मलेशिया मास्टर्स : सिंधूची विजयी सुरुवात

कश्यप, प्रणॉय, प्रणीत पहिल्या फेरीत

|
07th July 2022, 12:40 Hrs
मलेशिया मास्टर्स : सिंधूची विजयी सुरुवात

पी. व्ही. सिंधू

मलेशिया : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत चीनच्या बिंग जिआओचा पहिल्या फेरीत पराभव केला. सातवी सिडेड सिंधून जिआओचा एक तास चाललेल्या सामन्यात २१-१३, १७-२१, २१-१५ अशा तीन गेममध्ये पराभव केला. गेल्या महिन्यात इंडोनेशिया ओपनमध्ये सिंधूला चीनच्या जिआओने पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का दिला होता. त्याचा बदला सिंधूने मलेशिया मास्टरमध्ये बुधवारी घेतला. दुसऱ्या फेरीत सिंधूचा सामना इंडोनेशियाची नात कुसुमा वरदानी आणि चीनच्या जिंग यी मेनच्या विजेत्याशी होईल.
साई प्रणीत, कश्यप पुढील फेरीत
दुसरीकडे मलेशिया ओपन पुरुष एकेरीमध्ये बी साई प्रणीत आणि परूपल्ली कष्यप यांनी देखील दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. साई प्रणीतने पहिल्या फेरीत टोकियो ऑलिम्पिक उपांत्य फेरीतील केविन कॉर्डन गौतेमालाचा २१-८, २१-९ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत तो चीनच्या ली शी फेंगशी खेळेल. कश्यपने एक गेम गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले. त्याने मलेशियाच्या टॉमी सुकिआत्रोचा १६-२१, २१-१६, २१-१६ असा पराभव केला.
हेड टू हेडमध्ये जीआओ आघाडीवर
सिंधू आणि जिआओ यांच्यात आतापर्यंत १९ लढती झाल्या आहेत. त्यातील चीनच्या जिआओने १० लढती जिंकल्या आहेत तर सिंधूने ९ लढतीत विजय मिळवला आहे. सध्या हेड टू हेडमध्ये जीआओ आघाडीवर आहे. इंडोनेशिया ओपनमध्ये झियाओने पहिल्या फेरीत सिंधूला पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला होता.
सायना-समीर पराभूत
लंडन ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवानला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. तिला कोरियाच्या किम गा युनने १६-२१, २१-१७, २१-१४ ने पराभूत केले. समीर वर्माच्या बाबतीतही असेच झाले. त्याने तैवानचा खेळाडू चाऊ टैन चेनवर पहिला गेम २१-१० असा जिंकला. पण, जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूने दुसरा आणि तिसरा गेम २१-१२, २१-१४ असा जिंकून सामना जिंकला.