ड्युरँड कपसाठी एफसी गोवा सज्ज

पहिला सामना गतउपविजेत्या मोहमेडनविरुद्ध : कोलकाता येथे रंगणार स्पर्धेतील सामने


12th August 2022, 09:37 pm
ड्युरँड कपसाठी एफसी गोवा सज्ज

पणजी : देशातील एक प्रमुख फुटबॉल क्लब असलेल्या एफसी गोवाने प्रतिष्ठेच्या ड्युरँड कप २०२२ स्पर्धेसाठी २६ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. एफसी गोवा संघ हे या स्पर्धेचे गतविजेते आहेत. 

जेतेपद राखण्यादृष्टीने स्पर्धेत उतरणाऱ्या एफसी गोवा संघाने त्यांच्या संघात हृतिक तिवारी, मुहम्मद नेमिल, फ्रांगकी बुआम आणि आयुष छेत्री या फर्स्ट टीम संघातील चार खेळाडूंना स्थान दिले आहे. मुख्य संघ प्रशिक्षकाची जबाबदारी डेंगी कार्डोझो यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गोवा संघ हा २०१९ आणि २०२१ या दोन ड्युरँड कप स्पर्धेत सहभागी झाला आहे. मागील हंगामात अपराजित राहताना त्यांनी ट्रॉफी उंचावली. यंदाची ड्युरँड कप स्पर्धा ही १६ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत कोलकाता, गुवाहाटी आणि इम्फाळ येथे खेळली जाणार आहे. ड्युरँड कप ही भारतातील एक प्रतिष्ठेची फुटबॉल स्पर्धा आहे. देशांतर्गत एक सर्वोत्तम असलेल्या स्पर्धेत आमच्या सर्वच खेळाडूंना त्यांची खेळाची क्षमता दाखवून देण्याची संधी आहे. आमच्या संघात अनेक नवोदित असून स्वतःला सिद्ध करण्यासाठी ते उत्सुक आहेत. आमच्या संघातील वातावरण उत्साहपूर्ण आहे. आम्ही कसून सराव केला. तसेच संघ अंतर्गत सामने खेळून आम्ही सर्वसमावेशक टीम बनवली आहे. त्यामुळे सातत्य राखतानाच ड्युरँड कप आमच्याकडे कायम ठेवण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास एफसी गोवाचे प्रशिक्षक कार्डोझो यांनी कोलकाता येथे प्रयाण होण्यापूर्वी व्यक्त केला. 

एफसी गोवा संघाचा ए ग्रुपमध्ये समावेश असून त्यात मोहमेडन एफसीसह बंगळुरू एफसी, जमशेदपूर एफसी आणि इंडियन एअर फोर्स संघांचा समावेश आहे. 

संघ : १६ ऑगस्ट : विरुद्ध मोहमेडन एससी : विवेकानंद युवा भारती क्रीडांगण, सायं. ७ वा. 

१९ ऑगस्ट : विरुद्ध इंडियन एअर फोर्स, किशोर भारती क्रीडांगण, सायं. ६ वा. 

२६ ऑगस्ट : विरुद्ध जमशेदपूर एफसी, विवेकानंद युवा भारती क्रीडांगण, सायं. ६ वा. 

३० ऑगस्ट : विरुद्ध बंगळुरू एफसी, विवेकानंद युवा भारती क्रीडांगण, सायं. ६ वा.