अकरा महिन्यांपूर्वीचा ड्रग्ज ‘निगेटिव्ह’; नायजेरियन निर्दोष

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th November 2022, 11:49 Hrs
अकरा महिन्यांपूर्वीचा ड्रग्ज ‘निगेटिव्ह’; नायजेरियन निर्दोष

पणजी : अकरा महिन्यांपूर्वी गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) एलएसडी म्हणून जप्त केलेल्या द्रव पदार्थाचा प्रयोगशाळेतील अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नायजेरियन नागरिकाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. तो द्रवपदार्थ ड्रग्ज नसल्याचे आता अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
एएनसीने १५ डिसेंबर २०२१ रोजी उत्तररात्री १.२५ ते १६ डिसेंबर २०२१ रोजी पहाटे ४.३५ या कालावधीत मुड्डीजोर-हणजूण येथील एका भाड्याच्या खोलीवर छापा मारला होता. त्यावेळी पथकाने चार्ल्स याची ताब्यात घेऊन चौकशी केली होती. शिवाय पथकाने त्याच्याकडून ३.८६ लाख रुपये किमतीचे ३.८६ ग्रॅम द्रवपदार्थ जप्त केला होता. त्याचवेळी पथकाने द्रवपदार्थाची ‘ड्रग्ज डिटेन्शन किट’द्वारे चाचणी केली असता ते ‘एलएसडी’ असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर या प्रकरणी विद्यमान पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी अमली पदार्थविरोधी कायद्याचे कलम २२(क) अंतर्गत गुन्हा दाखल करून चार्ल्स याला रीतसर अटक केली होती. त्यानंतर संशयिताला म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर तो न्यायालयीन कोठडी होता. याच दरम्यान पथकाने तपास पूर्ण करून ९ जून २०२२ रोजी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात संशयिताच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

एएनसीने जप्त केलेल्या एलएसडीचे रासायनिक विश्लेषण करण्यासाठी संबंधित द्रवपदार्थ वेर्णा येथील राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवला होता. या प्रयोगशाळेने केलेली चाचणी ‘निगेटिव्ह’ आली. अर्थात तो द्रव ड्रग्ज नसल्याचे स्पष्ट झाले. याची दखल घेऊन उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयित चार्ल्स याची निर्दोष सुटका केली आहे. हा निवाडा न्या. एडगर फर्नांडिस यांनी जारी केला आहे.