चीनसोबतचे संबंध चांगले नाहीत

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची कबुली

|
14th August 2022, 12:20 Hrs
चीनसोबतचे संबंध चांगले नाहीत

नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताचे चीनसोबत चांगले संबंध नसल्याची कबुली दिली आहे. भारत-चीन संबंधांत काहीच आलबेल नाही. चिनी सैन्याने सीमा भागात डेरा टाकला आहे. चीनने शांतता भंग केली तर त्याचे परिणाम दोन्ही देशांच्या संबंधांवर पडतील, असेही ते म्हणाले.
बंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत परराष्ट्रमंत्री पुढे म्हणाले की, भारत आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कमांडरस्तरीय चर्चेच्या १५ फेऱ्या झाल्या आहेत. दोन्ही पक्षांनी समिपच्या ठिकाणांवरून मागे हटण्याची तयारी दर्शविली आहे. पण अद्याप काही भागांतून चीन मागे हटलेला नाही. सीमेवर स्थिती सामान्य नसेल तर संबंध सामान्य कसे असतील?
२०२० पासून भारत-चीन संबंधांत वितुष्ट
जून २०२० मध्ये चीन व भारतात गलवान खोऱ्यात हिंसक झडप झाली होती. त्यात दोन्ही देशांचे जवान हुतात्मा झाले होते. या घटनेनंतर चर्चेच्या पंधराहून अधिक फेऱ्या झाल्या. अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. पेंगोंग त्सो सरोवराचा एक भाग तिबेट व दुसरा लडाखमध्ये आहे. सीमेवर दोन्ही देशांचे जवळपास ५० ते ६० हजार सैनिक आहेत.