रणजी चषक : मध्यप्रदेशची दमदार गोलंदाजी

मुंबईच्या ५ बाद २४८ धावा; यशस्वी जैस्वालची ८७ धावांची सलामी

|
23rd June 2022, 12:35 Hrs
रणजी चषक : मध्यप्रदेशची दमदार गोलंदाजी

यशस्वी जैस्वाल

बंगळुरू : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ रणजी चषकाच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेश विरुद्ध खेळत आहे. रणजी क्रिकेटच्या इतिहासात मुंबईने ४७ वेळा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. मुंबईची सुरुवात कर्णधार शॉ आणि यशस्वीच्या मदतीने चांगली झाली. पण, नंतर मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत दोघांनाही बाद करत दिवसअखेर मुंबईचा निम्मा संघ तंबूत धाडला. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा मुंबईचा संघ ५ बाद २४८ धावांवर खेळत होता.
सामन्याच्या सुरुवातीला मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल यांनी संघाला एक दमदार सुरुवात करून दिली. सुरुवातीच्या षटकांमध्ये मध्य प्रदेशच्या गोलंदाजांना यश मिळणार नाही, याची मुंबईच्या सलामीवीरांनी काळजी घेतली. पृथ्वी आणि डावखुऱ्या यशस्वी जैस्वालने पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची सलामी दिली. पण पृथ्वी अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना अनुभव अगरवालने त्याला ४७ धावांवर बाद केले. त्यानंतर यशस्वीने मात्र झुंज कायम ठेवली. नंतर अरमान जाफर २६, सुवेद पारकर १८ धावांवर बाद झाले. त्यानंतर यशस्वीही १६३ चेंडूत ७८ धावा करून तंबूत परतला. अनुभव अगरवालनेच त्याला बाद केले.
‍त्यानंतर हार्दिक टामोरेही २४ धावा करून बाद झाला. सर्फराज खान ४० धावांवर भक्कम स्थितीत आहे. तर शम्स मुलीनीही १२ धावांवर त्याला साथ देत आहे. सर्फराजने या सीजनमध्ये ८००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे गुरुवारी सर्फराजची बॅट तळपली, तर मुंबई धावांचा डोंगर उभारेल. मध्यप्रदेशकडून अनुभव अगरवाल आणि सारांश जैन यांनी प्रत्येकी दोन, तर कुमार कार्तिकेयने एक विकेट घेतली.

उत्तरप्रदेशला मागे टाकत मुंबई फायनलमध्ये
मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केला. मुंबईने पहिल्या डावात ३९३ धावा केल्या होत्या. त्यानंतर उत्तर प्रदेशला १८० धावांत गुंडाळले. दुसऱ्या डावात मुंबईने ४ बाद ५३३ धावांचा डोंगर उभारला आणिपहिल्या डावाच्या आधारावर त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला.