सत्तरीच्या विविध भागांत सापडले आणखी १० बांगलादेशी घुसखोर

एकाचा १२ वर्षांपासून नागवेत मुक्काम; आठ दिवसांत २० ताब्यात

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd September 2022, 01:06 am

नागवे-सत्तरी या ठिकाणी बेकायदेशीर भंगारअड्ड्यावर रिकाम्या बाटल्यांचा खच.

वाळपई : दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सत्तरी तालुक्यात गुरुवारी दिवसभरात केलेल्या कारवाईत आणखी १० बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये भुईपाल येथून ४, सालेलीतून ३ व नागवे येथून एकाचा समावेश आहे. या कारवाईमुळे गेल्या आठ दिवसांत ताब्यात घेतलेल्या घुसखोरांची संख्या २० झाली आहे.

बिलाला अन्वर आखोन या घुसखोराला बुधवारी म्हाऊस पंचायत क्षेत्रातील नागवे या ठिकाणाहून एटीएसने ताब्यात घेतले होते. बिलाला हा एका भंगारअड्ड्यावर गेल्या बारा वर्षांपासून काम करत असल्याचे समोर आल्यानंतर परिसरात खळबळ माजली होती. हा भंगारअड्डा बेकायदेशीर आहे. बिलालाची चौकशी केली असता, सत्तरी तालुक्याच्या विविध भागांत बांगलादेशी राहत असल्याचे समजले. त्याने दिलेल्या माहितीनुसार तपास केला असता वरील नऊजण सापडले. सालेली येथील एका फार्मवर तीन बांगलादेशी नागरिक काम करीत होते. दरम्यान, या दहा जणांना पकडल्यानंतर वाळपई, सत्तरी भागातील भंगारअड्डे व तेथे काम करणारे, यांच्याविषयी संशय बळावला आहे.

एटीएम फोडणाऱ्यांना देत होता जामीन

बिलाला याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात बँकांचे एटीएम फोडण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. या प्रकरणांत ज्या बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली होती, त्यापैकी अनेकांना बिलाला याने स्वतःहून जामीन दिला होता. विशेष म्हणजे, जामिनावर सुटणाऱ्या संशयितांना बिलाल नागवे येते आणून ठेवत होता. यामुळे बिलाला याचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असण्याची शक्यता बळावली आहे.

हेही वाचा