थेंबा, थांब ना…

बालमनाचेसुध्दा असेच असते ना, लहान मुले विश्वानंद घेताना, बालवयाचा प्रत्येक टप्पा जगताना, गोड अविस्मरणीय स्मृती मागे ठेवून आपल्या वयाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करतात. जसे जसे वय वाढते तसतसे जबाबदाऱ्या वाढतात. बालदिनाच्या दिवशी प्रत्येकाच्या मनात एक इच्छा नक्कीच जागृत होते. ती म्हणजे लहानपण देगा देवा…

Story: पालकत्व | पूजा भांडारे कामत- सातोस्कर |
24th June 2022, 10:11 Hrs
थेंबा, थांब ना…

निरभ्र आकाशाने त्या मोत्यांना आपल्या ओंजळीत झेलले होते अन् ते आपल्या हृद्य कप्प्यातील बहुमूल्य विचारांचा प्रकाश पाडत होते. सृष्टीसौंदर्य पाहून भासत होते जसे परमेश्वर आपल्या सहस्त्र रंगांच्या कोषातून, हिरव्या रंगाचाच जणू वर्षाव करत आहेत. केवळ तरुच नाही तर सृष्टीच्या प्रत्येक घटकाने हिरवे वस्त्र परिधान केले होते. पवन मुक्तपणे चहुदिशांनी बागडताना, त्याच्या आगमनाचा जणू शुभसंकेत देत होता, अन् एकसारख्या त्या लहरी, अंगास झोंबत होत्या, जणू कानात येऊन हळूच सांगत होत्या, ‘’चल ये बाहेर, काही क्षणांनीच आता तो येणार आहे’’. पाखरांनाही अचानक कुणाची तरी चाहूल लागत होती व तीही लगबगीने आपल्या घरट्याच्या दिशेने परतत होती. मनसोक्तपणे फिरणाऱ्या त्या निरागस जीवांचे मन, जणू प्रसन्नतेच्या जलाने अन् उत्कंठेच्या फेसाळणाऱ्या लाटांनी भरुन गेले होते, जणू आपल्या कुटुंबरुपी फांद्यांना कुरवाळण्यासाठी आसुसलेले होते, आणि ते अधिरतेची सीमा ओलांडून आपल्या घरट्याकडे धावत होते. चातकाचे मुख आशेने आकाशाकडे पाहू लागले अन् आपल्या प्रियकराच्या प्रतिक्षेने व्याकूळ होऊन तो चातक नभाकडे आशेने पाहू लागला. 

इतक्यात त्याचे आगमन होण्याचा शुभसमय जवळ आला आणि सर्वत्र ढोल नगारे वाजू लागले. सप्तरंगी इंद्रधनुष्य नभी आले, व नभाने अलगद् आपल्या डोळ्यातून एक अश्रू पृथ्वीच्या दिशेने फेकला. अन् बघता बघता, त्या एका मोत्याने चातकाची क्षुधा शांत केली, अन् त्याच्यामागोमाग आणखी एक मोती, मातीला बिलगला. एकामागून दुसरा अशाप्रकारे नभाने डोळ्यातून मोती सांडायला सुरुवात केली. मघापासून शांत, जणू ध्यानास बसलेल्या वृक्ष, वेलीत हालचाल झाली. व पाहता पाहता चकाकत्या मोत्यांचे ढीगाचे ढीग भूमातेस बिलगू लागले आणि तो आला, ज्याची वाट मी बघत होते. थंडगार गारवा अंगाला स्पर्श करुन गेला अन् मी धावत धावत खिडकीपाशी आले. खिडकीला उघडणारच होते, इतक्यात मला खिडकी बंद असतानाच खिडकीबाहेरचे दृश्य स्पष्ट दिसत होते. वर्षा सुरु होताच बाजूच्या चाळीतली सगळी चिमुरडी मुले घराबाहेर येऊन अंगणात नाचत होती, पावसाचा मनसोक्त आनंद घेत होती. मी त्यांच्या आनंदाला साक्षी बनतच होते इतक्यातच मला खिडकीच्या आरशावर पावसाचे थेंब दिसले जे सोन्याप्रमाणे चमकत होते. मी त्यांना लगेचच हातात झेलण्याचा प्रयत्न केला, पण सारे प्रयत्न व्यर्थ सिध्द व्हायचे कारण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच ते थेंब कुठल्याकुठे गायब व्हायचे, जसे धुके, बरोबरच ना, काही गोष्टी, आपल्या हातात नसतात. 

मी निरंतर त्या थेंबांचे निरीक्षण करत होते. खिडकीवरुन ओघळणारे थेंब ते, डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच, खाली ओघळायचे. त्यांना पाहून मनात विचारांची मुसळधार वर्षा आली. किती वेडे असतात ना हे मोती? एकदम लहान मुलांच्या बालवयासारखे. किती सुंदर असते हे बालवय, एक असा पावसाचा थेंब, जो एकदम आरशासारखा स्वच्छ असतो, निर्मळ असतो. कसल्याही दुसऱ्या गोष्टीची मिसळ नसते. आत्ताच्या ह्या कलीयुगात केवळ छोट्या पदार्थापासून ते व्यवहारापर्यंत प्रत्येकात भेसळ ही असतेच, पण बालमनात कधीही कुठल्याही प्रकारच्या दुर्गुणाची भेसळ असत नाही. कुणाची चिंता नाही, की कुणाच्या फिकीरचा धग लागत नाही. वयाचा हा टप्पा म्हणजे जणू मुक्तछंदाचे फुलपाखरुच, ज्या विश्वात आपण आलो आहोत, ज्या सृष्टीत ईश्वराने आपणास मनुष्य जन्म दिला आहे, त्या सृष्टीचे सौंदर्य न्याहाळतानाच मुले हरवून जातात. त्या खिडकीवरुन ज्यावेळी पावसाचा तो थेंब खाली यायचा ना, त्यावेळी पाण्याच्या त्या इवलुशा छटा आपल्या अंशाच्या स्वरुपात मागे एका रांगेत जणू सोडायचा. अन् वरुन खाली पोहोचताना मात्र तो थेंब अगदी छोट्याशा टिंबासारखा भासायचा. 

बालमनाचेसुध्दा असेच असते ना, लहान मुले विश्वानंद घेताना, बालवयाचा प्रत्येक टप्पा जगताना, गोड अविस्मरणीय स्मृती मागे ठेवून आपल्या वयाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करतात. जसे जसे वय वाढते तसतसे जबाबदाऱ्या वाढतात. बालदिनाच्या दिवशी प्रत्येकाच्या मनात एक इच्छा नक्कीच जागृत होते. ती म्हणजे लहानपण देगा देवा… प्रत्येकाला पुन्हा लहान व्हावेसे वाटते. आपण म्हणतो की बालवय खरेच खूप चांगले होते. ना कसली चिंता, ना कोणती बंधने होती. वयोमानाप्रमाणे नक्कीच आवडी निवडी, जिवनशैलीचे स्वरुप, शारीरिक स्वरुप, मानसिक स्वरुप बदलते, पण हृद्याचे स्वरुप का बदलावे? मन हे मनच असते, ते जरी दिसत नसले तरीसुध्दा त्याचे अस्तित्त्व आपल्याला सतत भासते. वयाने जरी वाढले, तरीही मनाने वृध्द होणे गरजेचे आहे का? काही गोष्टी असतात ज्यावर बंधने लादली जातात, पण कुठल्याही गोष्टीमुळे झालेल्या आनंदानुभूतीवर, गरज नसताना बंधने का लादावी ह्या गोष्टीचा विचार केला आहे का कुणी? नक्कीच वयाच्या प्रत्येक टप्प्यासोबत कित्येक आव्हाने येतात, यश अपयशाला सामोरे जावे लागते, बालवयात जी गोष्ट आई बाबांकडून केवळ एका शब्दाच्या आधारे सहज उपलब्ध व्हायची, त्याच्यासाठी मोठे झाल्यानंतर स्वत: कष्ट करावे लागतात. पण हे सर्व घटक जणू आपल्या जीवन कादंबरीचा भाग आहे. मुळात माझ्यामते आपण आपले जीवन कसे जगावे, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते, त्यामुळे आपण स्वत:वर जी बंधने लादून घेतो ना, त्याचे मूळ कारण सुध्दा आपण स्वत:च असतो. आपल्या हसण्या बागडण्यावर, नैसर्गिक मजा लुटण्यावर निर्बंध का घालावे? 

आजकाल मानव जीवनाला अनेक रोग व्याधींनी ग्रासलेले आहे, मूळ वयाच्या आधीच वृध्दावस्था शरीरास वेठीस धरते. ह्या समस्येचे कारण म्हणजेच आपल्या मनाचे वाढते वय होय. शरीराचे वय वाढतेच, त्यावर काहीच बंधन नाही, पण मनाचे वय आपण नियंत्रित करु शकतो. त्यामुळेच म्हणतात की शरीराने जरीही वृध्द झालो तरीही मनाने सतत तरुणच राहिले पाहिजे, आणि त्यानुसार आपला दृष्टिकोण असायला हवा. जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोण जर सतत सकारात्मक असेल तर नक्कीच शारीरिक वयाच्य़ा शंभरीचे क्षण सुध्दा गुण्यागोविंदाने समाज जगेल. फक्त एकच गोष्ट करायची, आपल्यातील बालमनाला जीव त्यागू द्यायचा नाही. सतत आपल्यातल्या एक लहान मुलाला स्वत:त जिवंत ठेवावे. जर कोणत्याही गोष्टीचा आनंद अनुभवण्याची इच्छा झाली, तर आपल्या मनावर कोणते बंधन असता कामा नये, दडपण, ताणतणाव असता कामा नये, बालवय खरेच खूप चांगले होते, हे म्हणण्यापेक्षा जर आपण वयाचा प्रत्येक टप्पा आपला दैनंदिन व्यवहार सांभाळून बालवयाप्रमाणे जगलो तर, जीवनाचा अमृतानुभव घेता येईल. नक्कीच विचार करा.