म्हापसा येथे अमली पदार्थ तस्करी; एकास अटक

|
21st June 2022, 12:08 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
गुन्हा शाखेने म्हापसा येथील कार्व्हालो पेट्रोलपंपाजवळ छापा टाकून अमली पदार्थ तस्करी प्रकरणी ओमप्रकाश तार्ड (२९, रा. बिकानेर-राजस्थान) याला रविवारी रात्री अटक केली होती. अटक केलेल्या संशयिताला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, म्हापशातील नव्या बसस्थानकाजवळ अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती गुप्तहेराने गुन्हा शाखेच्या एका अधिकाऱ्याला दिली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मार्लोन डिसोझा व इतर पथकाने रविवार दि. १९ रोजी सायं. ४.३० ते ७ दरम्यान या परिसरात सापळा रचून संशयित ओमप्रकाश तार्ड याला ताब्यात घेतल‍े. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून ६ लाख रुपये किमतीचा ६ किलो गांजा जप्त करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक जयराम कुंकळकर यांनी संशयिताविरोधात अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला रात्री उशिरा अटक केली होती. अटक केलेल्या संशयिताला सोमवारी पोलीस कोठडीसाठी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयिताला १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.