चिंचणी येथे स्वयंअपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू


14th August 2022, 11:16 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव :
चिंचणी येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार शॉन फ्रान्सिस पिंटो (वय २४, रा. वेळ्ळी) याचा मृत्यू झाला. ही अपघाताची घटना १३ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली होती. जखमी चालकाला १०८ रुग्णवाहिकेने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती जखमी चालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
चिंचणी याठिकाणी शनिवारी रात्री अपघात झाल्याची माहिती अनोळखी व्यक्तीकडून पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घटनास्थळी अपघातग्रस्त होंडा अविएटर गाडी दिसून आली. तर घटनास्थळावर प्रत्यक्षदर्शी ग्लीन फर्नांडिस याने स्वयंअपघातात चिंचणीवरून देवसूच्या दिशेने जाणारा दुचारीस्वार जखमी झाल्याचे सांगितले. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात जखमीवर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळातील शवागारात ठेवण्यात आले आहे.