बेतोड्यात दुचाकीच्या भीषण अपघातात विद्यार्थिनीसह युवक ठार
दुर्घटनेत दोघे गंभीर; होमिओपॅथी महाविद्यालयाची विद्यार्थिनी
Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th July, 12:10 am

⚠️ दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू
बेतोडा येथील भीषण अपघातात विद्यार्थिनी ईशा गावस आणि आदित्य देसाई ठार
आदित्य देसाई
ईशा गावस
फोंडा : बेतोडा येथील बगल रस्त्यावर गुरुवारी दुपारी दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका विद्यार्थिनीसह युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका युवकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
काय घडले गुरुवारी?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ईशा गावस (रा. केरी-सत्तरी) ही विद्यार्थिनी जागीच ठार झाली. दुसऱ्या दुचाकीवरील आदित्य देसाई (रा. बेतोडा) याचाही या अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला.
आदित्य देसाई रस्त्याच्या उजव्या दिशेने आला, तर डावीकडून समोरून अदिती उमेश मांद्रेकर (रा. तुळशीमळा, पर्ये-सत्तरी) आणि ईशा गावस प्रवास करत होत्या. आदित्यच्या स्कूटरची अदितीच्या स्कूटरला जोरदार धडक बसली, ज्यामुळे हा अपघात घडला. अपघातात आदित्यच्या मागे बसलेला योगेश पाटील (रा. महाल, कुर्टी) हा युवक गंभीर जखमी झाला असून प्रकृती गंभीर आहे.
विद्यार्थिनींची पार्श्वभूमी
अदिती आणि ईशा या शिरोडा येथील कामाक्षी होमिओपॅथी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या. बुधवारीच त्यांचा निरोप समारंभ झाला होता. मात्र काही कामानिमित्त गुरुवारी त्या पुन्हा महाविद्यालयात आल्या होत्या. महाविद्यालयातून परत येत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करून ईशा गेली...
शिरोडा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेणारी ईशा गावस ही नुकतीच वैद्यकीय परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. वडिलांची आपल्या लेकीला डॉक्टर करण्याची तीव्र इच्छा होती आणि ती पूर्ण झालीसुद्धा. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. पण नियतीला हे सुख जणू मंजूरच नव्हते. काही कागदपत्रांसाठी शिरोडा येथे गेलेली ईशा परतीच्या वाटेवर अपघातात कायमची निघून गेली. वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले, पण तो आनंद क्षणभंगुर ठरला.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
×