डिजिटल मीटर न वापरणाऱ्यांचे परवाने सोमवारपासून निलंबित!

वाहतूकमंत्री : ‘ओला‘, ‘उबर’ लवकरच येण्याचेही संकेत

|
24th June 2022, 12:13 Hrs
डिजिटल मीटर न वापरणाऱ्यांचे परवाने सोमवारपासून निलंबित!

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : डिजिटल मीटर न वापरणाऱ्या टॅक्सी मालकांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया वाहतूक खात्याकडून पुढील आठवड्यापासून सुरू होणार अाहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. सरकारचे नियम न पाळणारे टॅक्सीमालक स्वत:हूनच ‘ओला’, ‘उबर’ला गोव्यात आमंत्रण देत आहेत, असेही गुदिन्हो म्हणाले.      

गोवा पर्यटन राज्य असल्याने टॅक्सी व्यवसायात पारदर्शकता यावी, पर्यटकांना सुरक्षितता मिळावी यासाठी भाजप सरकारने गत कार्यकाळात पर्यटक टॅक्सींना डिजिटल मीटर, पॅनिक बटण, जीपीएस यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सुरुवातीपासूनच काही टॅक्सी मालकांनी विरोध दर्शवला. परंतु, वाहतूक खात्याने मीटर न बसवणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केल्यानंतर त्यांनी मीटर बसवण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेकांनी​ मीटर बसवली; पण त्यांच्याकडून मीटरचा वापरच होत नसल्याचे आणि मीटरची गरज नसल्याचे सांगून पर्यटकांना लुटले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच जे टॅक्सीमालक डिजिटल मीटरचा वापर करत नाहीत, अशांचे परवाने तत्काळ निलंबित करण्याची प्रक्रिया वाहतूक खात्याकडून पुढील आठवड्यापासून सुरू केली जाणार आहे, असे मंत्री गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.       

काही ठिकाणी टॅक्सी मालकांकडून दादागिरी सुरू आहे. त्यांच्याकडून आपल्या भागांत इतर टॅक्सींना घेण्यास मज्जाव केला जात आहे. त्याचा परिणाम पर्यटकांवर होत असून राज्याचीही बदनामी होत आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा दमही त्यांनी यावेळी भरला.

मनमानीमुळे इतर सेवा आणाव्या लागतील !

स्थानिक टॅक्सी मालकांच्या फायद्यासाठी सरकारने ‘गोवा माईल्स’ला नियम केले. आता सरकारला ‘ओला’, ‘उबर’सारख्या अॅपवर आधारित टॅक्सी सेवा आणायच्या नाहीत. परंतु, काही टॅक्सी चालकांच्या मनमानी कारभारामुळे अशा सेवा गोव्यात येऊ शकतात, असे संकेतही मंत्री गुदिन्हो यांनी दिले.