महिलांमधील लठ्ठपणाची समस्या

साधारणपणे वयाचा तीसचा आकडा पार झाला की आपल्या उंचीनुसार मर्यादित वजन स्थिर असणे म्हणजे योग्य वजन मानले जाते. उंचीच्या प्रमाणापेक्षा शारीरिक वजन जास्त वाढणे आणि शरीरात चरबीचे प्रमाण अधिक असणे म्हणजेच लठ्ठपणा.

Story: आरोग्य । डॉ. श्वेता राऊत मुळगावकर |
18th November 2022, 11:09 Hrs
महिलांमधील लठ्ठपणाची समस्या

लठ्ठपणा कमी करण्याठी अनेकजण अनेक उपाय आजमावतात. काही जण व्यायामशाळेत तासनतास व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण जेवण सोडून फक्त सॅलेड खातात व डाएटच्या नावाखाली स्वतःच्या आरोग्याचे हाल हाल करतात. असे करूनही जेव्हा वजन कमी होत नाही तेव्हा शारीरिक त्रास तर होतोच त्यासोबत मानसिक आरोग्यही बिघडते. शरीरातील चरबीचे प्रमाण हे वय, लिंग व शारीरिक श्रमावर अवलंबून असते. जन्मत: १२ टक्के वजन चरबीचे असते. मुली वयात येतात तसे हे प्रमाण वाढते व स्त्रियांमध्ये अठराव्या वर्षानंतर हे प्रमाण पुढे साधारण ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढते. शारीरिक श्रम केले की चरबीचे प्रमाण कमी होते. शारीरिक श्रम कमी झाले की चरबीचे प्रमाण वाढते. म्हणूनच नियमित व्यायाम दैनंदिन जीवनात असणे प्रत्येक स्त्रीसाठी आ‌वश्यक आहे.

लठ्ठपणा हे साहजिकच अनेक आजारांचे माहेरघर आहे. यामुळे चढणे-उतरणे, वेगाने चालणे, चपळतेने काम करणे अशा गोष्टी सहज न जमण्यापासून हृदयविकार, वाढता रक्तदाब व मधुमेह यासोबतच ऑस्टिओ अर्थराइटिस, मेटाबोलिक सिंड्रोम, फॅटी लिव्हर, किडनीचा त्रास या समस्या उद्भवण्याचा धोका जास्त असतो. या आजारांसोबत महिला वर्गामध्ये लठ्ठपणामुळे मासिक पाळीत किंवा प्रजनन प्रक्रियेत अडथळा उद्भवू शकतो.

 शहरी भागातील ३५ वर्षांवरील स्त्रिया शहरी जीवनाबरोबर येणाऱ्या चुकीच्या जीवनशैलीमागे भुलतात. यात वजन वाढवणाऱ्या अन्नाचे नेहमी सेवन करणे, व्यायामाचा अभाव आणि त्यामुळे हळूहळू शरीर प्रक्रियांच्या वेगावर परिणाम होतो. लहान वयातही मुली आणि स्त्रियांच्या शरीरात नैसर्गिकरित्याच स्नायू कमी आणि अधिक कमजोर असू शकतात. तसेच लग्नानंतर मुलींच्या आयुष्याचा प्राधान्यक्रम बदलतो. जेवण, राहणी पद्धतीतील बदल, हार्मोनल बदल यामुळे थोडीफार वजनवाढ दिसून येते व बाळंतपणानंतर ती वाढू शकते. समाजातील गैरसमजूती, खाण्याबद्दल असलेल्या संकल्पना यामुळे त्यात भर पडते.  

हार्मोनल बदल- लग्नानंतर लैंगिक जीवनात सक्रिय राहिल्यामुळे मुलींच्या शरीरात हार्मोनल बदल होऊ लागतात. त्यामुळे वजन वाढते. त्याचबरोबर गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरामुळे वजनही वाढते.

 प्रजनन आरोग्य- लठ्ठपणाचा प्रजनन आरोग्यावर गंभीररित्या प्रभाव पडत असल्याचे दिसून येते. मासिक पाळीची अनियमितता व लठ्ठपणा यांचा परस्पर संबंध असल्याने लठ्ठ स्त्रिया इन्सुलिन प्रतिरोधक असतात ज्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम किंवा पीसीओएसच्या विकासाला प्रोत्साहन मिळते. हार्मोनल संतुलन बिघडल्याने मासिक पाळी पूर्ण थांबणे, लवकर किंवा उशिरा येणे किंवा प्रवाह नेहमीपेक्षा जास्त किंवा हलका होणे हे दिसून येते.

 गर्भधारणा- लठ्ठपणाचा गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होतो. लठ्ठपणा असलेल्या महिलांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण जास्त असते. गर्भधारणेनंतर, जास्त वजनामुळे त्यांना गर्भावस्थेतील मधुमेह किंवा उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते. लठ्ठपणामुळे गर्भपात, जन्म विकृती आणि अकाली जन्म होण्याची शक्यता वाढते. सिझेरियन प्रसुती होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे स्थूल स्त्रियांमध्ये गर्भधारणेचा प्रयत्न करण्याआधी वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. 

लठ्ठपणामुळे येणाऱ्या इतर समस्या

अतिरिक्त वजनातील प्रत्येक किलो आपल्याला कुठल्या ना कुठल्या आजाराच्या दिशेने नेणारा असतो. मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीनंतर लठ्ठ महिलांना स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. महिलांच्या मनात अतिशय संकोच निर्माण करणारा आणखी एक आजार म्हणजे मूत्राशयावर ताबा न राहून लघवीवर संयम ठेवता न येणे. प्रसूतीनंतर अनेक लठ्ठ महिलांना ही तक्रार जाणवू शकते.

 लठ्ठपणा कसा टाळता येतो?

लठ्ठपणा इतर कोणत्याही आजारासारखाच असतो. आरोग्याच्या दृष्टीने त्यामुळे लठ्ठपणाबाबत ‘चलता हैं’ अशी मानसिकता न ठेवता योग्य व्यायाम, योग्य आहार, योग्य औषध या तीन गोष्टींचा समन्वय साधून वजन सहजरित्या आटोक्यात आणू शकतो. इन्स्टंट किंवा चुकीच्या उपचार पद्धती आजमावल्याने वजन आटोक्यात न येता आत्मविश्वास कमी होऊ शकतो व आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. लठ्ठपणामुळे आपली शरीरयष्टी इतरांच्या थट्टेचा विषय आहे असे वाटू लागल्याने स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्वत:बद्दलची आत्म-प्रतिमा खालावते, व्यक्तिमत्त्वावर व मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. असे होऊ न देता सकारात्मकतेने आपली वाटचाल चालू ठेवली पाहिजे. वजन कमी केल्याने लठ्ठ महिलांच्या मासिक पाळीवर चांगला परिणाम होऊ शकतो. यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारण्यास मदत होते आणि पीसीओडीमध्ये सुधारणा देखील होते. अशा वेळी जमल्यास डायटीशीयनची मदत घेऊन वैद्यकीयदृष्ट्या संतुलित आहार घेणे आणि व्यायामाची जोड ठेवणे आवश्यक ठरते. वजन कमी झाल्याने प्रजनन प्रणाली देखील सुधारतात. मासिक पाळीचे चक्र नियमित होत जाते आणि अँटीओव्ह्युलेटरी झालेले हे चक्र पुन्हा ओव्हुलेटरी बनते. पीसीओडीने ग्रस्त असलेल्या महिलांनी यावर उपचार घेण्यासाठी एंडोक्राइनोलॉजिस्टला देखील भेट देणे आवश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लठ्ठपणा असलेल्या महिलांना वजन कमी करण्याच्या औषधांचा किंवा फुगा घालण्यासारख्या एंडोस्कोपिक उपचारांचा फायदा होऊ शकतो. मात्र गंभीर लठ्ठपणा असलेल्या स्त्रियांना (बीएमआय ३७.५ kg/m२ पेक्षा जास्त), वजन कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया उपयोगी पडू शकते.