राज्यात २५ व्यक्तींमागे एक सरकारी कर्मचारी

एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ६३,१६२ : सात खात्यांमध्येच ६७ टक्के कर्मचारी


03rd October 2022, 12:47 am
राज्यात २५ व्यक्तींमागे एक सरकारी कर्मचारी

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता                   

पणजी : राज्यात आधारकार्डच्या आकडेवारीप्रमाणे सध्या १५ लाख ४२  हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. त्याप्रमाणे पाहिले तर गोव्यात सध्या २५  व्यक्तींमागे एक सरकारी कर्मचारी आहे. अर्थात गोव्यातील ८७ सरकारी खाती, १८  महामंडळे, ११ स्वायत्त संस्था  व १९ अनुदानित संस्थांमध्ये एकूण ६३,१६२ सरकारी कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे ८७ खात्यांपैकी फक्त सात  खात्यांमध्येच ६७ टक्के इतके कर्मचारी आहेत.            

२०१० ते २०१९ या नऊ वर्षांत सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. या काळात हजारो कर्मचारी निवृत्त झाले; पण कर्मचाऱ्यांची संख्या दहा हजाराने वाढली. ८७ सरकारी खात्यांमध्येच ४३,३८३ इतके कर्मचारी आहेत. २०१० मध्ये ही संख्या ३७,७०७ होती.             

दर दोन वर्षांच्या अंतरानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण होते. २०१३ मधील सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात ५८,००८ सरकारी कर्मचारी होते. त्यानतंर २०१५ मध्ये सर्वेक्षण झाले. त्यात ६१,२५६ सरकारी कर्मचारी असल्याचे आढळून  आले. २०१९ मधील सर्वेक्षणात ६३,१६२ सरकारी कर्मचारी होते. त्यानंतर गेल्या  तीन वर्षांत झालेली नोकरभरती आणि निवृत्त झालेले कर्मचारी यामुळे सध्या ६५  हजारांच्या आसपास सरकारी कर्मचारी गोव्यात असू शकतात, असा अंदाज आहे. नव्या  सर्वेक्षणाचे कामही लवकरच सरकार हाती घेणार आहे. त्यामुळे सध्याचा निश्चित आकडा त्यानंतरच स्पष्ट होईल.             

२०१९च्या अहवालाप्रमाणे राज्यात जे ६३,१६२ सरकारी कर्मचारी आहेत, त्यात ४३,३८३ इतके ८७ खात्यांमधील कर्मचारी, तसेच १५,८८७ कर्मचारी सरकारी  अनुदानित १९ संस्थांमध्ये आहेत. १८ महामंडळांमध्ये ३,७०६ तसेच ११ स्वायत्त  संस्थांमध्ये १८९ कर्मचारी आहेत. दरम्यान, सुमारे दहा हजार सरकारी कर्मचारी कंत्राट किंवा रोजंदारी किंवा इतर प्रकारचे होते. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा आकडा ५३,७५५ इतका  होता.                          

जाती जमातींच्या वर्गवारीप्रमाणे जे आकडे उपलब्ध आहेत, त्यात अनुसुचीत  जातींमधील १,३२९ कर्मचारी, अनुसूचित जमातींमधील ५,९८२ सरकारी कर्मचारी, तसेच  ओबीसींमधील ९,४७० कर्मचारी आहेत.                          

श्रेणीप्रमाणे ‘अ’ गटातील २,२३९, ‘ब’ गटातील ५,५७२ कर्मचारी आहेत. राजपत्रित अधिकारी ५.७९ टक्के आहेत. ‘क’ गटातील ४६,१२७  इतके कर्मचारी आहेत. तसेच ‘ड’ गटात ३,६०५ कर्मचारी व इतर ५,६१९ कर्मचारी  आहेत.                          

सरकारी खात्यांमधील एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येपैकी एका पोलीस खात्यात सर्वाधिक १८ टक्के कर्मचारी आहेत.  अनुदानित संस्थांपैकी शिक्षण खात्यांतर्गत येणाऱ्या संस्थांमध्ये ११,१५४  कर्मचारी आहेत, महामंडळांमध्ये कदंब महामंडळात सर्वाधिक २,१४५ कर्मचारी  आहेत. स्वायत्त संस्थांमध्ये राज्य कृषी मार्केटिंग बोर्डमध्ये ४२  कर्मचारी आहेत.             

८७ सरकारी खात्यांपैकी आठ खात्यांमध्ये ६७.५० टक्के कर्मचारी आहेत. यात पोलीस खात्यात ८,०७६ वीज ६,४०४, सार्वजनिक बांधकाम ३,९०८, शिक्षण  खाते ३,४०३, आरोग्य ३,३३१, गोवा वैद्यकीय महाविद्यालय २,३५७ व जलस्रोत  खात्यात १,६११ कर्मचारी आहेत. 


हेही वाचा