स्तनपान : मातृत्वाचा बहुमूल्य ठेवा

Story: आरोग्य | डॉ. श्वेता राऊत मुळगावकर |
12th August 2022, 11:46 pm
स्तनपान : मातृत्वाचा बहुमूल्य ठेवा

आईचं दूध हे बाळासाठी अमृत म्हटलं जातं. या दुधामध्ये प्रथिने, कर्बोदके, खनिजे, जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक असल्याने वेगवेगळ्या संसर्गापासून बाळाचा संरक्षण होते, बौद्धिक व मानसिक क्षमता वाढते, रोगप्रतिकारक शक्तीही वाढण्यास मदत होते, ज्यामुळे पुढे रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार, दमा यासारख्या आजारांपासून संरक्षण होतं. त्याचसोबत आई आणि बाळाचे नाते अधिक सक्षम बनते.  स्तनपानामुळे गरोदरपणात वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते, प्रसूतीनंतर होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव कमी होतो, उतारवयातील हाडांचा ठिसूळपणाही कमी होतो. एवढे असाधारण महत्त्व असूनही प्रत्यक्षात जगभरात स्तनपानाचे प्रमाण अतिशय कमी आहे. आजकालच्या बहुतांश महिलांना मुलांना स्तनपान देणे अत्यंत कठीण काम वाटते. भारतातही जवळजवळ निम्म्या बालकांना पूर्ण स्तनपान मिळत नाही. स्तनपान करणाऱ्या महिलांचे संरक्षण, समर्थन आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच १ ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो, जो मागच्याच आठवड्यात झाला.

स्तनपानाचे बाळाला होणारे फायदे :

 स्तनपान हे जन्मानंतरचे पहिले लसीकरण मानले जाते. बाळाच्या जन्मानंतर ताबडतोब पहिल्या अर्ध्या तासात त्याला स्तनपान द्यायचे असते. मुलाच्या जन्मानंतर आईच्या स्तनातून निघालेल्या पहिल्या दुधाला 'कोलोस्ट्रम' म्हणतात. काही तज्ञ ह्या दुधाला 'हाय ऑक्टेन मिल्क' देखील म्हणतात. हे दूध कार्बोहायड्रेट्स, प्रथिनांनी समृद्ध असते, ज्यात अँटीबॉडीज आणि  इम्युनोग्लोबुलिनचे प्रमाण सर्वात जास्त असते, ते मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. दूध मुलाच्या पचन आणि श्वसन प्रक्रियेला सशक्त बनवते, हाडांची वाढ चांगल्याप्रकारे करण्यात व हाडांना मजबूत करण्यात मदत करते. यात असणारी प्रथिनं आणि अमिनो अ‍ॅसिड मुलाच्या वाढीसाठी चांगले असते जे मुलाला कुपोषणापासून वाचवते. आईचे दूध बाळाला वेगवेगळ्या चवींसाठी तयार करते. आईच्या आहारानुसार दुधाची चव बदलत असल्याने बाळ मोठे होऊन पोषक पदार्थ खाऊ लागते. पूर्ण स्तनपान केलेली मुले शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या तंदुरुस्त असतात. स्थुलत्वापासून व इतर अनेक आजारांपासूनही दूर राहू शकतात, हे शास्त्रीयदृष्ट्या समोर आले आहे.

स्तनपानाचे आईला होणारे फायदे :

जन्मानंतर पहिले सहा महिने अजून काही न देता केवळ स्तनपान द्यावे. बाळाच्या वाढीला आवश्यक असणारी सर्व पोषकतत्त्वं यातून मिळतात. त्यापुढे मुल दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान चालू ठेवणे योग्य मानले जाते. स्तनपान केल्याने शरीरातील ऑक्सिटोसिन हार्मोन्सचा स्त्राव वाढतो, गर्भावस्थेत वाढलेले गर्भाशय आणि शरीराला पुन्हा त्याच अवस्थेत आणण्यास मदत होते. प्रसूतीनंतरचा रक्तस्त्राव थांबतो, स्तन आणि बीजकोशीच्या कॅन्सरची शक्यता कमी होते, पोस्टपार्टम डिप्रेशनचा धोका कमी होतो. स्तनपान केल्याने पुढे मधुमेह, लठ्ठपणा आणि अस्थमा यासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. स्तनपानामुळे आई आणि बाळामध्ये जवळीक वाढते व त्यांचे नाते अधिक घट्ट होते. 

निरोगी आहार आणि आराम :

स्तनपान करणाऱ्या महिलेला प्रथिने, जीवनसत्त्वयुक्त पोषक आहाराची गरज असते. म्हणून प्रसूतीनंतर आईने हलका आहार घ्यावा, पातळ पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळांचा रस यांचा जेवणात समावेश करावा. बाळाची व आईची खोली स्वच्छ ठेवावी. प्रसव वेदनेमुळे आई शारीरिकरित्या थकलेली असते व दूध पाजण्यासाठी तिला एकांत हवा असतो हे ध्यानात घ्यावे.

त्यामुळे तिला पुरेपूर आराम मिळाला पाहिजे व तिचे मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे. सततचे जागरण, बाळाचे कपडे बदलणे, काळजी घेणे, घरकामाचा व्याप यासोबत नोकरी व्यवसायाच्या जबाबदाऱ्या वाढल्या की त्याचा दुधावर परिणाम होऊ शकतो. डब्लूएचओ अनुसार अमेरिका, भारतासह संपूर्ण जगातील दर तीन बालकांमागे दोन बालकांना आयुष्यातले पहिले सहा महिने संपूर्ण स्तनपान मिळत नाही.

स्तनपानाचे योग्य तंत्र समजून घ्या :

पहिल्यांदाच आई होणाऱ्यांनी तान्ह्या बाळांना योग्य प्रकारे स्तनपान करणे आवश्यक आहे. स्तनपान करण्यापूर्वी बाळाच्या जबड्याची योग्य पकड (लॅच) बसली पाहिजे. बाळाला स्तनपान करीत असताना प्रत्येक वेळी आधी एका स्तनातील दूध पूर्णपणे संपवून मग दुसरीकडून दूध पाजावे, म्हणजे परत दूध लवकर तयार होते व स्तनात गाठी होत नाहीत. साधारणपणे एका वेळेला २०-३० मिनिटे लागू शकतात पण प्रत्येक बाळ वेगळे असल्याने हा वेळ बदलू शकतो. तसेच आरामदायी स्तनपानासाठी आईने योग्य बसणे व बाळाला नीट धरणे आवश्यक असते. पाठीला आधार घेऊन बसून बाळाला मांडीवर व स्तनाच्या जवळ ठेवून, किंवा एका कुशीवर झोपून स्तनपान करू शकता. काही कारणास्तव दूध येण्यास त्रास असल्यास, 'मिल्क बँक' मधून दूध मिळण्याची सोय हल्ली असते, डब्यातले दूध / 'टॉप फीड' देणे टाळावे. नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये, पूर्ण स्वच्छता ठेवून दूध 'ब्रेस्ट पंप' द्वारे काढून वापरले जाऊ शकते जे फ्रीजमध्ये आठ तास राहू शकते.

स्तनपानाबद्दल कोणतीही शंका असल्यास स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला ताबडतोब घेणे अतिशय आवश्‍यक आहे. आईच्या दुधाची बरोबरी कुठल्याच दुधाशी होत नाही त्यामुळे स्तनपान हा नक्कीच मातृत्वाचा बहुमूल्य ठेवा व बाळासाठी सर्वश्रेष्ठ आहार आहे.