‘हुप, हुप करी, वरचे डोंगरी...!’

शेवटी हे सारे प्रकरण ‘खीर कोणी खाल्ली’ या गोष्टीसारखे होणार आहे. फरक एवढाच की इथे खीर खाणारे खूपजण आहेत आणि घागरीवर बसून ‘हुप हुप करी वरचे डोंगरी...मी खीर खाल्ली तर बुड घागरी’ असे आव्हानही देणारे आहेत. कारण घागर बुडणार नाही याची कल्पना या धूर्त लोकांना आहे.

Story: उतारा | पांडुरंग गांवकर |
19th November 2022, 10:37 Hrs
‘हुप, हुप करी, वरचे डोंगरी...!’

माकड, मांजर आणि उंदराने मिळून केलेली खीर आणि नंतर मांजराने ती खीर खाल्ल्याची गोष्ट अनेकांना आठवत असेल. त्या गोष्टीत मांजर खीर राखण्यासाठी थांबते आणि खीर संपवून टाकते. पण जेव्हा पाण्यात घागर पालथी ठेवून सर्वांनी शपथ घेण्याची युक्ती लढवली जाते, तेव्हा माकड, उंदीर वाचतात. पण मांजर बुडते, असा त्या गोष्टीचा शेवट होता. गोष्टीचा बोध होता ‘सत्य बोलावे’. या गोष्टीत जरी ती घागर बुडली असली, तरी प्रत्यक्षात तसे होणार नाही याची सर्वांनाच कल्पना आहे. त्यामुळे आता पालथ्या घागरीवर बसण्याचे धाडस सगळेच करतात. आता तर प्रत्यक्षात सर्वांनीच खीर खाल्लेली असते, पण सर्वजण मोठ्या आत्मविश्वासाने पालथ्या घागरीवर उभे राहून ‘मी खीर खाल्ली तर बुड घागरी’ म्हणू शकतात. गोव्यात सध्या उघड झालेला धान्य घोटाळा हा असाच पालथ्या घागरीला न घाबरणाऱ्या चोरांचा झालेला आहे. या घोटाळ्यात पोलिसांनाच खोटे ठरवण्याचे प्रयत्न नागरी पुरवठा खात्याने केल्यामुळे आता विश्वास ठेवायचा कोणावर? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या आठवड्यात क्राईम ब्रांचने वेगवेगळ्या छाप्यांमध्ये सुमारे ५० टन म्हणजे १ गोणी तांदूळ व गहू जप्त केले. हा सगळा माल नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांतून उचलला असे अटक केलेल्या संशयितांनी पोलिसांना सांगितले. म्हणजे फक्त बीपीएल (दारिद्र्य रेषेखालील) रेशन कार्ड धारकच धरल्यास १,,४०० रेशन कार्ड धारकांचे धान्य चोरी करून ते कर्नाटकात नेण्यात येणार होते. हा झाला एका धाडीतला हिशोब. एका एजंटकडूनच एवढा माल जप्त केला. असे दोन एजंट उत्तर आणि दक्षिण गोव्यात आहेत. दर महिन्याला जर हे दोन्ही एजंट सरासरी १०० टन माल चोरून विकत असतील तर किमान ३ हजार रेशन कार्ड धारकांचे धान्य बाहेर जात आहे. त्या शिवाय स्वस्त धान्य दुकानदार काही रेशन कार्ड धारकांना तांदूळ व गहू यांचा मोबदला म्हणून रेशन कार्डच्या दराने पैसे देतात. तेच उरलेले धान्य वाढीव दराने बाहेर विकले जाते. म्हणजे फक्त एजंटच नव्हे तर गोव्यातील स्वस्त धान्य दुकानदारही सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माल बाहेर विकत आहेत. हा गोव्यातील सर्वात मोठा धान्य घोटाळा आहे. पण अद्यापही मुख्य आरोपींना ताब्यात घेतलेले नाही, दर महिन्याला किती माल बाहेरच्या काळ्या बाजारात विकला जातो, त्याचेही गणित केलेले नाही किंवा उपलब्ध नाही. महिन्याला हजारो रेशन कार्ड धारकांचा माल विकला जातो. बायो मेट्रीक पद्धतीचाही गैरवापर करून हे सारे काम केले जात आहे. त्यामुळे रेशन कार्डांचीच फेररचना करण्याची वेळ आली आहे. वाहनांमध्ये जीपीएस बसवून किंवा मुख्य गोदामातून थेट स्वस्त धान्य दुकानांवर माल पाठवून हा घोटाळा संपुष्टात येणार नाही. त्यासाठी रेशन कार्डांचीच छाननी करून जे लोक माल उचलत नाहीत किंवा जे रेशन कार्ड धारक गोव्यात नाहीत त्यांची नावे रद्द करून इतरांना तो माल दिला जावा. राज्यासाठी केंद्राकडून जो कोट्यवधींचा माल येतो, त्यात जर अशा प्रकारे घोटाळा होत असेल तर लोकांची पोटगी चोरणारे खरे दळभद्री म्हणावे लागतील.

एवढा मोठा घोटाळा झाल्यानंतरही नागरी पुरवठा खाते आपल्या कुठल्याच गोदामातून हा माल गेला नाही असे म्हणते. तर मग एवढा माल कुठून आला त्याची चौकशी व्हायला हवी. ५० टन म्हणजे ५० हजार किलो धान्य. हा आकडा लहान नाही. दर महिन्याला उत्तर आणि दक्षिण गोव्यात काही एजंट सरकारचा माल चोरून खाजगी कंपन्या, दुकानदारांना विकतात. गोव्यातून कर्नाटकात मीलमध्ये माल पाठवला जातो. गोवा तांदूळ आणि गहू पिकवणारे राज्य नाही. गोव्याला धान्य बाहेरून येते. मग या धान्याची वाहतूक करून ते कर्नाटकात मीलना विकले जात असेल तर यात किती अर्थकारण गुंतले आहे याची कल्पना करा.

मी विकले नाही, तू विकले नाही तर हे धान्य आले कुठून आणि कोणी विकले? ज्या लोकांना अटक केली, त्यांनी माल नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून आणल्याचे सांगितले. गोदामाच्या कर्मचाऱ्यांनीही माल दिला. पण जो सासष्टीसाठी होता तो कुंडईला कसा पोहोचला त्याची आपल्याला कल्पना नाही असे म्हटले आहे. हे सगळे पाहिले तर माल नागरी पुरवठा खात्याचाच आहे हे स्पष्ट होते. पण आपला माल नाही असे नागरी पुरवठा खात्याचे म्हणणे आहे. यातून सगळ्यांनी मिळून कशा पद्धतीने पोलिसांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला आहे हे दिसून येते. पोलिसांना तपासासाठी स्वातंत्र्य दिले तरच या प्रकरणाच्या मुळाशी जाणे शक्य होईल. पण पोलिसांवर दबाव आला तर हे प्रकरणही दाबून टाकले जाईल. जर या प्रकरणात नागरी पुरवठा खात्याचा सहभाग नाही तर ज्यांचा सहभाग आहे त्यांना तरी किमान पकडणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या मताप्रमाणे काही स्वस्त धान्य दुकानदार या घोटाळ्यात आहेत. मग त्या दोषी दुकानदारांच्या मुसक्या आवळाव्या लागतील. पण दुकानदारांनी रितसर हिशोब ठेवला असेल आणि ज्यांनी माल उचलला नाही त्यांना माल दिल्याचे बायो मेट्रीकद्वारे सिद्ध केले तर तेही चोर ठरणार नाहीत. शेवटी हे सारे प्रकरण ‘खीर कोणी खाल्ली’ या गोष्टीसारखे होणार आहे. फरक एवढाच की इथे खीर खाणारे खूपजण आहेत आणि घागरीवर बसून ‘हुप हुप करी वरचे डोंगरी...मी खीर खाल्ली तर बुड घागरी’ असे आव्हानही देणारे आहेत. कारण घागर बुडणार नाही याची कल्पना या धूर्त लोकांना आहे.

सरकार आणि पोलीस यांच्या कसोटीचा हा काळ आहे. कोणाचीही गय न करता दर महिन्याला होणारी ही धान्य चोरी यावेळी कायमची थांबेल यासाठी किमान सरकारने पुढाकार घेऊन कार्यवाही करावी.