नदाल-जोकोविच अव्वल मानांकित

विम्बल्डन २०२२ : महिला एकेरीत पोलंडच्या इंगा स्विटेकला प्रथम स्थान


23rd June 2022, 12:41 am
नदाल-जोकोविच अव्वल मानांकित

विम्बल्डन (इंग्लंड) : टेनिसच्या सर्वात प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेचे सीडिंग मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आले. यामध्ये पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. तर स्पेनच्या राफेल नदालला दुसरे मानांकन मिळाले आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी हे दोन्ही खेळाडू आमनेसामने येऊ शकणार नाहीत. या स्पर्धेचा ड्रॉ शुक्रवारी होणार असून सामने येत्या सोमवारपासून सुरू होणार आहेत. दरम्यान, २०२१ पासून, पुरुष आणि महिला एकेरी जागतिक क्रमवारीच्या आधारावर ही क्रमवारी लावली जाते.
अग्रमानांकित नोव्हाक जोकोविचने ६ वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. तर राफेल नदालने दोन वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. डॅनिल मेदवेदेव आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्या अनुपस्थितीत जोकोविचला अव्वल, तर नदालला दुसरे मानांकन मिळाले आहे. बेलारूसच्या खेळाडूंवर युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल बंदी घातली असून, मेदवेदेवला विम्बल्डनमधून बाहेर ठेवले आहे. तर झ्वेरेव दुखापतीमुळे खेळणार नाही.
मेदवेदेव-झ्वेरेव्हच्या अनुपस्थितीचा जोकोविच-नदालला फायदा
सध्या रशियाचा डॅनिल मेदवेदेव हा पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याचवेळी जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह हा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. हे दोघेही यावेळी विम्बल्डनमध्ये सहभागी होणार नाहीत. त्यामुळे जोकोविच आणि नदालला सीडिंगमध्ये फायदा झाला आहे. विम्बल्डनचे आयोजक असलेल्या ऑल इंग्लंड क्लबने युक्रेन युद्धामुळे रशियन खेळाडूंना खेळण्यास बंदी घातली आहे. यामुळे मेदवेदेव खेळू शकत नाही. तर फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत नदालविरुद्धच्या सामन्यादरम्यान झ्वेरेव्हला दुखापत झाली होती. त्यातून तो अद्याप सावरलेला नसल्याने या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
वर्षभरानंतर सेरेना प्रथमच मैदानात
महिला एकेरीच्या ड्रॉमध्ये २३ वेळची ग्रँडस्लॅम विजेती सेरेना विल्यम्स जवळपास वर्षभरानंतर स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करत आहे. गेल्या वर्षी विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत दुखापत होऊन निवृत्त झाल्यापासून ती एकाही स्पर्धेत खेळलेली नाही. ४० वर्षीय सेरेना विल्यम्स विम्बल्डनची सात वेळची चॅम्पियन आहे. महिलांमध्ये मार्गारेट कोर्टने २४ ग्रँडस्लॅम प्राप्त केल्या असून सेरेनाला तिची बरोबरी करण्यासाठी एका विजेतेपदाची आवश्यकता आहे.

नदाल आणि जोकोविच हे सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आहेत. त्यामुळेच चाहत्यांना अंतिम फेरीत त्यांची टक्कर पाहायला आवडते. मात्र, फ्रेंच ओपनमध्ये आवडते सीडिंग न मिळाल्याने या दिग्गजांना उपांत्यपूर्व फेरीत सामोरे जावे लागले. त्यानंतर नदालने जोकोविचचा पराभव केला आणि १४व्यांदा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले होते.

सरेना विल्यम्स बिगरमानांकित
महिला क्रमवारीत यूएस ओपन चॅम्पियन एम्मा राडूकानूला बेलारूसच्या आर्यना सबालेंकाच्या अनुपस्थितीत १०वे मानांकन मिळाले आहे. पोलंडची जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाच्या इगा स्विटेकला यामध्ये अव्वल, तर एस्टोनियन अॅनेट कोंटावेटला दुसरे मानांकन देण्यात आलेले आहे, तर वाइल्ड कार्ड मिळालेल्या सेरेना विल्यम्सला मानांकन मिळालेले नाही कारण, ती गेल्या वर्षीच्या विम्बल्डनमधील पहिल्या फेरीच्या सामन्यातून निवृत्त झाल्यापासून स्पर्धात्मक टेनिस खेळलेली नाही.