पुणे येथील उद्योजकाच्या गाडीला गोव्यात अपघात; पत्नी, मुलगा ठार
पेडणे : तोरसे येथील सरकारी महाविद्यालयासमोर राष्ट्रीय महामार्ग-६६ वरील खड्डा चुकवताना मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात पुणे (महाराष्ट्र) येथील अल्फा केमिकल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पियुष गुंडेच्या यांच्या पत्नी व मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांची मुलगी मायरा आणि त्यांच्या घरी काम करणारी मुलगी जखमी असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.
पियुष गुंडेच्या (३२) हे पत्नी अपूर्वा (३२), मुलगा आव्यान (दीड वर्षे), मुलगी मायरा (४ वर्षे) आणि घरी काम करणाऱ्या ९ वर्षांच्या मुलीसह (एमएच-१२टीएस-८७८०) या कारने पुण्याहून गोव्यात येत होते. तोरसे येथील शाळेजवळ आल्यानंतर काम सुरू असलेल्या महामार्गावरील खड्डा चुकवताना पियुष यांच्या कारची समोरून येणाऱ्या केएल-१०एझेड-८०९६ या मासेवाहू कंटेनरला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. त्यात पत्नी अपूर्वा आणि मुलगा आव्यान जागीच ठार झाले. जखमी अवस्थेत पियुष, मायरा आणि कारमधील मुलीला उपचारांसाठी म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. सध्या पियुष आणि मायरा म्हापसा इस्पितळात उपचार घेत असून, त्यांच्यासोबतच्या मुलीला पुढील उपचारांसाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार तोरसे शाळेजवळ आल्यानंतर महामार्गाचे काम सुरू असल्याने अपूर्वाला रस्ता चुकल्यासारखे वाटले. त्यानंतर तिने समोर खड्डा असल्याचे सांगितले. त्यामुळे खड्डा चुकवण्यासाठी आपण कार वळवली. त्यानंतर पुढे काय झाले ते आपल्याला समजले नाही, असे पियुष यांनी पोलिसांना सांगितले आहे. अपघाताची माहिती मिळताच गुंडेच्या कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे. तर, राष्ट्रीय महामार्गाच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे अपघात आणि त्यातील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने स्थानिकांमधून रस्ता कंत्राटदारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
एका तासाने पोहोचली रुग्णवाहिका
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर एक तास उलटल्यावर १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेला इतका विलंब लागल्याने दोघांचा जीव गेला. रुग्णवाहिका लवकर पोहोचली असती तर दोघांचेही प्राण वाचले असते. कारमधील मुलीला पोलिसांनी स्वतःच्या वाहनातून हॉस्पिटलमध्ये वेळेत पोहोचवल्यामुळे तिचा जीव वाचला.
चक्काचूर कारमधून जखमींना काढले बाहेर
घटनेची माहिती पेडणे अग्निशमन दलाला मिळताच जवानांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला होता. मोठ्या प्रयासाने जवानांनी जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी पुढे पाठवले. पेडणे पोलीस आणि मोपा विमानतळ पोलिसांनी तातडीने धाव घेऊन जखमींना मदत केली. मोपा विमानतळ पोलीस निरीक्षक महेश केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.