोर्ड याने ५०व्या मिनिटाला फ्री किकवर केलेल्या गोलने १-० अशी आघाडी झाली. त्यानंतर बॉक्समध्ये हैरी केनच्या पासवर फोडेन याने मारलेल्या दमदार शॉटने २-० अशी आघाडी मिळवून दिली. दोन गोलने पिछाडीवर पडललेल्या वेल्सचा बचाव फळी ढासळू लागली. याचा फायदा घेत रॅशफोर्ड याने ६८ व्या मिनिटांला आपल्या नावावर दुसऱ्या तर संघाच्या तिसऱ्या गोलची कमाई केली.
केल्विन फिलिप्सने दिलेल्या पासवर मँचेस्टर युनायटेडच्या खेळाडूने संधीचे सोने केले. विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील इंग्लंडचा हा १०० वा गोल होता. ५६ व्या मिनिटांला डेन जेम्सने वेल्ससाठी गोल करण्याचा प्रयत्न केला. किफर मूरनेही अयशस्वी प्रयत्न केला. पहिल्या हाफमध्ये वेल्सने कडवी झुंज दिली पण दुसऱ्या हाफमध्ये गेरेथ बेलच्या बदलीनंतर वेल्स कमकुवत झाला तर इंग्लंड मात्र अधिक आक्रमक बनला.
दरम्यान, हॅरी केनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने बाद फेरी गाठली. संघाने दोन विजय आणि एक बरोबरी साधून ७ गुण मिळवले आणि राऊंड ऑफ १६ फेरीत दिमाखात प्रवेश केला. त्यांनी पहिल्या सामन्यात इराणचा ६-२ आणि तिसऱ्या सामन्यात वेल्सचा ३-० गोलफरकाने पराभव केला. अशाप्रकारे इंग्लिश संघाने पहिल्या फेरीअखेर प्रतिस्पर्धी संघांवर ९ गोल केले असून त्यातील ७ गोल हे चार कृष्णवर्णीय खेळाडूंनीच डागले आहेत.

वेल्सने चार गोलांच्या फरकाने मात केली असती तर इंग्लंडचा संघ अंतिम-१६ च्या शर्यतीतून बाहेर गेला असता. पण, इंग्लंडने वेल्सची एकतर्फी धुलाई केली. १९५८ नंतर प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळणारा वेल्स बाहेर पडला. इंग्लंड आणि वेल्स यांच्यातील हा सातवा सामना होता, त्यात इंग्लंडने सहावा सामना जिंकला. एक सामना अनिर्णित राहिला.

कृष्णवर्णीय खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार
फिफा विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाची पहिल्या फेरीतील कामगिरी चमकदार राहिली असून संघाच्या दोन विजयात कृष्णवर्णीय खेळाडूंनी सिंहाचा वाटा उचलला आहे. मार्कस रॅशफोर्ड, ज्यूड बेलिंगहॅम, बुकायो साका, रहीम स्टर्लिंग यांनी नेत्रदीपक खेळ करून कधीकाळी आपल्यावर वर्णभेदाची टीप्पणी करणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
युरो कप २०२० च्या अंतिम सामन्यात इंग्लंडला इटलीविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर कृष्णवर्णीय असणाऱ्या रॅशफोर्ड, सांचो आणि साका यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. त्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये तिघांनाही गोलजाळे भेदता आले नव्हते आणि त्यामुळे इंग्लिश संघाचा पराभव झाला होता. त्यानंतर इंग्लंडचे चाहते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून संघातील रॅशफोर्ड, सांचो आणि साका यांच्याविरोधात मोर्चा उघडला. अनेकांनी तर वर्णभेदाची टिप्पणी करून तिन्ही खेळाडूंचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला.
पण, हे खेळाडू आपल्यावरील टीकेने खचले नाहीत. त्यांनी पुन्हा नव्या जोमाने आपल्या कर्मभूमीच्या विजयासाठी जीवाचे रान करण्याचा चंग बांधला. सध्या सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप सामन्यात हेच कृष्णवर्णीय खेळाडू इंग्लिश संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरत आहेत.

गोल करणारे इंग्लंडचे कृष्णवर्णीय खेळाडू
मार्कस रॅशफोर्ड : ३ गोल (इराणविरुद्ध १, वेल्सविरुद्ध २)
बुकायो साका : २ गोल (इराणविरुद्ध)
ज्यूड बेलिंगहॅम : १ गोल (इराणविरुद्ध)
रहीम स्टर्लिंग : १ गोल (इराणविरुद्ध)