कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके ?

Story: अनुभव | डॉ. रुपेश पाटकर |
17th September 2022, 10:19 Hrs
कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके ?

तुमचा मेंदू आणि मन एकदम नॉर्मल असताना तुम्हाला वेडं बनवलं जाऊ शकतं का?' असा एक मजेशीर प्रश्न माझ्या सिनियरने मला विचारला. तेव्हा मी सायकीयॅट्रीमध्ये नवखा होतो. त्यामुळे माझं या प्रश्नाला उत्स्फूर्त उत्तर 'नाही' असंच होतं, अर्थात त्याला एक पुरवणी होती, ती म्हणजे वेडं बनवता आलं नाही तरी शेंडी लावता येऊ शकते, जसे मासळी बाजारात मासे विकणारा 'ताजे मासे आहेत' असे सांगून नासके मासे गळ्यात घालतो. 

सिनियरने विचारले, 'फाॅली ए डिऑक्स' ऐकलेस का?'

'नाही!'

'मग उद्या वाचून ये,' असा आदेश वजा विनंती करून तो निघून गेला. मेडिकल कॉलेजमध्ये सिनियर्स असेच करतात. आधी प्रश्न विचारतात आणि तुम्हाला उत्तर सांगता आले नाही की तुम्हालाच दुसर्‍या दिवशी वाचून यायला सांगतात. आपण सांगतंच नाहीत. आणि दुसर्‍या दिवशी आठवणीने मात्र  विचारतात, विसरत नाहीत. 

मी जेव्हा पाठ्यपुस्तकाच्या इंडेक्समध्ये जाऊन 'फाॅली अ डिऑक्स' वाचलं तेव्हा धक्का बसला. एकाचे खूळ दुसर्‍याला लागणे म्हणजे 'फाॅली ए डिऑक्स' होय! पण हा संसर्ग जंतूंचा नाही बरे का. घरातील डाॅमिनंट व्यक्ती, म्हणजे वजनदार व्यक्तीचा भ्रम तिच्या प्रभावाखालील व्यक्तींना खरा वाटू शकतो. म्हणजे घरातील प्रमुख व्यक्ती, उदाहरणार्थ बाबा असे म्हणू लागले की त्यांच्या विरोधात काहीतरी कारस्थान शिजतंय, त्यांना अडकवायला पोलीस त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. ते साध्या वेषात नाक्यावर यांच्यासाठीच पाळत ठेवून असतात, तर त्यांच्या मुलालाही ते खरे वाटते. कधीकधी घरातील सगळ्यांनाच ते खरे वाटू शकते. यातील त्या बाबांना औषधोपचार करावे लागतील आणि त्यांच्या मुलाला बाबांपासून वेगळे ठेवले तरी त्याचा भ्रम हळूहळू कमी होऊ शकेल.

मी जेव्हा दुसर्‍या दिवशी माझ्या सिनियरला मला काय सापडलं ते सांगितलं तेव्हा तो म्हणाला,'हे एका कुटुंबाचं झालं, पण मोठ्या प्रमाणात लोकांना वेड लावता येईल का? हे वेड म्हणजे गाण्याचे वेड किंवा भरवून जाणे नव्हे, बरे का. तर लोकांना खुळ्यासारखे काहीही करायला लावणे शक्य आहे का? एखादा माणूस किंवा संप्रदाय किंवा पक्ष किंवा संघटना लोकांना वेडे करू शकेल का? म्हणजे तिच्या अनुयायांना खून किंवा सामूहिक आत्महत्या करायला लावू शकेल का?'

मला उत्तर सुचेना. मग तोच म्हणाला, 'जोन्सटाऊन ट्रॅजेडी' ठाऊक आहे का?'

मी 'नाही' म्हणालो आणि अर्थातच ती काय आहे हे शोधण्याचे काम अंगावर पडले. माझ्या विद्यार्थीदशेत मोबाईल नव्हते, मग गूगल सर्च तर कल्पनेतदेखील नाही. लायब्ररी हाच आधार. वाॅर्डमधले काम आटोपून लायब्ररीत जाणे हे थकवून टाकणारे असे. पण असे काही विचित्र शोधून काढायला सांगण्यात आले की अंगात उत्साह संचारे.

शेवटी एकदाची जोन्सटाऊनची माहिती मिळाली. या जोन्सटाऊनमध्ये १९७८ साली तब्बल ९१८ जणांनी सामूहिक आत्महत्या केली होती. हे सगळे लोक 'पीपल्स टेंपल' नावाच्या एका संप्रदायाचे साधक होते. हा 'पीपल्स टेंपल' संप्रदाय केव्हा तयार झाला? कोणी तयार केला? तो कसकसा वाढत गेला हे सगळेच इंटरेस्टिंग आहे. 

१९५६ मध्ये अमेरिकेतील इंडियाना राज्यातील जीम जोन्स या माणसाने या संप्रदायाची स्थापना केली. हा जीम फर्डा वक्ता होता. तो आपल्या भाषणातून 'वर्णभेद करू नये, रंजल्या गंजल्याची सेवा करावी' वगैरे उपदेश करी. जीमने मिशनरी म्हणून ब्राझीलमध्ये काम केले होते. तिथे तो एक अनाथआश्रम देखील चालवत होता. वैयक्तिक जीवनातदेखील तो समानता दाखवत होता. त्याच्या एकूण आठ मुलांपैकी केवळ एकच त्याचे स्वतःचे होते, उरलेली सात त्याने दत्तक घेतली होती आणि तीदेखील आफ्रिकी, चिनी, कोरियन वगैरे वंशांची. 

१९६५ साली तो आपल्या सुमारे शंभर अनुयायांना घेऊन उत्तर कॅलिफोर्नियात रहायला गेला. हळूहळू त्याचे अनुयायी वाढत गेले. गम्मत म्हणजे तो वेगवेगळ्या सभांना रेडीमेड श्रोते पुरवू लागला. त्यामुळे त्याचे राजकीय वजन वाढत गेले. 

त्याचे कार्यक्रम वैशिष्टय़पूर्ण होते. आधी तो गोरगरिबांना मदत करी. अशी मदत करण्यासाठी कार्यक्रम घेई. त्यानंतर तो लोकांसाठी देवाचे आशीर्वाद मिळवणारे सत्संग घेई. लोकांना त्याच्या या सत्संगात बरे वाटे. हळूहळू त्याच्या स्पर्शानेच आजार बरे होतात असे म्हटले जाऊ लागले. त्याने त्यानंतर आपण कॅन्सरदेखील बरा करत असल्याचा दावा केला. गम्मत म्हणजे कॅन्सर बरा करण्याचे तो डेमाॅन्स्ट्रेशन देऊ लागला. तो कॅन्सर झालेल्या पेशंटला तोंड उघडायला सांगे आणि त्याच्या तोंडातून मांसाचा तुकडा बाहेर काढे. एकदा त्याच्या एका सत्संगाच्या वेळेस जेवण संपले, तेव्हा आपण चमत्काराने स्वयंपाक घरात जेवण उत्पन्न केल्याचे त्याने सांगितले. त्याने निर्माण केलेले चमत्कारिक जेवण साधकांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात रुचकर जेवण लागले. दरम्यान, आपापसातील गप्पांच्या ओघात एका अनुयायाने हे चमत्कारिक जेवण जवळच्या खानावळीतून आणल्याचे म्हटले. आणि काय आश्चर्य त्याच्यावर देवाचा कोप झाला. संध्याकाळपर्यंत तो उलट्या आणि जुलाबांनी जर्जर झाला आणि त्याने त्याच्या पापाची जाहीर माफी मागितली. 

जीम आता त्याच्या अनुयायांना प्रेषित वाटू लागला. त्याचा उल्लेख 'फादर' म्हणून त्याचे शिष्य करत. त्याच्याकडे येणार्‍या वर्गणीला आता तोटा नव्हता. त्याचे अनुयायी आपली संपूर्ण निष्ठा व्यक्त करण्यासाठी स्वतःची सर्व संपत्ती त्याला अर्पण करू लागले. कुटुंबाच्या, बायका-मुलांच्या माया मोहापासून तो आपल्या अनुयायांना दूर राहण्याचा उपदेश करू लागला. मुले आता व्यक्तीगत न राहता 'पीपल्स टेंपल'ची जबाबदारी बनली. स्वतःची मुले म्हणणे म्हणजे स्वार्थ म्हटले जाऊ लागले. 

सगळे अगदी आलबेल चालले होते असेही नाही. त्याच्या संप्रदायातून बाहेर पाडणारे त्याच्यावर फसवणुकीचे आरोपही करीत. पण प्रेषिताला टीकेला सामोरे जावेच लागते असे म्हणून या आरोपांकडे दुर्लक्ष करण्यात येई. 

सगळेजण सलोख्याने आणि समृद्धीने राहत असलेल्या स्वर्गीय समाजाच्या निर्मितीचे स्वप्न तो आपल्या अनुयायांना दाखवू लागला. विषमतेने भरलेल्या अमेरिकन समाजातील अनेकांना त्याने दाखवलेले स्वप्न आकर्षित करू शकले. जीमने अमेरिकेच्या बाहेर एक आदर्श वसाहत उभी करण्याचे ठरवले. अमेरिकी सरकार त्याच्या स्वप्नाच्या विरुद्ध असल्याचे तो आपल्या अनुयायांना सांगू लागला. १९७३ मध्ये त्याने द.अमेरिकेतील गयनामध्ये एक भूखंड भाड्याने घेतला. ही जागा गयानातील घनदाट जंगलात होती. त्यामुळे सगळी सामुग्री बाहेरूनच आणावी लागे. त्यामुळे तेथील बांधकाम सावकाश चालू होते. १९७७ च्या सुरुवातीला त्याच्या या वसाहतीत फक्त ५० लोक होते. जीम अजूनही कॅलिफोर्नियातच राहत होता. १९७७ च्या मध्यावर अचानक त्याने गयानाला जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या सुमारे हजारभर अनुयायांना घेऊन तो गयानातील त्या वसाहतीत रहायला आला. या वसाहतीला 'जोन्सटाऊन' असे नाव देण्यात आले. 

त्याचे अनुयायी जेव्हा तिथे रहायला गेले तेव्हा त्यांना आढळले की त्यांच्या कल्पनेतील ते नंदनवन नव्हते. सगळ्या लोकांना राहण्यासाठी तिथे पुरेश्या खोल्या देखील नव्हत्या. पुरुष आणि स्त्रियांची राहण्याची व्यवस्था वेगवेगळी ठेवण्यात आली होती. त्यामुळे तिथे पोचल्यावर सर्व दाम्पत्यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले. तिथल्या दमट आणि उष्ण हवेमुळे अनेकजण आजारी पडले. तिथे राहणाऱ्यांना दिवसाचे ११ - ११ तास काम करावे लागे. जोन्सटाऊनमध्ये सगळीकडे जीमचे उपदेश ऐकू येतील अशी योजना करण्यात आली होती. 

येथून पळून जाणे शक्य नव्हते कारण वसाहत जंगलाने वेढलेली होती आणि तिच्याभोवती पहारा द्यायला सशस्र पहारेकरी होते. इथे आणखी एक गोष्ट केली जाई. आपल्या या खडतर जीवनातदेखील आनंद मिळत असल्याबद्दल जीमचे उपकार मानण्याचा उपचार रोज पार पडला जाई.

अमेरीकेतून जोन्सटाऊनमध्ये आलेल्या मंडळींच्या नातेवाईकांना त्यांची  काहीच खबर मिळेना, म्हणून त्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी अनेक खटपटी करून सरकारला जोन्सटाऊनला शिष्टमंडळ पाठवायला भाग पाडले. लिओ रायन नावाचे खासदार, काही नातेवाईक मंडळी आणि पत्रकार यांना घेऊन १७ नोव्हेंबर १९७८ ला जोन्सटाऊनच्या भेटीवर आले. त्यांना प्रथमदर्शी सर्व काही सामान्य वाटले. सगळे साधक तेथील वास्तव्याविषयी  भरभरून बोलत होते. परंतु रात्री जेवणाच्या वेळी खासदार साहेबांच्या हातात एका साधकाने गुपचूप एक चिठ्ठी दिली. दुसर्‍या दिवशी हे शिष्टमंडळ परत जाणार होते. जाण्याआधी त्यांनी साधकांना म्हटले की ज्यांना कोणाला त्यांच्यासोबत अमेरिकेला यायचे असेल त्यांनी यावे. हाताच्या बोटावर मोजण्याइतके शिष्टमंडळासोबत जायला निघाले. जोन्सटाऊनपासून विमानतळावर जाणार रस्ता अर्थातच निबिड जंगलातून होता. ते विमानतळावर जात असताना वाटेत अचानक त्यांच्यावर गोळीबार सुरू झाला. खासदार रायनसह पाचजण ठार झाले.

इकडे जोन्सटाऊनमध्ये जीमने सर्वांना सभागृहात बोलावले. सगळे जमताच तो म्हणाला, 'आता लवकरच रायन मारला जाईल असे मला दिसतेय आणि त्याच्या मृत्यूचा सूड घ्यायला अमेरिकी सरकार जोन्सटाऊनवर हल्ला करेल. ते आपल्या मुलांवर आणि म्हातार्‍या माणसांवर अनन्वित अत्याचार करतील. आपण हे होऊ देता कामा नये. म्हणून आपण आता क्रांतिकारी कृती करायला हवी. आपण 'क्रांतिकारी आत्महत्या' करायला हवी.' त्याच्या या आदेशाला तिथे जमलेल्या मंडळींपैकी फक्त एका साधिकेने विरोध केला. ती म्हणाली, 'फादर, या परिस्थितीत दुसरा काहीतरी उपाय सांगा.' त्यावर जीम म्हणाला, 'आपण प्रत्येकजण कधी ना कधी मारणारच आहोत. मग मरणाला का घाबरायचं?' सगळ्यांनी जेम्सचे म्हणणे उचलून धरले आणि त्या साधिकेचीच निंदा केली. एकटी पडलेली ती बिचारी गप्प झाली. त्यानंतर सायनाईड मिसळलेले पेय आणण्यात आले. आधी ते तिथल्या मुलांना देण्यात आले. तब्बल २७६ मुलं मारण्यात आली. त्यानंतर मोठ्यांनी ते पेय घेतले. शक्यता आहे की काहीनी ते प्यायला नकार दिला असेल, त्यांच्यावर इतरांनी जबरदस्ती केली असेल. जीमने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. तिथे एकूण ९१८ मृतदेह मिळाले. 

प्रश्न असा आहे की हे का घडलं? जीम वेडा असू शकतो, पण त्याचा हा घातकी वेडेपणा इतरांनी का स्विकारला?

आपण पाहीले की जीम हा प्रभावी वक्ता होता. आपली मते दुसऱ्यावर बिंबवण्याची त्याच्यात क्षमता होती. तरुण जीम गरिबी, वर्णभेद, विषमता वगैरे सामन्यांच्या रोजच्या जीवनाशी निगडित विषयांवर बोले. त्यामुळे कृष्णवर्णीय, गरीब, अडचणींनी गांजलेले लोक त्याच्याभोवती गोळा होत. तो करत असलेली गरिबांची मदत, अनाथ आश्रम चालवणे वगैरे गोष्टी समाजातील संवेदनशील व्यक्तींना आकर्षित करू लागल्या. वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक पीपल्स टेंपलचे अनुयायी बनू लागले. तो पद्धतशीरपणे अनुयायांच्या मनात स्वतःला प्रेषित म्हणून स्थापित करू लागला. त्याच्या चमत्कारांमध्ये हातचलाखी तर होतीच, शिवाय प्रेक्षकांना प्रभावित करण्याची तंत्रे देखील होती. तो जाहीर सभेमध्ये एखाद्याला त्याच्या आशीर्वादाने 'बरे वाटले का?' म्हणून विचारी. आता विचार करा की त्याच्याच सभेत, त्याच्या अनुयायांच्या गराड्यात कोण आपल्याला तुझ्या आशीर्वादाचा काहीही फायदा झाला नाही म्हणून सांगायचे धाडस करेल? सामूहिक दबावाखाली आलेले 'बरे वाटले' हे उत्तर बघ्यांच्यात जीम खरोखरच लोकांना बरे करतो असा भ्रम तयार करी. अनेक अनुयायांना त्याचे चमत्कार पटत नसले तरी अज्ञानी लोकांना सोबत आणण्यासाठी असे करावे लागते असा ते विचार करीत. 

तो आपल्या अनुयायांना स्वतःवर भावनिकदृष्ट्या परावलंबी करू लागला. 'तुमच्या पापांची शिक्षा मी घेतो, तुमच्या संकटात मीच तुमच्या सोबत असतो,' असे सांगून तो त्याच्या अनुयायांसाठी भावनिक आधार बनू लागला. 'तुमचे प्रेम तुमच्या कुटुंबापुरते संकुचित न ठेवता  त्याला विशाल बनवा. माझी मुलं, माझी बायको, माझं कुटुंब हा मीपणा सोडा. रंजले गांजलेले लोक तुमचे कुटुंब आहेत. त्यांच्यासाठी काम करणारे पीपल्स टेंपल तुमचे कुटुंब आहे. तुम्ही देवावर प्रेम करा. देवाने पाठवलेल्या प्रेषितावर प्रेम करा' वगैरे. या उपदेशामुळे त्याचे अनुयायी कुटुंबापासून दूर जाऊ लागले. मुलांची कस्टडी पीपल्स टेंपलने घेतली. मुलांपासून, कुटुंबापासून, नातेवाईकांपासून तुटल्यामुळे त्यांचे जेम्सवर भावनिक परावलंबित्व आणखी वाढले. निस्वार्थी होण्याच्या नादात त्यांनी आपली संपत्ती पीपल्स टेंपलला दिली. त्यांचे जाहीर कौतुक होई, पण त्यांचे आर्थिक परावलंबित्व तयार झाले. जीमच्या 'सगळा समाज कसा चंगळवादी आहे, तो कसा पीपल्स टेंपलच्या समतेच्या प्रयत्नांना अपप्रचार करून हाणून पडू इच्छितो,' वगैरे भाषणांमुळे साधक इतर समाजापासून चार हात लांब राहू लागले. त्यामुळे त्यांना संप्रदाय सोडून इतर काहीच माहिती मिळायची बंद झाली. त्यांच्या माहितीवर नियंत्रण आले. अवतीभवती एकाच तर्‍हेने विचार करणारी मंडळी असल्यामुळे त्यांच्या मनात येणारे विचारदेखील मर्यादित झाले. साधकांची जीमवरील निष्ठा वाढवण्यासाठी आणखी एक प्रयोग करण्यात आला. साधकांच्या आजूबाजूला कोणत्याही साधकाने संप्रदायाच्या  मतापेक्षा वेगळे मत मांडले तर ते जीमला सांगणे हे निष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले आणि जीम त्याची परीक्षादेखील घेऊ लागला. त्यामुळे आजूबाजूला कोण खरे आणि कोण परीक्षा घ्यायला खोटे बोलतोय, हेच समजेनासे झाले. त्यामुळे विरोधी मत मांडणे बंदच झाले. थोडक्यात, जीमने त्याच्या साधकांच्या विचार, भावना, वर्तन आणि माहितीवर ताबा मिळवला आणि सहाजिकच ते त्याचे एकनिष्ठ गुलाम बनले. जोन्सटाऊन जंगलाने वेढलेले असल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट बनली. अख्खे जग शत्रू म्हणून त्यांच्या मनावर बिंबवले गेले. त्यामुळे जीमच्या सामूहिक आत्महत्येच्या खुळाला फारसा विरोध झाला नाही.

जोन्सटाऊन वाचताना मला आणखी एक संदर्भ मिळाला, तो म्हणजे मिलग्रामच्या प्रयोगाचा. मिलग्रामच्या पुढ्यात एक प्रश्न होता, तो म्हणजे हिटलरच्या राजवटीचा. हिटलरने त्याच्या सत्तेखाली लाखो निरपराध लोकांना क्रूरपणे ठार मारले. त्याच्या या क्रूर आज्ञा त्याच्या अधिकार्‍यांनी कशा काय मानल्या? त्यांना काहीच कसे वाटले नाही. हिटलर हा क्रूर माथेफिरू असू शकेल पण त्याचे सगळेच अनुयायी तर क्रूर नसतील ना. 

मिलग्रामला त्याच्या प्रयोगात असे आढळून आले की 'लोक आपल्या नीतिमूल्यांच्या विरोधी जाऊन देखील आज्ञापालन करू शकतात. ते हुकुमावरून दुसर्‍याला छळू शकतात.' चंद्रसिंग गढवालीसारखा वरीष्ठांच्या क्रूर आज्ञा फेटाळून शिक्षा भोगायला तयार असणारा शहाणा माणूस क्वचितच असतो. 

हे सगळे वाचल्यावर मनात आले की शहाण्यासुरत्या समजल्या गेलेल्या लोकांच्या खांद्यावर देखील त्यांचेच डोके राहील असे नाही. आपण जर बेसावध राहिलो तर 'न धरी शस्त्र करी' म्हणणारे युक्तीच्या चार गोष्टी सांगता सांगता आमच्या हातात आमच्याच बांधवांविरुद्ध लढण्याचे शस्त्र केव्हा देतील आणि वर भगवान कृष्णाचाच दाखला कसा देतील हे सांगता यायचे नाही.