वृद्धाश्रमातील खून प्रकरणातून पुराव्याअभावी सिक्वेरा निर्दोष

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd October 2022, 11:52 pm
वृद्धाश्रमातील खून प्रकरणातून  पुराव्याअभावी सिक्वेरा निर्दोषपणजी : दिवाडी येथील एका वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या जुवांव रिबेलो यांचा खून केल्याप्रकरणी इलियास सिक्वेरा याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे तसेच पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्या. छोलू गावस यांनी सोमवारी हा निवाडा दिला.

या प्रकरणी दिवाडी येथील ‘लार’ या वृद्धाश्रमाचे प्रभारी नन मोनिका रॉड्रिग्ज यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, १४ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता जुवांव रिबेलो आणि इलियास सिक्वेरा बाहेरून आल्यानंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून भांडण करत होते. दोघांची समजूत काढल्यानंतर ते दोघे झोपायला गेले. त्यानंतर काही वेळाने जखमी व्यवस्थेत जुवांव बाहेर आले. त्यांना लगेच १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने इस्पितळात दाखल करण्यात आले. याच दरम्यान इलियास सिक्वेरा याच्या हातात चाकू असल्याचे म्हटले होते.
घटनेची माहिती मिळताच जुने गोवा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सुदिन रेडकर यांनी संशयित इलियास याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्यानंतर उपचार सुरू असताना जुवाव यांचा ७ नोव्हेंबर २०१९ रोजी मृत्यू झाला.
तत्कालीन पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी हे प्रकरण खून म्हणून नोंद करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी न्यायालयात सिक्वेरा याच्या विरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी सिक्वेरा याच्यातर्फे अॅड. वाय. येलगर यांनी बाजू मांडून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचा तसेच २३ दिवसानंतर उपचार सुरू असताना जुवांव यांचा मृत्यू झाला, असा युक्तिवाद केला. या व्यतिरिक्त शवचिकित्सा अहवालानुसार, जुवांवचा मृत्यू रक्ताचा संसर्ग (सेप्टिसिमिया) झाल्यामुळे आणि मानसिक धक्का बसल्यामुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी न्यायालयाने पुरावा नसल्याचे निरीक्षण नोंदवून संशयित इसियास रिबेलो याला खून प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.