बेकायदेशीर बांधकामांबाबत तक्रारीसाठी मंत्री राणेंकडून ई-मेल आयडी जारी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st June 2022, 11:44 pm
बेकायदेशीर बांधकामांबाबत तक्रारीसाठी मंत्री राणेंकडून ई-मेल आयडी जारी

पणजी : बेकायदेशीररीत्या जमीन रूपांतर किंवा संरक्षित जमिनींमध्ये बेकायदेशीररीत्या बांधकामे केलेल्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी ई-मेल आयडी जारी केला आहे. तत्काळ कारवाईसाठी संबंधित ई-मेल आयडीद्वारे फोटो व कागदपत्रांचे पुरावे पाठवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्यातील संरक्षित, जैव संवेदनशील जमिनींचा बेकायदेशीररीत्या वापर केलेल्यांवर कारवाई करण्यासाठी मंत्री विश्वजीत राणे यांच्या नगरनियोजन खात्याने गेल्या काही महिन्यांपासून ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अनेक ओडीपी निलंबित करून नगरनियोजन मंडळाने काही बांधकामांना ‘कारणे दाखवा’ नोटिशीही बजावल्या आहेत. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राज्यातील जमीन लुटू पाहणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांनी [email protected] या ई-मेलवर तक्रार, फोटो व कागदपत्रांचे पुरावे पाठवावे. अशा तक्रारींची तत्काळ दखल घेण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा