जागतिक श्रीमंतांची ’न्यायालयीन’ साठमारी वेधक !

जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क हा टेस्ला या कंपनीचा प्रमुख कार्यकारी आधिकारी आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडिया क्षेत्रातील अग्रगण्य श्रीमंत कंपनी ‘ट्वीटर’ विकत घेण्याचा करार केला होता. मात्र अलीकडेच मस्क याने ही कंपनी खरेदी करण्यास नकार दिल्याने दोन श्रीमंतांमध्ये न्यायालयीन ’साठमारी’ होणे अपरिहार्य आहे.

Story: विचारचक्र | प्रा. नंदकुमार काकिर्डे |
10th August 2022, 12:23 am

भारतामध्ये महागाईपासून विविध राज्यांमध्ये होत असलेले सत्ताबदल; त्यामागची आर्थिक गणिते, विविध यंत्रणांच्या भूमिका;  पाऊस, भूस्खलनाचे प्रकार; पूरांनी घातलेले विविध राज्यातील थैमान, जातीय, धार्मिक कारणांवरुन निर्माण होत असलेले विविध प्रसार माध्यमातील वादंग, त्यातून होणार्या हत्या; सोशल मिडीया, विविध चॅनेल्सची आगीत तेल ओतण्याची भूमिका व स्वत:चेच कसे खरे आहे हे दाखविण्याची चढाओढ सुरु असताना जागतिक पातळीवरील दोन श्रीमंतांची न्यायालयीन ’साठमारी’ भारतीयांसाठीही खूप लक्षवेधक किंवा चर्चेचा विषय ठरणारी आहे.            

अमेरिकेतील टेसला ही महासत्ता असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी स्वयंचलित विद्युत वहाने व उर्जा निर्मितीच्या क्षेत्रात काम करते.  १८७६ कोटी रुपयांचा महसुल असलेल्या या कंपनीचा प्रमुख कार्यकारी अधिकारी व संस्थापकांपैकी एक आहे एलॉन मस्क. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून तो ओळखला जातो. स्वत:ची संपत्ती, शेअर्सवर प्रचंड कर्जे घेऊन व्यवसाय विस्तार  करण्याचा त्याचा छंद आहे. एलॉन मस्क यांनी  दि. २५ एप्रिल २०२२ रोजी ’ट्विटर’च्या एका शेअरला  ५४.२० डॉलर किंमत देण्याचे मान्य करुन ४४ बिलीयन डॉलरला ती कंपनी ताब्यात घेण्याचा प्रस्ताव जाहीर केला होता. टि्‌वटर कंपनी ही अमेरिकेतील सोशल नेटवर्किंग क्षेत्रातील कंपनी आहे.  या प्रस्तावास उभय कंपन्यांच्या संचालक मंडळाची मान्यता लाभलेली  होती. त्यानंतर त्यांनी विलीनीकरणाचा करार (मर्जर ऍग्रीमेंट) केला होता. तसेच विलीनीकरणाचा हा करार रद्द झाला तर करार मोडणार्याला १ बिलियन डॉलर नुकसान भरपाई द्यावी लागण्याची अटही त्या करारात आहे.            

मात्र प्रत्यक्षात ही खरेदी करण्याची तयारी सुरु असतानाच  एलॉन मस्क याने ’ट्विटर’ कडे त्यांच्याकडील बनावट किंवा खोट्या खातेदारांची तपशीलवार माहिती विचारलेली होती.  भारतात आपल्या सर्वांना माहित आहे की सोशल मिडीयावर गेले अनेक वर्षे बनावट किंवा खोटी खाती उघडली जातात. त्यात फेसबुक, ’ट्विटर’ किंवा व्हॉटस्‌ऍपसारख्या विविध सोशल मिडीयावर लाखोजणांची खाती म्हणजे अकौंटस् असून  त्यात बनावट, नकली खातीही मोठ्या प्रमाणावर आहेत. या सर्व सोशल मिडीया कंपन्या बिनधास्त ही खाती बनावट खाती सुरु ठेवतात. ती बंद करण्यास भाग पाडण्याचीही तसदी या सोशल मिडीया क्षेत्रात गब्बर  झालेल्या कंपन्या घेत नाहीत. यामुळे भारतासह जगभर या सोशल मिडीयावरील बनावट,नकली खात्यांनी उच्छाद मांडलेला आहे हेही नाकारता येणार नाही. त्या खात्यांवरुन एकमेकांना ’ट्रोल’ केले जाते; पद्धतशीरपणे विरुद्ध वातावरण निर्माण करणे, द्वेषभावना, खोटे दावे प्रसृत केले जातात. युरोप, अमेरिकेसह भारतातही या सोशल मिडीयांच्या माध्यमातून सामाजिक वातावरण दूषित केले जात आहे यात काहीही शंका नाही. सध्या तर भारतात फेसबुक, व्हॉटस्‌ऍप विद्यापीठा, ट्विटर वरील तथाकथित ज्ञान जास्तीत जास्त धोकादायक, समाजामध्ये दरी निर्माण करणारे व द्वेषमूलक होत आहे.            या सर्व पार्श्वभूमीवर एलॉन मस्क याने ’टि्‌वटर’ कंपनीकडे अधिकृतरित्या विचारणा केली. मात्र  कंपनीने या बनावट खात्यांची कोणतीही माहिती दिली नाही पण त्याउलट मस्क यांचे याबाबतचे माहिती घेण्याचे प्रयत्न हाणून पाडले. प्रतिबंधित केले. एवढी मोठी कंपनी ताब्यात घेताना त्याबाबतचा सर्व तपशील माहीत असणे ही गोष्ट कायद्यात, नियमात बसते. टि्‌वटरने ही माहिती दिलीच नाही. त्यामुळेच गेल्या शुक्रवारी मस्क याने तब्बल १२ पानी नोटीस ’ट्विटर’ला पाठवून त्यांचा विलीनीकरणाचा करार रद्द करीत असल्याचे कळवले. त्याच्या मते कराराच्या महत्वपूर्ण अटीचा भंग टि्‌वटरने  केल्याने  ही कंपनी खरेदी न करण्याचा निर्णय एलॉन मस्क याने जाहीर केला. तसेच  मस्कच्या नोटीशीनुसार आवश्यक माहिती न दिल्याने   ’ट्विटर’ने कराराचा भंग केल्याने हा करार रद्द करण्यात येत असून मस्क कोणतीही नुकसान भरपाई देण्यास बांधील नाहीत असे नमूद केले आहे.            

या नकारघंटेमुळे टि्‌वटर  कंपनी  गप्प बसलेली नाही. त्यांच्या संचालक मंडळाने एलॉन मस्कला धडा शिकवण्याचे ठरवले असून त्यांच्यातील वाद हा न्यायालयात नेण्याचे ठरवले आहे. या कंपनीने प्रमुख कार्यकारी अधिकारी पराग अगरवाल यांनी असे जाहीरपणे कबूल केले होते की त्यांच्याकडील एकूण खात्यांपैकी पाच टक्क्यांपेक्षा कमी खाती बनावट आहेत. मात्र एलॉन मस्क यांचे म्हणणे की बनावट खाती त्यापेक्षा खूप जास्त आहेत.   टि्‌वटरचे  प्रमुख कार्यालय अमेरिकेतील डेलावेअर न्यायालयाच्या अखत्यारीत येते. त्या न्यायालयातच मस्क यांना खेचून त्यांच्याकडून ठरलेल्या किंमतीला कंपनी घेण्यास भाग पाडण्याचा त्यांचा इरादा आहे. एलॉन मस्क या  धनाड्य व्यक्तिला अंगावर घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण आगामी काळात सहजगत्या संपुष्टात येणारे नाही. या दोन्ही श्रीमंतांमधील ही न्यायालयीन लढाई जगातील सर्वात महागडी लढाई ठरण्याचीच चिन्हे आहेत. कदाचित एलॉन मस्कला हे प्रकरण आर्थिक दृष्ट्या प्रचंड भारी किंवा प्रतिकूल जाण्याची चिन्हे दिसत आहेत.              

दोन्ही कंपन्यांच्या या जाहीर वादामुळे ’ट्विटर’ कंपनीचे तसेच टेसला कंपनीचे  शेअर्स बाजारात सतत घसरत असून दोन्ही कंपन्यांचे भागधारक हवालदिल होत आहेत. या न्यायालयात अशा प्रकारचे खटले पूर्वीही गाजलेले आहेत. विलीनीकरण करार सहजगत्या रद्द करता येत नाही असे न्यायालयाने काही निकालात म्हटले आहे. पण करार रद्द करताच येणार नाही असेही नाही. यात टि्‌वटर कंपनी सातत्याने खरी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. तर दुसरीकडे मस्क यांच्या वर्तनावरुन त्यांना प्रारंभापासूनच ही कंपनी खरेदी करण्यात रस नसल्याचे आढळत असल्याचे काही कायदे तज्ञांचे मत आहे. यातील आकडेेवारी पाहिली तर ४४ बिलीयन डॉलरला ही कंपनी खरेदी करण्यासाठी मस्क याने त्याचे ३० बिलीयन डॉलर गहाण ठेऊन कर्ज घेतले आहे. मस्कला न्यायालयात विलीनीकरण कराराच्या अटींचा टि्‌वटरने भंग केला हे सिद्ध करावे लागेत तर मस्क यांनी अत्यंत फालतू कारणे देऊन करार पाळण्याच्या अटीचा भंग केला असून त्यांना जबरदस्त आर्थिक दंड, नुकसान भरपाई देण्यावर टि्‌वटरचा भर राहील. या न्यायालयीन साठमारीत ज्याचा पराभव होईल त्या कंपनीचे अस्तित्वच संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेच्या  शेअर बाजारात टि्‌वटरचे शेअर्स तब्बल २८ टक्के कोसळून ५१.७८ डॉलर वरुन ३६.८ डॉलरवर घसरलेले आहेत. तसेच कंपनीचे कर्मचारी नोकरी सोडून जात आहेत. त्यांना हे सर्व प्रकरण खूप महागात पडण्याची शक्यता आहे. टेसलाचेही शेअर्स सध्या घसरताना दिसत आहेत. मस्कला १ बिलीयन दंड झाला तर तो कदाचित भरुन हात वर करु शकतो. मात्र यात टि्‌वटरची विश्वासार्हता पणाला लागणार आहे. आपण भारतीयांनी मात्र ही वेधक साठमारी पहायला हरकत नाही. कदाचित भारतातसुद्धा विविध उद्योगांमध्ये हे साठमारीचे चित्र भविष्यात पहावयास मिळाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

भारतातील ट्विटर वाद कारणीभूत?

एलॉन मस्क व ट्विटर यांच्यातील वाद न्यायालयासमोर  असतानाच त्यात भारतीय कायद्याचाही ट्विस्ट आला आहे. ट्विटरने भारतातील माहिती तंत्रज्ञान कायद्याची योग्य अंमलबजावणी केली नसल्याने आपण या खरेदीचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे न्यायालयापुढे सादर केलेल्या १०० पानी कागदपत्रात नमूद केले आहे.  सध्या कर्नाटक उच्च न्यायालयान ट्विटरचे प्रकरण सुरु आहे. भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ए नुसार ट्विटरला काही वादग्रस्त मजकूर हटविण्याचे आदेश दिले होते. त्याविरुद्ध ट्विटरने न्यायालयात धाव घेतलेली आहे. मात्र ट्विटरने त्यांच्या कृतीचे समर्थन केले आहे. आज भारतात ट्विटर फेसबुक, स्नॅपचॅट इतके लोकप्रिय नसले तरी त्यांची वापरकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे.