पाऊलवाटा

कुणा सासूरवाशीण सुनेला आपल्या माहेरला घेऊन जाणारी हे पाऊलवाट खूपच प्रिय आणि मनापासून आवडणारी असते कारण ती तिला आपल्या मायेच्या माणसांपर्यंत घेऊन जाणारी असते. तिच्याबद्दल तिला ओढ वाटत असते. ती तिच्यासाठी अगदी एखाद्या सखीसारखी असते, तिच्या मनातलं हितगुज जाणणारी वाटते.

Story: तिच्या मनातलं | प्रतिभा कारंजकर |
24th June 2022, 10:09 Hrs
पाऊलवाटा

झाडांनी दाटलेल्या भागातून सर्वत्र हिरव्यागार गवताच्या कुरणातून माणसांनी, प्राण्यांनी, पशुपक्षांनी चालून त्यांच्या पायामुळे तयार झालेल्या वाटा म्हणजे पाऊलवाटा. आपल्या धरणी मातेच्या विपुल केश सांभारातून काढलेली जणू भांगरेषा. शहरात कॉन्क्रिटच्या जंगलात मात्र या पाऊलवाटा आखिव, रेखीव आणि मानवनिर्मित असतात, पण निसर्गाच्या सानिध्यात गावातून, शेती-भातीतून, वना-रानातून या ठायीठायी दिसून येतात. आपापल्या सोयीनुसार त्या घडवल्या जातात. शेतकऱ्यांसाठी, वन भ्रमंती करणाऱ्या वाटसरुंसाठी या मार्गदर्शक ठरतात. या पाऊलवाटेवर ना कसल्या नावाचा उल्लेख असतो, ना कसली पाटी लिहिलेली असते. पण तरीही त्या अशा अनोख्या प्रदेशात वाट दाखवतात.

या पाऊलवाटा आपल्याला अनेक रूपात भेटत असतात. कधी या वाटा हिरव्यागार झाडीत दडलेल्या अन शोधूनही लवकर न सापडणाऱ्या असतात. याची नोंद कुठल्याही जिपीएसमध्ये तुम्हाला मिळणार नाही. पण दिशादर्शक ठरून तुमच्या ईप्सित ध्येयापर्यंत तुम्हाला घेऊन जाण्याचं काम करतात. कधी उन्हाळ्याच्या तडाख्याने वाळलेल्या गवतात या लपून जातात, तर कधी थंडीत तलम धुक्याच्या आवरणाखाली दिसेनाश्या होतात. पालापाचोळ्यांनी झाकून ठेवल्याने हरवल्या गत होतात, कुठे उंच डोंगराच्या कुशीत हळूच शिरून अदृश्य होऊन जातात. शिवाराच्या उभ्या पिकात शेतकऱ्याला चालायला वाट देणाऱ्या ठरतात, तर कुणा डोंगर पर्वतावर हायकिंग ट्रेकिंगला जाणाऱ्यांसाठी उत्तुंग शिखरावर पोचवणाऱ्या ठरतात. शहरातून गावाकडे येणाऱ्या एखाद्या नवख्याला गाव कुसाच्या पोटात नेऊन पोचवतात. एखाद्या नदी तीरावर हळूच नदीच्या थंडगार पाण्यात पाय सोडून बसल्यागत दिसतात. 

शहराच्या गल्ली बोळातून एखाद्या आड बाजूच्या घरापर्यंत पोचवतेती पायवाट.  त्या कधी कधी आंखिव रेखीव स्वच्छ म्युन्सिपाल्टीने तयार करून दिलेल्या असतात पण त्यांना गावाच्या पाऊल वाटेची सर येत नाही. मलिन मातीच्या दगड धोंडयाच्या चालून चालून मळलेल्या आणि रुळलेल्या या पाऊलवाटा कुणालातरी कुठेतरी पोचवण्याचं काम करत असतात. कुणा सासूरवाशीण सुनेला आपल्या माहेरला घेऊन जाणारी हे पाऊलवाट खूपच प्रिय आणि मनापासून आवडणारी असते कारण ती तिला आपल्या मायेच्या माणसांपर्यंत घेऊन जाणारी असते. तिच्याबद्दल तिला ओढ वाटत असते. ती तिच्यासाठी अगदी एखाद्या सखीसारखी असते, तिच्या मनातलं हितगुज जाणणारी वाटते. तर कधी दोन प्रेमी जीवांना एकांतात भेटवणारी त्यांची सहकारी वाटते. ती त्याची अन तो तीची वाट पाहत या वाटेवरच भेटणार असतात. गावाच्या मामाकडे घेऊन जाणारी ही पाऊलवाट मुलांसाठी अगदी परिचयाची आपलीशी वाटत असते कारण सुट्टीत या वाटेवर त्यांचा धुडगुस चालणार असतो. आंबे चिंचा आवळे यांचा रानमेवा शोधायला ही पाऊलवाटच त्यांना मदत करणारी असते. आणि त्यांचा हा आनंदोत्सव बघणारी ती पाऊलवाटही आनंदविभोर होत असावी. खूप दिसांनी कुणी आपलं भेटलं गं असं तिलाही वाटत असावं. अनेक जणांच्या पावलांखाली येऊ लागते तेव्हा तिचं तिलाच धन्य धन्य वाटत असावं . कधी कधी मात्र या पाऊलवाटेच्या पाऊलखुणा नष्ट होत जातात, त्यावरची वर्दळ कमी कमी होत जाते तेव्हा ती नामशेष होऊ लागते तर काही ठिकाणी मात्र या पाऊलवाटे वरची वर्दळ आणि रहदारी वाढत जाताना बघून त्या पाऊलवाटेचं रूपांतर रस्त्यात होऊ लागतं आणि गरजेप्रमाणे पुढे त्याचे परिवर्तन मोठ्या हमरस्त्यात होऊ लागतं अशी ही पाऊलवाटेची प्रगती म्हणजे तिच्या आजूबाजूच्या प्रदेशने टाकलेली कात आणि नवीन नवीन प्राधिकरणे लोकांची वसतीस्थाने यांची जेव्हा रचना होऊ लागते तेव्हा ती पाऊलवाट होते मोठ्ठ्या रस्त्यात रूपांतरित. गर्वाने तिचं रूप असं फुलून येत असावं. पण एखाद्या अनघड जागेवरती मात्र अशा पाऊलवाटा तयार होतच असतात. कारण नवीन नवीन पावलांना नवीन नवीन पाऊलवाटांची गरज भासतेच मग त्यांना त्या जडवत घडवत त्यावर पायपीट करावी लागते.