प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कदंब महामंडळाने खासगी बसेस भाड्याने चालवायला घेण्यासाठी निविदा काढली आहे. यांतील जास्तीत जास्त बसेस विविध शाळांतील विद्यार्थ्यांना घरून आणणे व सोडण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. या विषयीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती कदंब परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.
कदंब महामंडळाच्या अनेक बसेस जुन्या झाल्या आहेत. महामंडळाकडे बसची कमतरता असल्याने अनेक विद्यालयांना मागणी असूनही बससेवा देणे शक्य होत नाही. शाळांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी खासगी बसेस कंत्राटी तत्त्वावर भाड्याने घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळ फक्त बसेस भाड्याने घेणार आहे. बससाठी चालक व बसची देखभाल बसमालकांनाच करावी लागणार आहे. बसमालकांना किलोमीटरप्रमाणे ठरलेला दर दिला जाईल. या बसेस शहरांतील व ग्रामीण भागातील विद्यालयांमध्ये सेवा देतील. या बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष पास दिले जातील, असेही तुयेकर म्हणाले.
करोनामुळे खासगी बसव्यवसाय संकटात
कराेना महामारीच्या काळात खासगी बसव्यवसाय संकटात सापडला होता. अनेकांना आपल्या बस बंद कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर खासगी बसमालकांनीच कदंब महामंडळाकडे बसेस भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अनेक ग्रामीण भागातील विद्यालयांना बस नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे पालकांची व मुख्याध्यापकांची शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करण्याची मागणी येत होती. राज्यातील सुमारे १०० शाळांना बसची गरज आहे. त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठीच ही निविदा काढण्यात आली आहे, असे कदंबचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांनी स्पष्ट केले.
इच्छुक बसमालकांनी महामंडळाशी संपर्क साधावा
कदंब महामंडळाला आपली बस चालवायला देण्यासाठी इच्छुक असलेल्या बसमालकांनी महामंडळाशी त्वरित संपर्क साधावा. या बसवर कदंब महामंडळाचा लोगो नसेल. तसेच चालकांचा गणवेशही कदंबचा नसेल. शाळांची मागणी प्रामुख्याने पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर काही बसेस शिल्लक राहिल्या तर त्या काही ग्रामीण भागात चालवल्या जातील. याविषयीही चर्चा करण्यात आली आहे, असे उल्हास तुयेकर यांनी सांगितले.
डिसेंबरमध्ये आणखी १०० इलेक्ट्रिक बसेस
सध्या कंदब महामंडळाच्या ताफ्यात ४८० डिझेलवर चालणाऱ्या, तर ५० इलेक्ट्रिक बसेस आहेत. डिझेलवर चालणाऱ्या काही बसेस जुन्या झाल्याने त्या बंद आहेत. डिसेंबर महिन्यात अाणखी १०० नवीन इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. स्मार्ट सिटीअंर्तगत आणखी ५० इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. या सर्व बसेस राज्यातील ग्रामीण भागात चालावल्या जातील, असे तुयेकर यांनी सांगितले.

प्रति किलोमीटर दर ठरलेला नाही : घाटे
खासगी बसेस घेण्यासाठी निविदा काढण्यात आली असून यात खासगी बसमालक व खासगी बसमालक संघटना आपल्या बस महामंडळाला भाड्याने देऊ शकतात. डिझेल व गाडीच्या देखभालीचा सर्व खर्च बसमालकांना करावा लागणार आहे. महामंडळ बसमालकांना किलोमीटरप्रमाणे पैसे देणार आहे. प्रति किलोमीटरला किती पैसे, हे अद्याप ठरलेले नाही, असे कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी सांगितले.


