अखेर भारताचा मालिका‌ विजय

दक्षिण आफ्रिकेचा १६ धावांनी पराभव : मिलरचे वादळी शतक, डि कॉकची अर्धशतकी खेळी व्यर्थ


03rd October 2022, 12:35 am
अखेर भारताचा मालिका‌ विजय

गुवाहाटी : गुवाहाटी येथे झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने १६ धावांनी विजय मिळवला. यासह भारताने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० ने आघाडी घेतली. गुवाहाटीच्या मैदानातील हा विजय भारतासाठी ऐतिहासिक ठरला. कारण, मायदेशात भारताला टी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकाला एकदाही पराभूत करता आले नव्हते. मायदेशात टी-२० मालिकेत भारताने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताने दिलेल्या २३८ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाने २२१ धावांपर्यंत मजल मारली.
भारताने दिलेले २३८ धावांचे आव्हान पार करताना डेव्हिड मिलर (४७ चेंडूत नाबाद १०६ धावा) आणि क्विंटन डिकॉक (४८ चेंडूत ६९ धावा) यांनी झुंजार खेळी केली. मात्र, या दोघांच्या दीडशतकी भागीदारीनंतरही आफ्रिका २२१ धावांपर्यंच पोहचू शकली. भारताने दुसरा टी-२० सामना १६ धावांनी जिंकत दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका २-० अशी खिशात टाकली. भारताकडून सूर्यकुमार यादवने २२ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. तर केएला राहुलने ५७, विराट कोहलीने ४९ तर रोहित शर्माने ४३ धावांची खेळी केली. गोलंदाजीत अर्शदीपने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
आफ्रिकेला सुरुवातीला तीन धक्के
भारताने विजयासाठी ठेवलेल्या २३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. नवोदित युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात आफ्रिकेला दोन धक्के दिले. त्याने टेम्बा बाऊमाला आणि रिली रासोव्हला शुन्यावर बाद केले. त्यानंतर एडिन माक्ररमने १९ चेंडूत आक्रमक ३३ धावांची खेळी केली. मात्र, ही त्याची खेळी अक्षर पटेलने दांडी गुल करत संपवली.
मिलर-डिकॉकची शतकी भागीदारी
डेव्हिड मिलर आणि क्विंटन डिकॉक यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचत आफ्रिकेला १६व्या षटकात १५०च्या पार पोहचवले. डेव्हिड मिलरने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत नाबाद १०६ धावांची शतकी खेळी केली. मात्र, अखेर दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ३ बाद २२१ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने सामना १६ धावांनी जिंकून मालिका २-० अशी खिशात टाकली.
किलर मिलरची आक्रमक फलंदाजी
पॉवर प्लेमध्येच तीन धक्के बसल्यानंतर डेव्हिड मिलर आणि क्विंटन डिकॉक या डावखुऱ्या जोडीने आफ्रिकेचा डाव सावरला. डेव्हिड मिलरने तुफान फटकेबाजी करत १२ व्या षटकात आफ्रिकेचे शतक धावफलकावर लावले. त्याला डिकॉकने बॉल टू रन खेळत चांगली साथ दिली. डेव्हिड मिलरने २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला कमी धावांत रोखून निर्धारित लक्ष्य लवकर पूर्ण करण्याचा त्यांचा डाव होता. पण हा डाव भारतीय फलंदाजांनी उधळून लावला. सुरुवातीपासूनच भारताने तुफान फलंदाजी केली. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी तडाखेबाज फलंदाजी करत अगदी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. पण, नंतर रोहित ४३ धावा करून तर केएल राहुल अर्धशतक पूर्ण करून ५७ धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमारने नावाला साजेशी ६१ धावांची तडफदार खेळी केली. तर विराट कोहली ४९ धावांवर नाबाद राहिला. कार्तिकनेही नाबाद १७ धावा करत भारताची धावसंख्या २३७ पर्यंत पोहोचवली.
...........
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ३ बाद २३७ धावा
द. आफ्रिका : २० षटकांत ३ बाद २२१ धावा


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२०त सर्वोच्च धावा
२३७/३ भारत (गुवाहाटी) २०२२*
२३६/६ वेस्ट इंडिज (जॉबर्ग) २०१५
२३४/६ इंग्लंड (ब्रिस्टल) २०२२
२३०/८ इंग्लंड (मुंबई) २०१६
..........................
टी-२० मध्ये भारताच्या सर्वात जलद १००+ धावा
१४.५७ सूर्यकुमार-विराट (४२ चेंडूत १०२) वि द.आफ्रिका गुवाहाटी २०२२ *
१३.१० राहुल-धोनी (४९ चेंडूत १०७) वि. वेस्ट इंडिज लॉडरहिल २०१६
१३.०२ राहुल-रोहित (७६ चेंडूत १६५) वि श्रीलंका इंदूर २०१७
............................
भारतातर्फे टी-२०मध्ये वेगवान अर्धशतक
युवराज सिंग : १२ चेंडू वि. इंग्लंड (डर्बन २००७)
केएल राहुल : १८ चेंडू वि. स्कॉटलंड (दुबई २०२१)
सूर्यकुमार यादव : १८ चेंडू वि. ‍द. आफ्रिका (गुवाहाटी २०२२*)
गौतम गंभीर : १९ चेंडू वि. श्रीलंका (नागपूर २००९)
युवराज सिंग : २० चेंडू वि. ऑस्ट्रेलिया (डर्बन २००७)
युवराज सिंग : २० चेंडू वि. श्रीलंका (मोहाली २००९)

रोहित ४०० टी-२० खेळणारा पहिला भारतीय
भारतीय कर्णधार रोहित शर्माने क्रिकेटच्या मैदानावर आणखी एक नवा विक्रम केला. ४०० टी-२० सामने खेळणारा तो पहिला भारतीय आणि जगातील नववा क्रिकेटपटू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी नाणेफेक करताना रोहितने ही कामगिरी केली. भारतातर्फे सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम सलामीवीर रोहितच्या नावावर आहे. रोहितनंतर दिनेश कार्तिक आणि एमएस धोनी हे एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहेत. ज्यांनी टी-२० मध्ये ३५० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. रोहित २००७ च्या विश्वचषकापासून टी-२० सामने खेळत आहे. दरम्यान, जगात सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्डच्या नावावर आहे. पोलार्डने आतापर्यंत ६१४ सामने खेळले आहेत. त्याच्यापाठोपाठ ड्वेन ब्राव्हो (५५६), शोएब मलिक (४८१), ख्रिस गेल (४६३), सुनील नरेन (४३५), रवी बोपारा (४२९), आंद्रे रसेल (४२८) आणि डेव्हिड मिलर (४०२) यांचा क्रमांक लागतो.

भारतात सर्वाधिक टी-२० खेळणारे खेळाडू
४०० - रोहित शर्मा
३६८ - दिनेश कार्तिक
३६१ - एमएस धोनी
३५४ - विराट कोहली
............
टी-२०मध्ये सूर्यकुमारच्या एक हजार धावा पूर्ण
सूर्यकुमार यादवने या सामन्यात टी-२० कारकीर्दीत १ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने अवघ्या ३३ सामन्यांत ही कामगिरी बजावली. सूर्यकुमारने ५७३ चेंडूचा सामना करत १७४च्या स्ट्राईक रेटने १ हजार टी-२० धावा ठोकल्या. यापूर्वी ग्लेन मॅक्सवेलने ६०४ चेंडूत १ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. आता तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर कॉलिन मुनरो (६३५ चेंडू), चौथ्या स्थानावर एव्हिन लुईस (६४० चेंडू) तर पाचव्या स्थानावर थिसारा परेरा (६५४ चेंडू) यांचा समावेश आहे.