गतवर्षी राज्यात ३५ वर्षांखालील १३० तरुणांचा अपघाती मृत्यू

एकूण बळींपैकी तब्बल ४५ टक्के मृत्यू तरुणांच्या वाट्याला

Story: प्रसाद शेट काणकोणकर। गोवन वार्ता |
10th July, 11:42 pm
गतवर्षी राज्यात ३५ वर्षांखालील १३० तरुणांचा अपघाती मृत्यू
⚠️ गोवा रस्ता अपघात अहवाल २०२४
२,६८२ अपघातांमध्ये २८६ मृत्यू | ३५ वर्षाखालील ४५% मृत्यू

पणजी : गोव्यात २०२४मध्ये झालेल्या रस्ता अपघातांनी धोक्याची पातळी गाठली असून, वर्षभरात २,६८२ रस्ता अपघातांत एकूण २८६ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः यामध्ये ३५ वर्षांखालील १३० तरुणांचा समावेश असून, ही संख्या एकूण मृत्यूंच्या तब्बल ४५ टक्क्यांहून अधिक आहे. या अपघातांत ११३ पुरुष आणि १७ महिलांचा समावेश आहे. वार्षिक अपघात विश्लेषण अहवालातील ही आकडेवारी राज्यातील तरुणांसाठी गंभीर इशारा देणारी आहे.

286
एकूण मृत्यू
130
३५ वर्षाखालील मृत्यू
1,041
जखमी झालेले
वयोगटानुसार अपघातांचा तपशील

२०२४ मध्ये झालेल्या अपघातांमध्ये एकूण १,०४१ जण जखमी झाले, ज्यात ८८८ पुरुष आणि १५३ महिला होत्या. अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक बळी ४५ ते ६० वयोगटातील प्रत्येकी ६९ जणांचे (२४.१२ टक्के) झाले आहेत. याच वयोगटातील १४० जण जखमी झाले होते.

आकडेवारीनुसार, १८ वर्षांखालील सहा अल्पवयीन मुलांचा अपघाती मृत्यू झाला (२.०९ टक्के), तर याच वयोगटातील २१ मुले जखमी झाली होती. १८ ते २५ वयोगटातील ६१ जणांचा मृत्यू झाला (२१.३२ टक्के), तर याच वयोगटातील २२४ जण जखमी झाले. २५ ते ३५ वयोगटातील ६३ जणांचा मृत्यू झाला (२२.०२ टक्के) आणि ३१५ जण जखमी झाले. ३५ ते ४५ वयोगटातील ५१ जणांचा मृत्यू झाला (१७.८१ टक्के), तर २५६ जण जखमी झाले होते. ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील ३६ जणांचा मृत्यू झाला, तर याच वयोगटातील ८४ जण जखमी झाले होते.

२०२३ वर्षाच्या तुलनेत किंचित दिलासादायक

वार्षिक विश्लेषण अपघात अहवालानुसार, २०२४ मध्ये राज्यात २८६ अपघाती मृत्यू झाले. ही आकडेवारी २०२३ वर्षाच्या तुलनेत किंचित दिलासादायक असली तरी, परिस्थिती अजूनही गंभीर आहे. २०२३ मध्ये २,८४६ अपघातांमध्ये २९० जणांचा मृत्यू झाला होता. या तुलनेत २०२४ मध्ये अपघातांची संख्या ५.७६ टक्क्यांनी (१६४ अपघात) तर अपघाती मृत्यूंची संख्या १.३८ टक्क्यांनी (४ मृत्यू) कमी झाली आहे.

वयोगट पुरुष मृत्यू महिला मृत्यू जखमी पुरुष जखमी महिला
१८ वर्षांखालील 05 01 17 05
१८ ते २५ 54 07 203 21
२५ ते ३५ 54 09 273 42
३५ ते ४५ 46 05 221 35
४५ ते ६० 55 14 107 33
६० वर्षांवरील 27 09 67 17
एकूण 241 45 888 153
निष्कर्ष

वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते की, गोव्यातील रस्ता अपघातांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. विशेषतः तरुण वयोगटातील मृत्यूंचा वाटा अत्यंत भीतीदायक आहे. २०२३ च्या तुलनेत किंचित सुधारणा झाली असली तरी, रस्ता सुरक्षेबाबत अधिक जागरूकता आणि कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रत्येक मृत्यू ही एक संपूर्ण कुटुंबाची तोटा असल्याचे लक्षात घेऊन, सर्वांनी रस्ता सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.