काबूलमध्ये स्फोट; दोघांचा मृत्यू

हल्ल्यामागे इस्लामिक स्टेटच्या खुरासान मॉड्यूलचा हात असल्याची शक्यता

|
19th June 2022, 12:30 Hrs
काबूलमध्ये स्फोट; दोघांचा मृत्यू

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील गुरुद्वारा कर्ता परवानवर शनिवारी दहशतवादी हल्ला झाला. टोलो न्यूजनुसार, येथे सकाळी ७.१५ च्या सुमारास (भारतीय वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता) हल्ला सुरू झाला. येथे दोन बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्यात दोन अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेटच्या खुरासान मॉड्यूलचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.      

दरबार हॉलपर्यंत पसरली आग

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वारातून तीन जण बाहेर पडू शकले आहेत. त्यांपैकी दोघांना रुग्णालयात पाठवण्यात आले. मुस्लीम असलेल्या गुरुद्वाराच्या रक्षकाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. तीन तालिबानी सैनिकही जखमी झाले. श्री गुरू ग्रंथ साहिब आणि गुरुद्वाराच्या मुख्य दरबार हॉलमध्येही आग पसरली होती. किमान दोन हल्लेखोर गुरुद्वाराच्या आवारात असल्याचा अंदाज होता. गोळीबार बराच वेळ सुरू होता.      

दोन वर्षांपूर्वी गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यात २५ जणांचा मृत्यू झाला होता

२५ मार्च २०२० रोजी, आयएसआयएस-हक्कानी नेटवर्कच्या बंदूकधारी आणि फिदायन हल्लेखोरांनी काबूलमधील गुरुद्वारा हर राय साहिबवर हल्ला केला होता. त्यावेळी गुरुद्वारामध्ये सुमारे २०० लोक उपस्थित होते. त्यांपैकी २५ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश होता. या हल्ल्यात ८ जण जखमी झाले होते. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अनेक तास चकमक झाली होती. यामध्ये सर्व दहशतवादी मारले गेले होते.