बिहारमध्ये चौथ्या दिवशीही हिंसाचार

अनेक ठिकाणी दगडफेक, आगी लावण्याचे प्रकार : काही ठिकाणी पोलिसांकडून गोळीबार


19th June 2022, 12:27 am
बिहारमध्ये चौथ्या दिवशीही हिंसाचार

पाटणा : केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात बिहारमधील आंदोलनाचा शनिवारी चौथा दिवस होता. शनिवारी पाटणामधील मसौधी येथील टारगेना स्टेशनजवळ दगडफेक आणि गोळीबार झाला. आंदोलकांनी रेल्वे स्थानकाची तोडफोड केली. पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने पेटवून देण्यात आली. पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला.

मसौढी येथे सकाळी ८ वाजता कोचिंगमधून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थी स्टेशनवर जमा झाले आणि स्थानकाची तोडफोड सुरू केली. स्टेशन मास्तरांची केबिन आणि बुकिंग काउंटर पेटवून देण्यात आले. वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. यानंतर आंदोलकांकडून पोलिसांवर १०-१५ राउंड गोळीबार करण्यात आला. बचावासाठी पोलिसांनी १००हून अधिक गोळ्या झाडल्या. बक्सरच्या नवानगरमध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन करणाऱ्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या दरम्यान हल्लेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलीस निरीक्षकांची गाडी पेटवून देण्यात आली. बचावासाठी पोलिसांनी दोन-चार राउंड फायर केले.

१५ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद

शनिवारी ‘बिहार बंद’ची हाक देण्यात आली होती. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर १५ जिल्ह्यांमध्ये १९ जूनपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. खासगी शाळांनाही सुट्टी देण्यात आली होती. जेहानाबादच्या तेहता मार्केटमध्ये सकाळी ७.३० वाजता आंदोलकांनी दगडफेकीनंतर ट्रक पेटवला. माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत आंदोलक निघून गेले होते. या घटनेत ट्रक पूर्णपणे खाक झाला. भागलपूरमध्ये रेल्वे स्थानकावर अर्धा डझन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. स्थानकावर सुरक्षेसाठी अग्निशमन दल आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवला होता.

उपमुख्यमंत्री आणि भाजप अध्यक्षांच्या घरावर हल्ला

बेतियामध्ये आंदोलकांनी उपमुख्यमंत्री रेणू देवी, भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या घरांवर हल्ला केला. येथे भाजप आमदार विनय बिहारी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी सासाराम आणि मधेपुरा येथील भाजपच्या कार्यालयांना आग लावली. एक दिवसापूर्वी नवाडा येथील भाजपचे कार्यालय जाळण्यात आले होते. दोन आमदारांवर हल्ला झाला होता.

काँग्रेसचे आज दिल्लीत आंदोलन

अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ काँग्रेस उद्या म्हणजेच १९ जून रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे खासदार, कार्यकारिणी सदस्य आणि AICC पदाधिकारी या सत्याग्रहात सहभागी होणार आहेत.