विराट सहा वर्षानंतर टॉप-१० मधून बाहेर

कसोटी क्रमवारीत ऋषभ पंतची मोठी झेप : रूट अव्वलस्थानी

|
07th July 2022, 12:38 Hrs
विराट सहा वर्षानंतर टॉप-१० मधून बाहेर

दुबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यानंतर आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीमध्ये मोठे बदल झाले आहे. भारताची रन मशिन विराट कोहली कसोटी रँकिंगमधील टॉप-१० मधून बाहेर पडला आहे. गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच विराट कोहली कसोटी रँकिंगमध्ये पहिल्या १० मध्ये दिसणार नाही. तो आता १३ व्या स्थानावर घसरला आहे.
दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मा एजबेस्टन कसोटीत खेळला नव्हता. त्याचीही रँकिंग एका अंकाने घसरली आहे. इंग्लंडचा फलंदाज जो रूट ज्याने दुसऱ्या डावात १४२ धावा केल्या तो कसोटी बॅटिंग रँकिंगमध्ये टॉपवर पोहचला आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅम्बुश्चग्ने दुसऱ्या तर स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान, जो रूटबरोबर भारताविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात शतक ठोकणाऱ्या जॉनी बेअरस्टोने देखील आयसीसी रँकिंगमध्ये ११ स्थानांनी सुधारणा करत १० वे स्थान पटकावले आहे. बेअरस्टोने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ५५.३६ च्या सरासरीने १२१८ धावा केल्या आहेत. त्यात सहा शतकांचा समावेश आहे.
ऋषभ पंतची चमकदार कामगिरी
इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात ऋषभ पंतने पहिल्या डावात १११ चेंडूत १४६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही ५७ धावांची खेळी केली होती. त्याने मागील सहा कसोटी सामन्यांत दोन शतक आणि तीन अर्धशतक झळकावली आहेत. त्याने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीत सर्वोच्च स्थान मिळवले आहे‍. पंतने दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली.
विराटची तीन स्थानांनी घसरण
इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात विराट कोहलीला पहिल्या डावात ११ तर, दुसऱ्या डावात २० धावा करता आल्या. त्यामुळे कोहलीची ७१४ रेटिंगसह तीन स्थानांनी घसरून झाली असून तो आता १३व्या क्रमांकावर गेला. करोनामुळे बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातून बाहेर पडलेला रोहित शर्मा नवव्या स्थानावर घसरला आहे. 

गोलंदाजात कमिन्स सर्वोत्तम
गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स ९०० रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. एजबॅस्टन येथे सहा विकेट घेणारा जेम्स अँडरसन एका स्थानाने सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तर श्रीलंकेविरुद्ध नऊ विकेट घेणाऱ्या नॅथन लिऑनला पाच स्थानांचा फायदा झाला असून तो १३व्या स्थानावर पोहोचला आहे.