प्रतिनिधी । गोवन वार्ता
फोंडा : ढवळी-फोंडा येथे बुधवारी दुपारी १.२० च्या सुमारास दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्कूटरवर मागे बसलेली श्रेया कोठारकर (१८, एमआरएफ कंपनी समोर, तिस्क - उसगाव) हिचा मृत्यू झाला. या अपघातात मोटरसायकल चालक मुकेश हेक्टर (४२, निलगिरी हील, ढवळी) जखमी झाला. त्याच्यावर उपजिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. श्रेया फर्मागुडी येथील जीव्हीएम कॉलेजची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीए ०५ एच २८४० क्रमांकाची मोटारसायकल फोंडा येथून निलगिरी हिलकडे जात होती. विरुद्ध दिशेने वाहने वेगाने येत असल्याने मोटरसायकल चालक मुकेश हेक्टर यांनी मोटरसायकल रस्त्याच्या मध्यभागी थांबवली होती. त्याचवेळी मडगावकडून फोंड्याच्या दिशेने येणारी जीए ०५ व्ही ०११५ क्रमांकाची स्कूटर एका वाहनाला ओव्हरटेक करत असतानाच रस्त्याच्या मध्यभागी थांबलेल्या मोटरसायकलवर आदळली. त्यामुळे स्कूटरवर मागे बसलेली श्रेया कोठारकर उसळी घेऊन रस्त्यावर कोसळली. गंभीर जखमी श्रेयाला खासगी वाहनातून उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. फोंडा पोलीस उपनिरीक्षक आदित्य वेळीप यांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवून दिला.
श्रेया बुधवारी सकाळी मित्र फ्रेझर डायस (१८, कुंडई) याच्यासोबत मडगाव येथे गेली होती. मडगावहून परतत असतानाच तिचा अपघातात मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांसह मित्रमंडळींनी उपजिल्हा इस्पितळात गर्दी केली होती.


