नशीबाचा फेरा

दुनिया एक भुलभुलैय्या आहे असे म्हटले तर ते खोटे ठरणार नाही. सर्व साधारणपणे लोकांचे जीवन हे एक मार्गी असते. स्वत:च्या घरांत आयुष्य घालवतच लहानाचे मोठे होणे, योग्य वेळी शिक्षण घेणे, संसार थाटणे अशी जीवनातील इतिकर्तव्ये पार पाडत जाणे. लहान मोठी संकटे सर्वांवरच येत असतात. तो तर जीवनाचा अविभाज्य भागच असतो.

Story: हलकं फुलकं | गीता नायक |
01st October 2022, 10:34 pm
नशीबाचा फेरा

सगळ्याच लोकांच्या नशिबी हे सरळसोट जीवन येईलच असे नाही. कारण नसताना कुणी संकटात सापडतो तर कुणाला कैदेची शिक्षा भोगावी लागते. कुणी जत्रेत हरवतो तर कुणा मुलाला पळवून नेतात. शेवटी काय तर आपल्या नशिबातल्या भाग्यरेखा आपण चुकवू शकत नाही. अचानक आलेल्या वादळाने वस्तू कुठल्या कुठे उडून जातात तसेच भाग्यही माणसाला परांगदा करते. रहाटाच्या चक्रासारखे गरगर फिरवते.  

माणूस आपले सुरक्षित घर सोडून परदेश गमन का करतो? 'पोटासाठी दाही दिशा ' ही उक्ती तर सर्वांनाच माहीत आहे. पण नेहमी तेच कारण असते असे नाही. अशीच एक आगळी कथा मी अनुभवली आहे. 

देशोधडीला लागलेली ती एक अपरिचित व्यक्ती  होती? कुठली होती ते मला आठवत नाही . पण त्याचे नाव मात्र माझ्या अजून ध्यानात आहे. " करपय्या " त्याचे नाव. नावावरून  तो गोवेकर नव्हताच हे सांगायची गरज नाही.  ओरीसाचा होता, उत्तर प्रदेशचा होता की बिहारचा मला माहीत नाही. मेंगलोरचाही असू शकेल तो. आपली ओळख त्याने कधीही सांगितली नाही. तमीळ, तेलगू वा  मल्याळम् तसलीच कुठली तरी भाषा तो बोलत होता. तोडकी मोडकी हिंदी व कोंकणीही तो बोलायचा. त्याची कोंकणी  ऐकायला गंमतीशीर  वाटायची. 

हो, तो ना आमच्या ओळखीचा ना परिचयाचा होता. अचानकच तो आमच्या संपर्कात आला होता. आमचे घर म्हणजे नव्या माणसाचे आश्रयस्थान. माझ्या बाबांना ट्रकवर हमालांची गरज असायची अशाच एका ट्रकवर तो कामाला लागला होता. दिवसभर तो अंग मोडून काम करायचा आणि मिळालेल्या पैशांतून थोडी दारू प्यायचा. दारू प्याला तरी आपली मर्यादा तो सोडत नव्हता. संस्कारी वाटत होता. दारूचा ग्लास घशाखाली गेला की तो जरा जास्तच खुशीत दिसायचा. बाबांकडे काम नसले तर सकाळी तो आमच्या अंगणात यायचा. बाहेरच झाडाखाली नाहीतर व्हराड्यांत बसायचा. खूप हसतमुख व बोलक्या होता तो. असेल तो पस्तिशीच्या आसपासचा. जरा गडद रंगाचा आणि कुरळ्या केसांचा होता. हसताना त्याचे पिवळसर दात चटकन उठून दिसायचे. कमरेखाली हाफपँट आणि अंगात अर्धवट बटणे लावलेले  शर्ट असा त्याचा पेहराव. नाही म्हणायला पायात ढगळ जुनी स्लीपर दिसायची.  बोलताना खळखळून निर्व्याज हसणारा तो सहज लक्ष वेधून घेत होता. खिशात पैसे नसले की बाबांकडे दारूसाठी एखादा रुपया मागायचा. पैसे मागताना चेहऱ्यावर एक ओशाळवाणे हास्य असायचे. तो तिन्हीसांजेचा आला की आम्ही त्याची थट्टा करायचो.

  "करपय्या, करपय्या, एक रुपय्या सोरो पिवया " 

आमच्या थट्टेचा त्याला कधी राग येत नव्हता. उलट 'एक रुपय्या सोरपय्या' म्हणत डोके हलवत तोही खळखळून हसायचा. तिन्हीसांजेची आम्ही बस थांब्यावर उतरताना दिसलो तर मागोमाग येत घरापर्यंत सोडून जायचा. दारू कितीही चढलेली असली तरी तोल सावरत तो निर्जन रस्त्यावर आमची सोबत करायचा. चांगुलपणा करायला त्याला कुणी सांगितले नव्हते. ते तर त्याच्या नसानसांतच होते. माझ्या बाबांनी त्याची सोयरीक जुळवण्याचे बरेच प्रयत्न केले पण तो कसाच बदलला नाही. दारूचे व्यसन सोडले तर त्याच्यात दुसरा दुर्गुण नव्हता. त्याला काय दु:ख होते कोण जाणे.  बाबांना त्याची दारूची गरज माहीत होती म्हणून त्याच्या हातावर ते पैसे टेकवायचे. तसा तो सज्जनही होता, विश्वासू होता आणि कामसू ही होता. अशा लोकांना सांभाळायची कला माझ्या बाबांकडे होती. किती तरी वर्षें तो आमच्याकडे कामाला होता. माझे लग्न होऊन मी एकदा माहेरी गेल्यावर तो दिसला नाही. त्याची चौकशी केल्यावर समजले ते तर न्यारेच होते.  एक दिवस म्हणे करपय्याचा शोध घेत काही माणसे  मोटार गाडीतून उतरली. केरळच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्याना करपय्याचा ठावठिकाणा त्यांना सांगितला होता. त्या पत्त्याच्या अनुषंगाने ते आमच्यापर्यंत पोचले होते.  आमच्या दारात करपय्याला पाहून त्यांना आनंद झाला. ती माणसे  त्याला आपल्या बरोबर येण्याचा आग्रह करत होती आणि तो तर ढिम्म् हलायला तयार नव्हता. माझ्या बाबांना ते त्याचे मन वळवायला सांगत होते. पण  बाबा  त्यांना ओळखत नव्हते? आपला परिचय देत ते म्हणाले," हम केरलासे आया है साब। हम इसका लडका लोग है। बहोत साल पहले मेरे भाईके जनम दिनके बाद पिताजी घरसे गायब  हुये।  कितने सालोंसे अम्मा इंतजार करती रही। अन्नाकी राह देखते देखते दादा -दादी भी गुजर गये।  हमारे पहचानवालेसे हमें अन्नाका इधरका पता मिला। इसलिये अन्नाको ढूॅंढते ढूँढते इधर आये है। गाँवमें हमारा बहुत बडा घर है। हम खाते पिते घरके लोग हैं साब। ये देखो हमारी मोटर भी है। पिताजीकी कमी महसूस होती है साब ।" बाबानी करपय्याकडे पाहिले. तो मान खाली घालून बसला होता. "काय रे बाबा घर सोडून का पळून गेलास? घरी भांडण बिंडण झाले का?  बायको आवडत नव्हती की कुठली अडचण होती? भरल्या घरातून परांगदा का झालास बाबा? "  बाबा त्याला प्रश्न विचारत होते आणि हा फक्त मुंडके हलवत होता. शेवटी बाबांनी आवाज चढवला," अरे, सांग पटपट. भरल्या घरातून पळून जायची दुर्बुद्धी  तुला का सुचली?"  आता मात्र करपय्याने चाचरत चाचरत तोंड उघडले, " वो तिसरी बार मेरे घर लडका हुआ था ना, तो किसी बाबाजीने मेरेको बोला की अगर मैं बच्चे का मुॅंह देखूॅं तो मेरे पे आफत आ जायेगी । मैं घरमें किसीको क्या बताता? अपनेही घरमें बच्चेसे मुँह छिपाता कैसे फिरता? इसलिये घर छोडकर मैं भाग निकला।"  ्याचे ते जगावेगळे उत्तर एकून सगळेच चाट पडले. एका बाबाजीच्या भविष्याने त्याला भणंग जीवन जगावे लागले होते. नशिबाने त्या भोळ्या माणसाची थट्टाच केली होती. मुलांना सुबुद्धी सुचली आणि त्याचा नशिबाचा फेरा संपला. बाबांना समजावल्यावर तो त्यांच्या सोबत गावी परतला होता.