मुशीरवाडा - कोलवाळमध्ये पोलिसांकडून २.८० लाखांचा गुटखा जप्त

एकाला अटक : आस्थापनात साठवून ठेवल्या होत्या पिशव्या

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd August 2022, 12:16 am
मुशीरवाडा - कोलवाळमध्ये पोलिसांकडून  २.८० लाखांचा गुटखा जप्त

म्हापसा : मुशीरवाडा कोलवाळ येथे पोलिसांनी एका आस्थापनावर छापा टाकून बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला गुटखा जप्त केला. या गुटख्याची किंमत २ लाख ८० हजार रूपये आहे.

पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना व उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळ पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर, हवालदार सीताराम चोडणकर, रामा नाईक, सुधीर परब व कॉ. सुलेश नाईक या पथकाने ही कारवाई केली.

मुशीरवाडा येथे एका आस्थापनात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी सदर ठिकाणी छापा टाकला.

यावेळी एका खोलीत मोठ्या प्रमाणात गुटखा होता. २०-२५ पिशव्यांमध्ये हा गुटखा १० ते ११ प्रकारचा असून तो सर्व पोलिसांनी जप्त केला. संशयित दिपेंदू चौधरी याच्या विरुद्ध सुधारीत गोवा आरोग्य कायद्याच्या ८७ फ कलमाखाली गुन्हा नोंदवून त्यास अटक केली. नंतर त्याची येथील न्यायालयाकडून जामिनावर सुटका करण्यात आली.

संशयित दिपेंदू चौधरी हा गुटखा वितरक आहे. कोलवाळ, म्हापसा व इतर ठिकाणी तो गुटखाचा पुरवठा करत होता. जप्त केलेला गुटखा पुरवठा करण्यासाठी आणला होता. मात्र, पुरवठा करण्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केली.