मरिटाईम स्कूल बिठ्ठोणमध्ये उभारणार : मुख्यमंत्री

चोडण-रायबंदर मार्गावर लवकरच सोलर फेरीबोट सुरू होणार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st June 2022, 11:48 pm
मरिटाईम स्कूल बिठ्ठोणमध्ये उभारणार : मुख्यमंत्री

पणजी : आशिया खंडातील दर्जेदार असे मरिटाईम स्कूल पुढील वर्षभरात बिठ्ठोण येथे उभारण्यात येणार आहे. ‘सागरमाला’ योजनेअंतर्गत केंद्राकडून अधिकाधिक प्रकल्प गोव्यात आणण्याचे प्रयत्न आपण करीत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे बंदर आणि कप्तान खात्याचा ताबा आला आहे. मंगळवारी त्यांनी खात्याच्या अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘सागरमाला’ योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून अधिकाधिक प्रकल्प आणि निधी गोव्यात आणण्यावर आपला भर आहे. या योजनेअंतर्गत बिठ्ठोण येथे सार्वजनिक-खासगी तत्त्वावर (पीपीपी) उभारण्यात येणार असलेल्या मरिटाईम स्कूल उभारणीची बहुतांशी प्रक्रिया पूर्ण झालेली असून, पुढील वर्षभरात हे स्कूल उभारण्यात येईल. या स्कूलमध्ये पदवी पातळीवरील अभ्यासक्रमही शिकवला जाईल, असे ते म्हणाले.
पणजीतील नियोजित टर्मिनल इमारतीचे बांधकाम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. तर, पुढील काही महिन्यांत चोडण-रायबंदर मार्गावर सोलर फेरीबोट सुरू करण्याची प्रक्रियाही सरकारकडून सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. साळ नदीतील गाळ काढण्याचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या कामाला गती देण्यात येईल. शिवाय सध्या तीन ठिकाणी तरंगत्या जेटी बांधण्याचे काम सुरू असून, पुढील काही महिन्यांत इतर ठिकाणच्या जेटींचे कामही हाती घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.