एक सेल्फी तो बनता है यार !!...

त्या रंगीत नाजूक फुलांवर नाजूक फुलपाखरेही तितक्याच नाजुकतेने बागडत असतात. त्यांच्यातील रस प्राशन करत असतात, अगदी त्या फुलांना न् दुखावता...

Story: मर्मबंधातली ठेव | कविता प्रणीत आमोणकर |
05th August 2022, 10:48 pm
एक सेल्फी तो बनता है यार !!...

श्रावण आणि रिमझिम पाऊस यांचे अतूट असे नाते आहे. श्रावणाच्या  रिमझिम पावसात अनेक हिरव्यागार रंगाच्या छटांनी नटलेल्या धरित्रीला न्याहाळताना मन सुखावते, प्रफुल्लित होते. अनेक तर्‍हेची पत्री, रानफळे तसेच हिरव्यागार रानात फुललेल्या अनेक रानफुलांनी सारा आसमंत अनामिक ओल्या सुगंधाने सुगंधित झालेला असतो. परसात फुललेल्या सोनटक्का, चाफा, ब्रहमकमळ, पारिजात आदी फुलांचा अनामिक सुगंध हा वातावरण प्रसन्न करत असतो.

श्रावणात निसर्ग मुक्त हस्ताने फुलांची उधळण करत असतो. आणि म्हणूनच श्रावणात येणार्‍या व्रतवैकल्यांना, सणावाराला ही फुले मोठया भक्तीभावाने देवाला अर्पित केली जातात.  या सुगंधित फुलांनी देवाला सजवले जाते. देवाभोवती याच फुलांची आरास केली जाते.

हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या डोंगराच्या कडेला उतरणीवर किंवा शेताच्या कडेला नीट निरखून पाहिले तर हिरव्यागार वाढलेल्या रानात अनेक सुंदर अशी इवली इवली अशी जांभळ्या, पिवळ्या, गुलाबी, नारिंगी, निळ्या, लाल रंगांची छोटी छोटी रानफुले किंवा गवतफुले लाजून लपलेली दिसतात. हिरव्यागार रानात सप्तरंगी रंगाची उधळण करत फुललेली ही फुले पाहताना सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची

“ रंग रंगुल्या सान सानुल्या

गवतफुला रे गवतफुला ..

असा कसा रे मला लागला

सांग तुझा रे तुझा लळा !... “

या कवितेची प्रदीर्घाने आठवण होते आणि तालावर या कवितेच्या ओळी गुणगुणताना या रानफुलांसारखेच मन हलके आणि प्रफुल्लित होऊन जाते. त्या रंगीत नाजूक फुलांवर नाजूक फुलपाखरेही तितक्याच नाजूकतेने बागडत असतात. त्यांच्यातील रस प्राशन करत असतात, अगदी त्या फुलांना न् दुखावता... ही फुले आणि त्यावर भिरभिरणारी ही फुलपाखरे पाहून आपले मन ही त्यांच्यासोबत अल्लड होऊन जाते. मग त्या भिरभिरणार्‍या फुलपाखरांसोबत आपले मन ही निसर्गाचा हा सुंदर देखावा पाहताना मनोमन हरखून जाते !!....

या गवतफुलांची किंवा रानफुलांची नावे बहुतेक अपरिचित असतात. परंतु नाजूक सौंदर्याने नटलेली ही फुले निरखून पाहिल्यास निसर्ग हा किती उत्तम कलाकार आहे, याची जाणीव होते. विविध रंगांची पखरण असलेल्या या फुलांचा गंध, आकार, ठेवण पाहिल्यास निसर्गाने किती नजाकतीने या फुलांची निर्मिती केली असावी, हा प्रश्न मनाला पडल्याशिवाय राहवत नाही. आणि मग हलक्या हाताने त्यातील एक सुंदरसे फूल अलगद तोडून ते आपल्या केसात माळल्यावर त्या अनामिक सुगंधाची पाखरे आपल्या भोवती भिरभिरत राहतात आणि मग एक सेल्फी तो बनता है यार !!.. असे मनातल्या मनात म्हणत एक सेल्फी काढण्याचा मोह मला तर आवरत नाही!!..