इजिप्तमध्ये चर्चला आग; चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू

राजधानी कैरोमध्ये गिझा शहरातील घटना : मृतात ३५ चिमुकल्यांचा समावेश

|
14th August 2022, 11:55 Hrs
इजिप्तमध्ये चर्चला आग; चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू

कैरौ : इजिप्तच्या गिझा शहरातील चर्चला लागलेल्या आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत मृत्यू झालेल्यांमध्ये ३५ लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी ५ हजार लोक उपस्थित होते. इजिप्तची राजधानी असलेल्या कैरोमधील गिझामध्ये रविवारी ही घटना घडली आहे.

इजिप्तची राजधानी कैरौमधील गिझा येथील चर्चमध्ये ५ हजार लोक प्रार्थनेसाठी जमले होते. नेमक्या त्याचवेळी चर्चला आग लागल्याने लोक सैरावैरा पळू लागले. यामुळे चर्चमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यात ४१ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुले, चर्चमधील धर्मगुरू आणि नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. या घटनेतील जखमींची संख्या अद्याप समोर आलेली नाही. चर्चला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे.

अबू सेफिन चर्चला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. चर्चची इमारत जुनी असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली. आग लागल्याने चर्चमधील नागरिकांनी पळापळ सुरू केली आणि यामुळे चेंगराचेंगली झाली. यामुळे गुदमरून अनेकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिकअसल्याचे सांगण्यात येत आहे.

चर्चमध्ये लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जखमींना आणि मृत व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इजिप्तच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार ५५ जण जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते होसाम अब्देल गफर यांनी याबाबत माहिती दिली. अध्यक्ष अब्देल फत्ताह एल सिस्सी यांनी कॉप्टिक ख्रिश्चन पोप तावद्रोस यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.