मडगावातील बायोमिथेनेशन प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात

पालिकेने पैसे थकवल्याने कंपनीकडून काम बंद करण्याचा इशारा

|
06th August 2022, 01:04 Hrs
मडगावातील बायोमिथेनेशन  प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात

मडगाव : मडगावात मोठ्या गाजावाज्यात सुरू करण्यात आलेला ‘५ टीपीडी बायोमिथेनेशन’ प्रकल्पाचे भवितव्य सध्या धोक्यात आले आहे. याआधी काही त्रुटी व विविध कारणांनी बंद राहिलेला हा प्रकल्प, आता पूर्ण बंद होण्याची चिन्हे आहेत. हा प्रकल्प चालवणाऱ्या उर्जा बायोसिस्टिम प्रा. लि. कंपनीने पालिकेकडून सुमारे ८२ लाखांची थकबाकी न मिळाल्यास १५ ऑगस्टपासून प्रकल्पाचे काम थांबवण्याचा इशारा दिला आहे.

मडगावात एसजीपीडीए मार्केटशेजारी पहिल्या ५ टीपीडी बायोमिथेनेशन प्रकल्पाचे उद्घाटन २०२१ या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात करण्यात आले होते. या प्रकल्पावर २ कोटी ४० लाखांचा खर्च करण्यात आलेला आहे. या प्रकल्पात दरदिवशी ५ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. या प्रकल्पातून दर दिवशी ४५० युनिट विजेची निर्मिती करता येऊ शकते तसेच दरदिवशी ७०० ते १००० किलो सेंद्रिय खत उपलब्ध होणार असल्याचे प्रकल्प सुरू करताना सांगण्यात आले होते. उर्जा बायोसिस्टिम प्रा. लि. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून हा बायोगॅस प्रकल्प हाताळला जात असून त्यासाठी, दरमहिना पालिकेकडून कंपनीला पैसे अदा करावे लागतात.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, जानेवारी २०२२ पासून कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून बायोगॅस प्रकल्प चालवला जात आहे. या प्रकल्पाच्या उभारणीपासून आतापर्यंत ठरलेल्या रकमेच्या ६० टक्के रक्कम पालिकेकडून अदा करण्यात आलेली आहे. मात्र, उर्वरित ४० टक्के रक्कम ७१ लाख ५१ हजार एवढी बाकी आहे. याशिवाय, सहा महिने प्रकल्प चालवणे व देखभाल दुरूस्तीचे ११ लाख २० हजार रुपये रक्कमही पालिकेकडून मिळालेली नाही. सुमारे ८२ लाख ७२ हजारांची रक्कम पालिकेकडून येणे बाकी आहे. प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी खर्च करावा लागतो, याशिवाय कामगारांनाही पगार द्यावा लागत आहे. यातच पैसे न मिळाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पालिकेकडून पैसे अदा न केल्यास १५ ऑगस्टपासून देखभाल दुरुस्ती व प्रकल्प चालवण्याचे काम थांबवण्यात येईल व पैसे अदा केल्यानंतर काम पुन्हा सुरू करण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे, आता मडगाव पालिका याबाबत काय निर्णय घेते यावर प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.

पालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ टीपीडी प्रकल्पाचे काम मार्चपासून सुरू झाले आहे. प्रकल्पातील अनेक त्रुटीमुळे ताे बराच काळ बंदावस्थेत होता. त्याचे काम पूर्ण क्षमतेने सुरू नव्हते. अशा परिस्थितीत पालिकेकडूनच प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीला नोटीस काढण्याची गरज होती. मात्र, तसे झाले नाही. या प्रकल्पाची चाचणी करण्यात आली नसून, ती पूर्ण होऊन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याशिवाय सदर कंपनीला उर्वरित रक्कम अदा करणे चुकीचे ठरणार आहे. जर, कंपनीकडून प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले तर त्यावर पालिका काहीच करू शकणार नाही, हा संबधित कंपनीचा प्रश्न असेल.


सध्या बायोमिथेनेशन प्रकल्प सुरू आहे. मात्र, त्यांच्या बिलांबाबत व प्रकल्प बंद ठेवण्याबाबत काहीही माहीत नाही. त्याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेण्यात येईल.

-लिंडन परेरा, नगराध्यक्ष


सोनसडोवर २५ टीपीडीचे दोन प्रकल्प

सोनसडो येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रतिदिन २५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय पालिका मंडळाकडून घेण्यात आलेला आहे. सध्या हा प्रकल्प गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडून चालवण्यात येत आहे. तसेच मंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही सोनसडोवर दोन २५ टीपीडी प्रकल्प उभारणार असल्याचे सांगितलेले आहे. मात्र, सध्याचा प्रकल्प बंद पडल्यास या प्रकल्पांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.