राज्यात ३,५४२ इलेक्ट्रिक वाहनांची नोंद

पेट्रोल, डिझेल वाहनांच्या तुलनेत प्रमाण ०.३२ टक्के

Story: गणेश जावडेकर |
21st June 2022, 11:45 pm
राज्यात ३,५४२ इलेक्ट्रिक वाहनांची नोंद

पणजी : पेट्रोल तसेच डिझेलचा वापर कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे सरकारचे धारण आहे. सध्या राज्यात ३ हजार ५४२ इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे, अशी माहिती वाहन डॅशबोर्ड पोर्टलने जारी केली आहे. तर अन्य वाहनांचा आकडा ११ लाख ३१ हजार ७४७ इतका आहे. याच्याशी तुलना केली असता इलेक्ट्रिक वाहनांची टक्केवारी ०.३२ टक्के इतकी आहे.
राज्यात वाहतूक खात्याकडे ३१ मार्चपर्यंत २ हजार ८७० इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे. यातील कदंब महामंडळाच्या ताफ्यातील ५१ इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. अन्य वाहनांमध्ये खाजगी आणि सार्वजनिक वाहनांचा समावेश आहे. यात २,२८५ दुचाक्या, ३० रिक्षा, ४८६ चारचाकी वाहने, १६ मालवाहतूक करणारी वाहने व २ अन्य वाहनांचा समावेश आहे. सार्वजनिक वाहतूक करणारी ९८ तर खाजगी २,७७२ वाहने इलेक्ट्रिक आहेत.
केंद्र सरकाराच्या वाहन डॅशबोर्डाच्या नोंदीप्रमाणे गत सहा महिन्यांत २,०७१ इलेक्ट्रिक गाड्यांची नोंद झाली आहे. यापूर्वी २०२१ मध्ये १,०९४ तर २०२० साली ८० इलेक्ट्रिक गाड्यांची नोंद झाली आहे. अन्य वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्याचे प्रमाण जास्त आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त आहे. हा दर परवडत नाही. यामुळे सध्या गोव्यात या वाहनांची विक्री जास्त नाही. तसेच चार्जिंग स्टेशनही नाहीत. त्यामुळे दूरच्या प्रवासाला ही वाहने फायदेशीर ठरत नाहीत. - प्रशांत जोशी, अध्यक्ष, गोवा ऑटोमोबाईल विक्री संघटना

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या

वाहन         सार्वजनिक             खाजगी         एकूण
दुचाकी         १                        २,२८४         २,२८५
तीनचाकी     २६                             ४               ३०
चारचाकी       ४                         ४८२             ४८६
बसेस           ५१                             ०               ५१
अन्य               २                             ०                 २
एकूण :         ९८                       २,७७२          २,८७०
(३१ मार्च २०२२ पर्यंतची आकडेवारी)