अफगाणिस्तानात सलग दुसऱ्या दिवशी भूकंप

|
23rd June 2022, 11:08 Hrs
अफगाणिस्तानात सलग दुसऱ्या दिवशी भूकंप

काबूल : अफगाणिस्तानला सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचा दुसरा मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानच्या काही भागात गुरुवारी सकाळी ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. मात्र यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून ७६ किलोमीटर अंतरावर होता. याआधी बुधवारी पूर्व अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात १००० लोकांचा मृत्यू झाला होता, तर १५०० हून अधिक जण जखमी झाले होते. बुधवारी आलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर ताबिबानने मंत्रिमंडळाने तातडीची बैठक बोलावली.

याच भागात का होतात भूकंप ?

सुमारे ४० दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय उपखंडाची युरेशियन प्लेटशी टक्कर झाली. त्यामुळे हिमालय पर्वत तयार झाला. आजही हा पर्वत दरवर्षी एक सें.मी. उंच वाढत आहे. या हालचालीमुळे येथे अनेकदा भूकंप होताे. याशिवाय सतत टक्कर होत राहिल्याने थरांची दाब सहन करण्याची क्षमता संपते. जसजसे थर तुटतात तसतसे त्यांच्या खाली असलेली ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. त्यामुळे हिमालयीन भागात भूकंप होतो. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उत्तर भारताचा काही भाग हिमालयाच्या रांगेत येतो. त्यामुळे येथे नेहमीच भूकंपाचा धोका असतो.