चंद्रसिंग गढवाली दुर्मिळ का असतात?

आपल्याला जे मत आधी कळलेय, ते मत आपले स्वतःचे मत असल्यासारखे आपण त्याच्या बाजूने भांडू लागतो. खरे म्हणजे ते मत आपण शोधलेले नसते. फक्त ते त्याच्या विरुद्ध मताच्या आधी ऐकलेले असते एवढेच! समाजातील बहुतेक भांडणे जीवनात प्रथम ऐकलेल्या मतांना चिकटून बसण्याच्या प्रवृत्तीमुळे होतात. त्यामुळे प्रथम कळलेली, आपल्यासाठी आदराची स्थाने असलेल्या माणसांकडून कळलेली, आतापर्यंतच्या तर्काने योग्य वाटलेली मते योग्य असतीलच असे नाही आणि ती फेटाळून लावणारे पुरावे पुढे आले तर ते स्वीकारण्यात कमीपणा नाही.

Story: अनुभव | डॉ. रुपेश पाटकर |
01st October 2022, 10:35 Hrs
चंद्रसिंग गढवाली दुर्मिळ का असतात?

तुम्ही अ‍ॅटनबरोचा 'गांधी' सिनेमा पाहिलाय का? मी जेव्हा तो पहिल्यांदा पाहिला तेव्हा मी सहावीत होतो. आम्हाला तो शाळेत दाखवण्यात आला होता. खरे सांगू, त्यावेळी त्यातील एकच दृश्य माझ्या लक्षात राहिले होते. ते म्हणजे जालियनवालाबाग हत्याकांड. ते दृश्य बघताना आणि नंतरही त्या दृश्याबाबत एक प्रश्न माझ्या मनात सतत येत राहिला होता, तो म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष गोळ्या चालवल्या ते शिपाई गोरे नव्हते, गोळीबाराची आज्ञा देणारा जनरल डायर फक्त गोरा होता. समोर निशस्त्र लोक होते, त्यात बायका मुले होती. असे असताना त्या प्रत्यक्ष गोळ्या चालवणार्‍यांपैकी एकाही शिपायाला डायरची आज्ञा आपण पाळू नये असे का वाटले नाही? किंवा निष्पाप देशबांधवांवर गोळ्या चालवण्याऐवजी त्यांच्यातील एकानेही उलट फिरून क्रूर आज्ञा देणार्‍या डायरवरच गोळी का झाडली नाही?

पुढे अनेक वर्षांनी मी चंद्रसिंग गढवाली यांच्याविषयी वाचले. २३ एप्रिल, १९३० ला पेशावरमधील ब्रिटिशांना अहिंसक प्रतिकार करणार्‍या निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचा आदेश गढवाल रायफल्सचे प्रमुख हवालदार मेजर चंद्रसिंग गढवाली यांना देण्यात आला. पण त्यांनी गोळीबार करण्यास पूर्णपणे नकार दिला. त्याची शिक्षा चंद्रसिंग यांना भोगावी लागली. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना १४ वर्षांची दीर्घ शिक्षा झाली. जे मला जालियनवालाबागबाबत वाटत होते, ते चंद्रसिंग यांनी त्यानंतर दशकभराने पेशावरमध्ये केले. पण ही अशा तऱ्हेची कदाचित एकमेव घटना असावी? अशा घटना दुर्मीळ का असाव्यात?

तुम्हाला एरवी सैन्यात बंडे झालेली दिसतील, पण ती नियोजितपणे केलेली असतील, त्यांची प्रेरणा वैयक्तिक अपमानाचा सूड किंवा महत्त्वाकांक्षा असलेली आढळेल. पण वरिष्ठाने दिलेली आज्ञा आपल्या विवेकाला पटत नाही, म्हणून ती बजावण्यास नकार देणारी आणि त्यासाठी शिक्षा होणार हे माहीत असताना देखील तसे धैर्य दाखवणारी व्यक्ती क्वचित का दिसते? 

मी मनोविकारशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेण्यास जाईपर्यंत मला वाटत होते की हा प्रश्न मला एकट्यालाच पडला आहे. पण मानसशास्त्रचा अभ्यास करताना मला हे कळले की असा प्रश्न पडणारा मी एकटाच नाही, माझ्या जन्माच्या आधीच हा प्रश्न लोकांना पडला होता आणि त्यांनी त्याचे उत्तर शोधून काढले देखील होते! या प्रश्नाचे उत्तर शोधून काढणारा मिलग्राम याचा प्रयोग तर मला खूपच इंटरेस्टिंग वाटला. मिलग्राम आणि मंडळींच्या पुढ्यात हिटलरची राजवट होऊन गेलेली होती. ती पाहूनच त्यांच्या मनात हा प्रश्न उद्भवला होता की पिसाट हिटलरच्या क्रूर आज्ञा त्याच्या शिपायांनी कशा काय पाळल्या? लाखो निष्पाप 'ज्यूं'ना गॅस चेंबरमध्ये ठार मारताना, त्यांचे ऑशविट्जसारख्या छळछावणीत हाल करताना शिपायांचा अंतरात्मा जागा का नाही झाला? त्यांनी ते क्रौर्य करण्यास नकार का नाही दिला? त्यांना शिक्षेची भीती असल्यामुळे त्यांनी हे बेगुमानपणे केले का? जर शिक्षेची भीती नसती तर त्यांनी त्यांना देण्यात आलेल्या क्रूर आज्ञा नाकारल्या असत्या का? हे तपासून बघायला मिलग्रामने प्रयोग केला. 

काय केले मिलग्रामने? त्याने प्रयोगात सहभागी होण्यासाठी स्वयंसेवक हवेत अशी जाहिरात दिली. त्याने जाहीर केले की त्याला 'माणूस शिकतो कसा' याबाबत प्रयोग करायचा आहे. त्याने स्वयंसेवकांना त्याच्या प्रयोगशाळेत येण्यासाठी साडे चार डॉलर मानधन दिले. या स्वयंसेवकांनी काय करायचे तर जे विद्यार्थी बनलेले स्वयंसेवक आहेत, त्यांची परीक्षा घ्यायची आणि ते प्रश्नाचे उत्तर द्यायला चुकले तर त्यांना शिक्षा द्यायची. शिक्षा काय? शॉक देणे. जसजशी चुकांची संख्या वाढेल तसतसे शॉकचे व्होल्ट वाढवायचे. या शॉकच्या व्होल्टचे वर्गीकरणदेखील करण्यात आले होते. सौम्य, माध्यम, तीव्र- धोकादायक आणि सर्वात भयानक XXX! पण यात एक गम्मत होती, ती म्हणजे जे विद्यार्थी बनणार होते, ते मिलग्रामचे साथीदार होते आणि ही गोष्ट परीक्षा घेणार्‍या स्वयंसेवकांना माहीत नव्हती. (खरे म्हणजे परीक्षा घेणाऱ्यांचीच परीक्षा घेण्यात येत होती.) सुरुवातीला विद्यार्थी शॉक देणार्‍या खुर्चीत बांधून ठेवण्याचे स्वयंसेवकाच्या पुढ्यात केले जाई. नंतर बैठक रचना अशी असे की विद्यार्थी स्वयंसेवकाला दिसणार नाही. हेतू हा की विद्यार्थ्याला खरोखर शॉक लागत नाही हे कळू नये. पण जसजसा शिक्षेचा व्होल्ट वाढत जाई तसतसा विद्यार्थ्याच्या कळवळण्याचा आवाज मात्र वाढत जाई. अर्थात हा शाॅक मात्र कोणालाच लागत नव्हता. शाॅक १५ व्होल्टपासून सुरू होऊन कमाल मर्यादा ४५० व्होल्ट असल्याचे स्वयंसेवकाना सांगण्यात आले होते. स्वयंसेवक कमाल मर्यादेपर्यंत जातील का याबाबतचा बहुतेकांचा अंदाज 'नाही' असा होता. पण प्रत्यक्षात ४० स्वयंसेवकांपैकी २६ जणांनी कमाल मर्यादेपर्यंत शॉक दिला. विद्यार्थ्यांना त्रास होतोय हे ऐकू येत असून सुद्धा शॉक दिला. असा शॉक देण्यात त्यांना मजा वाटत होती असेही नाही. त्यातील अनेकांना टेंशनमुळे थरथर जाणवली.  चिंता वाटली तरी त्यांनी आज्ञापालन केले! म्हणजे आपल्या आज्ञापालनाने दुसर्‍याला त्रास होतोय हे जाणवत असताना आणि आज्ञापालन नाकारले असता कोणतीही शिक्षा होणार नाही असे पक्के माहीत असताना देखील त्यांनी आज्ञापालन केले. जेव्हा या स्वयंसेवकांना त्यांनी असे का केले म्हणून विचारण्यात आले तेव्हा त्यांचे उत्तर होते, 'आम्ही फक्त आज्ञापालन करत होतो!' हिटलरच्या पाडावानंतर पकडण्यात आलेल्या नाझी अधिकार्‍यांना जेव्हा त्यांनी छळछावण्यात निरपराध लोकांच्या केलेल्या छळाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांचेही उत्तर असेच होते की आम्ही फक्त आज्ञापालन करत होतो. आज्ञापालन हा सद्गुण आणि आज्ञाभंग हा दुर्गुण या गृहितकावर हे लोक वर्तन ठरवत होते का?

जिथे आज्ञापालन हे गृहीतच असते म्हणजे जिथे तुम्ही नोकरीत असता तिथे वरिष्ठांच्या आज्ञा पाळणे हे अपेक्षित असते, सैन्यामध्ये असेच अपेक्षित असते, हुकुमशाही राजवटीतही आज्ञापालन ही गोष्ट असते. पण जिथे आज्ञापालनाची सक्ती नाही, अशा ठिकाणी लोकांचे वागणे पूर्णपणे ऐच्छिक असते का? एरिक फ्रॉम या मानसशास्त्रज्ञाचे म्हणणे आहे की व्यक्तीला आपले मत किंवा वर्तन स्वेच्छेने केलेले वाटत असले तरी त्याच्यामागची प्रेरणा स्वतःला एकटे पडू न देण्याची असते. गटात सामील होण्याच्या आंतरिक गरजेपोटी असते. 

गटात सामील होण्यासाठी माणसे स्वतःला योग्य वाटणारी मतेदेखील बदलतात का? सोलोमन अ‍ॅशने याबाबत एक प्रयोग केला. काय केले त्याने? त्याने त्यासाठी आठ माणसांचा गट बनवला. त्यातील सातजण सोलोमनचेच साथी होते. जो आठवा होता त्याला हे काही माहीत नव्हते. त्या आठव्या माणसाचे वर्तन तपासायचे होते. या आठ जणांना एक प्रश्न विचारला जाणार होता. सुरुवातीला सोलोमनच्या सहकाऱ्यांनी बरोबर उत्तर द्यायचे होते. पण नंतर हळूहळू चुकीचे उत्तर द्यायचे होते. त्यासाठी एक साधे कोडे सोलोमनने तयार केले. एका कार्डावर त्याने एक रेषा काढली. आणि दुसर्‍या एका कार्डावर तीन रेषा काढल्या. या तीन रेषांपैकी एक रेषा या पहिल्या कार्डावरच्या रेषेइतक्याच लांबीची होती. उरलेल्या दोन रेषांपैकी एक थोडी जास्त लांबीची तर दुसरी थोडी कमी लांबीची होती. आता या आठी मंडळींना असा प्रश्न विचारण्यात आला की यातील कोणती रेषा पहिल्या कार्डावरील रेषेशी जुळते. गम्मत म्हणजे जसजशी चुकीचे उत्तर देणार्‍या सोलोमनच्या सहकार्‍यांची संख्या वाढायला लागली तसतसा तो आठवा माणूस इतरांशी मिळते जुळते म्हणजे चुकीचे उत्तर देऊ लागला. 

सोलोमनची निरीक्षणे रोचक होती. त्याला आढळले की जेव्हा एखाद्याची मते जगजाहीर होणार असतात (Public होणार असतात) किंवा आजूबाजूला ऐकू जाणार असतात तेव्हा बहुमतासारखे बोलण्याचा, बहुमतासारखे मतप्रदर्शन करण्याचा खूप मोठ्या प्रमाणात कल आढळून येतो.  दुसरे एक महत्त्वाचे वर्तन त्याला आढळले, ते म्हणजे जर सोलोमनच्या सहकार्‍यांपैकी एकाने जर बहुमताच्या विरोधी मत दिले तर चुकीच्या बहुमताच्या बाजूने जाण्याचा कल खूप कमी होतो. म्हणूनच कदाचित विरोधी मत जनतेला ऐकूच येऊ नये म्हणून सत्ताधीश प्रयत्न करत असावेत. याचाच दुसरा अर्थ बहुमताचे म्हणणे चुकीचे आहे, मला पटत नाही असा एखादा आवाज देखील चुकीच्या मताला पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी करतो. 

पण मुळात लोक बहुसंख्येच्या प्रभावाखाली येऊन आपले मत का बदलतात? त्याचे कारण गटाचा दबाव! इतर लोक काय म्हणतील? त्यांना माझे मत आवडले नाही तर. ते वैतागले तर. ते माझ्या मताला हसले तर. याला इंग्रजीत 'सोशल डिसॲप्रुव्हलची' भीती म्हणतात. अर्थात हे सगळे आपले मत जेव्हा गटाच्या मताच्या विरोधी किंवा वेगळे असते तेव्हा होते. 

दुसरी एक स्थिती संभवते, ती म्हणजे ठराविक परिस्थितीत काय करावे हे माहीत नसते तेव्हा किंवा आपले कोणतेच मत तयार झालेले नसते तेव्हा. उदाहरणार्थ आपण दुसर्‍या धर्माच्या देवळात गेलो तर तिथे काय करावे हे आपल्याला ठाऊक नसते. तेव्हा आपण इतर काय करतात ते पाहतो आणि ते करतात तसे करतो. त्यामुळे लोक जर संभ्रमित राहिले आणि त्यांच्या पुढ्यात एखादे मत बहुसंख्यांचे म्हणून प्रचाराने दाखवता आले, तर संभ्रमित लोकांना तसे मत बनवायला किंवा तसे वर्तन करायला भाग पाडता येऊ शकते आणि तेही हा आभास तयार करत की त्यांना ते त्यांचे स्वतःचेच मत वाटावे.

माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या काळात माझा एक मित्र म्हणाला, 'तुला एक गम्मत माहीत आहे का? आपल्याला जे मत आधी कळलेय, ते मत आपले स्वतःचे मत असल्यासारखे आपण त्याच्या बाजूने भांडू लागतो. खरे म्हणजे ते मत आपण शोधलेले नसते. फक्त ते त्याच्या विरुद्ध मताच्या आधी ऐकलेले असते एवढेच! समाजातील बहुतेक भांडणे जीवनात प्रथम ऐकलेल्या मतांना चिकटून बसण्याच्या प्रवृत्तीमुळे होतात. त्यामुळे प्रथम कळलेली, आपल्यासाठी आदराची स्थाने असलेल्या माणसांकडून कळलेली, आतापर्यंतच्या तर्काने योग्य वाटलेली मते योग्य असतीलच असे नाही आणि ती फेटाळून लावणारे पुरावे पुढे आले तर ते स्वीकारण्यात कमीपणा नाही हे आपल्या वागणूकीचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून घेतले तर बराच निरुपयोगी गोंधळ टाळता येईल.'