न्यूझीलंड क्रिकेटमध्ये वर्णद्वेष : टेलर

|
11th August 2022, 09:39 Hrs
न्यूझीलंड क्रिकेटमध्ये वर्णद्वेष : टेलर

वेलिंगटन : न्यूझीलंडच्या महान फलंदाजांपैकी एक असलेल्या रॉस टेलरने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर अवघ्या काही महिन्यांतच टेलरने आता धक्कादायक खुलासा केला आहे. टेलरने म्हटले आहे की, किवी संघ आणि अधिकाऱ्यांच्या वर्णद्वेषी टिप्पण्यांचा त्याला सामना करावा लागला आहे.

हा धक्कादायक खुलासा टेलरने आपल्या आत्मचरित्र - ब्लॅक अँड व्हाईटमध्ये केला आहे. टेलरने किवी ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेल्या वांशिक असंवेदनशीलतेबद्दल आणि न्यूझीलंडच्या काही माजी क्रिकेट सहकाऱ्यांनी केलेल्या टिप्पण्यांबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. त्याचा उल्लेख देखील करण्यात आला आहे, तर एक अपमानजनक टिप्पणी देखील करण्यात आली आहे. किवी संघाचे माजी प्रशिक्षक आणि सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संचालक माईक हेसन यांचाही यात उल्लेख केला आहे.

सावळा खेळाडू गोऱ्यांमध्ये

आपल्या आत्मचरित्रात वर्णद्वेषाचे वर्णन करताना, ३८ वर्षीय टेलरने लिहिले की, किवी क्रिकेट हा गोऱ्या लोकांचा खेळ होता. यामध्ये तो सावळ्या त्वचेचा खेळाडू म्हणून विसंगती होती.

विनोदाच्या नावाखाली वर्णद्वेष

टेलरची आई सामोआ वंशाची आहे आणि त्याचे वडील न्यूझीलंडचे होते. यामुळे अनेकवेळा त्यांना त्यांच्या सामोन वारशाबद्दल अप्रत्यक्ष टिप्पण्यांना सामोरे जावे लागले. त्याने नाव न घेता सहकारी खेळाडूच्या कमेंटचाही उल्लेख केला. टेलरने लिहिले संघातील एक सहकारी मला म्हणायचा, 'रॉस, तुझा अर्धा भाग चांगला आहे. पण कोणता भाग चांगला आहे? मी कशाबद्दल बोलत आहे हे तुम्हाला माहीत नाही. ते काय आहे हे मला चांगलेच माहीत होते. इतर खेळाडूंनाही हे सर्व सहन करावे लागले जेव्हा त्यांच्या वर्णावर टिप्पणी केली गेली.

माईक हेसनवरही आरोप

टेलरचे न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक आणि आयपीएलमधील आरसीबीचे सध्याचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांच्यासोबतचे संबंधही सुरुवातीच्या दिवसांपासून चांगले नव्हते. त्याच काळातील दुसर्या घटनेचा हवाला देऊन टेलरने हेसनच्या कथित वर्णद्वेषाचा उल्लेख केला. 

टेलरच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मी कर्णधारपदाच्या गोंधळानंतर संघात परतलो तेव्हा मी माईक हेसनच्या शेजारी बसलो होतो. ते थेट घरून आले होते. ते म्हणाले, माझा क्लिनरही सामोन आहे. ती एक सुंदर स्त्री आहे, खूप मेहनती, विश्वासार्ह आहे. मी एवढेच म्हणू शकलो खूपच छान.