बॅंकेची पायरी

Story: व्यक्ति-चित्र की विचित्र ! | अ‍ॅड. स्वा� |
13th August 2022, 11:20 pm
बॅंकेची पायरी

आजच्या जगात बँक अटळ आहे. संगणकावर जरी सर्व कामे पटापट होत असली तरी एकदा तरी आयुष्यात बँकेच्या दाराला पाय लावून यावेच लागते. बँकेच्या कर्मचाऱ्यांवर बरेचसे विनोद प्रचलित असले तरी माझा आजपर्यंतचा बँकेचा अनुभव फारसा वाईट नाही. एक दोन अपवाद सोडले तर माझ्या नशिबात कर्मचारीही बऱ्यापैकी सोज्ज्वळच आलेत. पण तरीही मी बँकेची धास्ती घ्यायचे कारण म्हणजे एका बऱ्यापैकी प्रचलित बँकेचे टेलर काका.

 एका रम्य दुपारी मी बँकेत काही पैसे जमा करायला गेले होते. रक्कम माझ्या मते जरा मोठीच होती. आपल्या कष्टाचा पैसे भले दुसऱ्या कुणाला कमी वाटेल पण आपल्यासाठी मौल्यवानच असतात, नाही का? तर मी घरून बँकेत भरायचे पैसे आणि वरखर्चाचे पैसे असे एकत्रच पाकिटात ठेवून आणले होते. बँकेत शिरताना पहिली धोक्याची घंटा आत वाजतच होती. एक वयस्कर काका मोठ्यामोठ्याने “मे आय हेल्प यु?” च्या खिडकीवर काहीतरी सांगत होते.

मनुष्यस्वभावाला अनुसरून मी माझ्या कामाचे नसेल, त्यात आणि भांडाभांडीचे प्रकरण असेल तर दुर्लक्ष फेकून मारते आणि माझ्या कामाला लागते. पण आज नेमकी मला “हेल्प”वाल्या काकूंची मदत हवी होती. त्या बाईंनीही काकांशी बोलता बोलताच मला हवा असलेला फॉर्म काढून दिला. काका तावातावाने, “अरे त्याला सांगा मी ओपरेशन करून घेतो त्यांचे वाटल्यास पण ही काय पद्धत झाली? दुसरीकडे तर कधीच कामावरून काढून टाकले असते अश्या लोकांना!” असे ओरडत होते. खिडकीवरच्या बाई चक्क काकांची समजूत काढत होत्या, “आम्हीही सांगितले त्यांना सुट्टी घ्यायला पण ते ऐकत नाहीत तर आम्ही काय करणार?”मला ते दोघे कुणाबद्दल बोलता आहेत ह्याचा काही केल्या बोध होत नव्हता.

यथोचित फॉर्म भरून मी पैसे जमा करायला दुसऱ्या खिडकीपाशी गेले. माझ्या पुढे एक दोन लोक होते. मी म्हटले तोपर्यंत पैसे मोजून ठेवेन कारण मी वेंधळ्यासारखे सगळे पैसे एकत्र आणले होते. माझे पैसे मोजून पूर्ण व्हायच्या आतच समोरचे लोक अंतर्धान पावले. खिडकीमागचे काका माझ्या अंगावर खेकसले. मी त्यांना “मोजतेय” अशी खूण केली तर चिडलेच माझ्या अंगावर. आपल्या खुर्चीतून उभे राहून त्यांनी माझ्या हातातले पैसे जवळजवळ हिसकावून घेतले. बँकेत उभी नसते तर मी चोर चोर म्हणून नक्कीच आरडा ओरड केला असता.

मी हतबल आणि आश्चर्यचकित होऊन काकांकडे पाहिले. ते मला स्पष्टीकरण देत होते. “माझाकडे मशीन आहे मोजायची, तू हाताने का मोजतेस?” हे मलाही पटले. माझे गणित केवढे चांगले आहे हे काकांना पटवून देण्यात जास्त वेळ गेला असता. मी पटकन हात पुढे केला. “मला वीस हजार भरायचे आहेत. वरचे एक हजार परत द्या.” काका परत चिडले. “४० नोटा आहेत ५००च्या. वरचे कसले?” आता मात्र मी रडकुंडीला आले कारण माझ्याकडे घरी परत जायचे सुद्धा पैसे नव्हते. पुन्हा विचारले तर काका आपले रौद्ररूप धारण करून पंचक्रोशीत ऐकू जाईल एवढ्या तार स्वरात ओरडतील हे माहीत असून सुद्धा “कष्टाचे पैसे, गाळलेला घाम” वगैरेची आठवण काढत मी विचारलेच. त्यांनी केलेला उध्दार माझ्या घाबरलेल्या मेंदूपर्यंत पोहोचलाच नाही पण जेव्हा त्यांनी “माझ्यावर विश्वास नाही तर घे मशिन बघ.” असे म्हटले तेव्हा डोळ्यांनी आपली भूमिका चोख बजावली. मशीनवर “४२” हा आकडा स्पष्ट दिसत होता. माझा जीव भांड्यात, माफ करा, लॉकरात पडला.

मी काकांना “४२ म्हणजे हजार परत द्या ना.” अशी विनवणी केली. घरापर्यंत चालत जाण्याची हिम्मत नसल्याने आणि आपले पैसे त्यांच्या हातात असल्याने आम्ही आपले विनवणीच करायचे. काकांनी मी काहीतरी जादूटोणा करून ० चा २ केल्यासारखे माझ्याकडे बघितले मग मशीन डोळ्यांपासून एक सेंटीमीटर वर नेऊन त्याच्याकडे बघितले. पुन्हा एकदा भूत बघितल्यासारखे माझ्याकडे बघितले आणि लिंबू मिरची बाहुली वगैरे काळया जादूच्या वस्तूंकडे बघतात तसे त्याच्याकडे बघितले. मी माझे काल्पनिक काळे कपडे आणि कुरळे केस यांची लाज न वाटू देत “हा सूर्य आणि हा जयंद्रथ” करून अजूनही माझ्या हजार रुपयांची वाट बघत होते.

ह्या टप्प्यावर तुम्हाला वाटेल की काकांनी ४२ एकदा बघितला त्यामुळे ते पेटीतून दोन पाचशेच्या नोटा काढतील आणि मला “पहिली फुरसतमे निकल” करतील. पण नाही! काका आपल्या जागेवरून उठले आणि थेट मॅनेजरच्या खोलीत गेले. ह्या सगळ्या घडामोडी घडेपर्यंत माझ्या मागची रांग पार दरवाजाच्या बाहेर पोहोचली होती. त्यात आमच्या गोव्याचे लोक इतके प्रेमळ की ते तुम्ही न विचारताच तुम्हाला मदत करायला येतील. त्यामुळे “काय झाले?”, “काय झाले?” असा असा प्रतिध्वनी रांगेतून उमटत होता आणि माझ्या मागचा होतकरू तरुण सविस्तर बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचेल ही काळजी घेत होता.

पंधरा मिनिटांनी काका परत आले. मी आपला चीनच्या मांजरासारखा हात परत पुढे केला. माझी आणि रांगेतल्या असंख्य लोकांची अजिबात दखल न घेता काकांनी पैशांची पेटी उचलली आणि पुन्हा कुठेतरी निघून गेले. मागची टेलिफोन गेम आता माझ्यापर्यंत अजून एक संदेश घेऊन आली, “अरे तू मोजायचे ना पैसे द्यायच्या आधी!” होतकरू तरुणाने पैशांची कायदेशीर खेचाखेची पाहिली असल्याने सुदैवाने मला उत्तर द्यायची गरज पडली नाही.

पाच मिनिटात काका परत बाहेर आले. माझे परत चिनी मांजर झाले. अन काका मात्र पैशाचे मशीन घेऊन नाहीसे झाले. “सोडू नको पैसे अजिबात.” इति रांग. दोन तीन काळजीवाहू लोकं रांग तोडून माझी समजूत काढायला आले. कसे आहे, गोव्यात सगळे लोक बऱ्यापैकी एकमेकांना ओळखतात. आमची जनसंख्याच इतकी कमी आहे.

दोन अनोळखी गोमंतकीय पंधरा मिनिटे एकमेकांशी बोलले तर त्यांचे काही न काही नाते निघेल. त्यामुळे “काय झाले” ह्या नंतरचा गोव्याच्या लोकांचा ठरलेला प्रश्न म्हणजे “कुणाची कोण तू?” बाकी कुठेही हा प्रश्न उपरोधात्मक असला तरी गोव्यात हा प्रश्न आपुलकी म्हणून विचारला जातो.

जवळजवळ पाऊण तास उभे राहून “एवढाच वेळ आपल्याला घरी चालत जायला लागला असता ना बाई?” असे विचारणाऱ्या दुखऱ्या पायांकडे लक्ष न देत मी आपली  ओळख लोकांना सांगत असताना काका शेवटी एकदा  आपल्या खुर्चीवर विराजमान झाले. डोळा संगणकाला टेकवत एक बोटाने माझ्या  फॉर्म वरची माहिती भरू लागले. आता मात्र मी ओक्सबोक्शी रडायच्या  मार्गाला आले होते. पैसे, दुखणारे पाय आणि रांगेतल्या लोकांचे  सांत्वन ह्या पैकी नक्की कोणते कारण मला रडू आणत होते हे मात्र त्या परमेश्वरालाच माहीत. सुदैवाने काकांचे काम करून संपले आणि माझ्या जवळजवळ वारलेल्या हजार रूपयांची शोकसभा मला आवरती घ्यावी लागली. “पुढच्या वेळी आधी मोजून पैसे भरा.” असा चोराच्या उलट्या बोंबा करत धमकीवजा सल्ला देऊन काकांनी पावती  आणि हजार रुपये माझ्या हातात ठेवले.

माझा पहिला पगार हातात आला तेव्हा जेवढा आनंद झाला  नव्हता तेवढा आनंद मला त्या दोन पाचशेच्या नोटांनी दिला. रांगेने फक्त टाळ्या वाजवायचे बाकी ठेवले होते एवढे कौतुक केले. खिडकी काकांनी “लंच ब्रेक” चा बोर्ड लावून रांगेवरच्या रागाचा वचपाही काढला. पण रांगेला त्याचे फारसे सुतक दिसले नाही आणि मग माझ्या लक्षात आले. ह्या रांगेतील अनेक लोकं नेहमीचे आहेत. ते सुरुवातीचे वयस्कर काका ज्या रागाने बोलत होते त्या रागातून हे सगळे गेलेले आहेत. आकडे न दिसणारा टंकलेखक यांच्या आयुष्यातील किती तास वाया घालवतो हे विचारणे म्हणजे हाताच्या काकणाला आरसा दाखवण्यासारखे आहे. कदाचित माझ्या आजच्या वेंधळेपणामुळे मॅनेजरला  झालेला जास्त त्रास ह्या कर्मचारीला सक्तीची सुट्टी घ्यायला लावेल. असो, कसेही का असेना आपण लोकांच्या उपयोगी पडलो हे कमी आहे का?

बाकी पुढे बरेच दिवस अनोळखी लोक रस्त्यावर मला “मिळाले का पैसे परत?” असे विचारत होते. ह्या प्रसंगाला बरीच वर्षे लोटली पण अजूनही एखादा अनोळखी माणूस रस्त्यात हसला की मी त्याला “त्या रांगेतला” ठरवून मोकळी होते. त्या दिवसापासून मी बँकेला कोर्टाच्या पायरीचे नाते जोडले असले तरी बरेचसे समदुःखी हसरे चेहरे मात्र मी कमावले. अनुभवाने शहाणी झाले आणि मोजल्याशिवाय चोराच्या हातात सुध्दा पैसे द्यायचे नाहीत हे गाठीला बांधून घेतले.