धर्मस्थळ- भारताचा प्राचीन वारसा

हे संपूर्ण मंदिर न्याहाळताना आमच्या मनात अनेक कुतुहलांचे वादळ उठले होते. मंजुनाथ हा शिवाचा अवतार आहे हेही आम्हाला नव्यानेच कळले...

Story: भवताल | संतोष काशीद |
18th June 2022, 11:50 Hrs
धर्मस्थळ- भारताचा प्राचीन वारसा

दक्षिण भारत म्हणजे देवादिकांची भूमी. भारतवर्षात हिंदुत्वाचा विशेषत्वाने जागर करणारा प्रदेश म्हणून दक्षिण भारतातील अनेक राज्यांचा उल्लेख करता येतो. याच परंपरेची देणगी देणारे दक्षिण भारतातील प्रसिद्ध कर्नाटक राज्यही आपल्या उदरात इतिहासाची असंख्य पाने घेऊन आडवे तिडवे पसरलेले आहे. कर्नाटकात हंपी, बदामीसारखी ऐतिहासिक वारसा जपणारी शहरे आहेत सोबतच मुरुडेश्वर, गोकर्णसारखी पवित्र धार्मिक स्थळेही आहेत. धार्मिक स्थळांच्या या शृंखलेत सुदूर मंगळुरू शहरापासून अगदी जवळ असलेले दक्षिण कन्नड तालुक्यातील 'धर्मस्थळ' हे स्थान विशेषत्वाने उठून दिसते. भगवान महादेवाच्या अनेकविध रुपांपैकी मंजुनाथेश्वर या अवताराचं हे धर्मस्थळ. आज देशविदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले धर्मस्थळ भारताच्या धार्मिक परंपरेचं एक महत्त्वाचं स्थळ आहे हे आवर्जून उल्लेखलं पाहिजे. गत आठवड्यात मी, रावसाहेब, श्रीधर अन अभिजित असे चार मित्रमंडळी या धार्मिक स्थळाचा अभ्यास दौरा करून आलो. एरव्ही भटकंती म्हणजे निव्वळ धांगडधिंगा असं समीकरण ठरलेलं असताना आम्ही मात्र दर्शन, अभ्यास या हेतूने धर्मस्थळ जवळ केले. 

आठशे वर्षांचा प्रचंड इतिहास असलेल्या मंजुनाथ देवालयाच्या स्थापनेचा इतिहासही मोठा रंजक आहे. हे स्थळ दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेलथांगडी विभागातील मल्लारमाडीमध्ये कुडुमा नावाने ओळखले जात होते. प्रसिद्ध रत्नागिरी डोंगररांगेच्या पश्चिमेला वसलेले हे देवस्थान शेकडो भाविकांच्या उपस्थितीने कायम वर्दळीचे असते. प्रसिद्ध जैन साधक बिरमन्ना पेरगडे (पुढे हे नाव हेगडे असं झाले) हे आपली पत्नी अम्मू बल्लालथी हिच्यासमवेत नेलियाली बिडू या आपल्या गावी राहत असत. ते अत्यंत धार्मिक होते. घरात तिन्ही त्रिकाळ पूजापाठ, धर्मजप, अनुष्ठाने चालू असत. एक दिवस प्रत्यक्ष देवलोकातून धर्माचे रक्षक कालाराहु, कालारकेय, कुमारस्वामी आणि कन्याकुमारी हे चार विशेष अतिथी धर्मप्रचारार्थ मानवी अवतार घेऊन बिरमन्नाच्या घरी अवतरले. या जैन साधकाने या चारही अतिथींचे अत्यंत मनोभावे स्वागत केले. चारही अतिथींच्या धार्मिक विद्वत्तेचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला. एक दिवस भगवान धर्म त्यांच्या स्वप्नी येऊन बिरमन्नाला चारही अतिथींच्या सत्यतेचे गूढ समजावून सांगितले. त्यांच्या मानवी रुपात अवतार घेण्याचा उद्देशही सांगितला. 

पुढे या साधकाची परीक्षा घेण्याच्या हेतूने या अतिथी रुपात अवतरलेल्या देवदूतांनी बिरमन्नाला त्याचे निवासस्थान सोडावयाची आज्ञा केली. बिरमन्नाने प्रसन्नतेने पत्नीसमवेत ते निवासस्थान मोकळे केले. पुढे या देवदूतांसाठी बिरमन्नाने चार विशेष मंदिरांची निर्मिती केली. भगवान धर्माने बिरमन्नाला या चारही देवांच्या सेवाकार्यासाठी चार विशेष देवदूतांनी निवड करावयास सांगितले. तसेच इतर व्यवस्थेसाठी आणखी दोन सेवेकऱ्यांची निवड करण्याची आज्ञा केली. बिरमन्नाने पूजेसाठी चार हिंदू पूजाऱ्यांची नियुक्ती करून स्वतः पत्नीसमवेत देवस्थानाची व्यवस्था पाहू लागला. धर्माच्या आज्ञेवरूनच बिरमन्नाने अन्नप्पा स्वामी नावाच्या जहागिरदाराला मंगळुरू जवळच्या कादरी मंजुनाथ शिवमंदिरातून एक शिवलिंग सर्व शुचिता पाळून इथे स्थापन करण्याची विनंती केली. अन्नप्पा स्वामीने चारही देवतांच्या समवेत या मंजुनाथ शिवलिंगाची स्थापना केली. पुढे या स्थळाचे धार्मिक महत्त्व वाढले. भगवान धर्माचे स्थळ म्हणून 'धर्मस्थळ' या नावाने हे स्थळ परिसरात ओळखू लागले. आज दिसत असलेले भव्य मंदिर हे या शिवलिंग भोवतीच पसरलेले आहे. मंजुनाथ शिवालयामुळे या देवस्थानाला मंजुनाथ मंदिर असे म्हटले जाते.

मुख्य मंजुनाथ मंदिर हे पाषाणी स्वरूपात असून खास दाक्षिणात्य द्राविडी मंदिर स्थापत्याने त्याची सुंदरता आणखी खुलून दिसते. मंदिरावर अत्यंत सुरेख नक्षी असून त्याचे स्तंभ शिल्पांकीत आहेत. मंदिरात स्वर्णीय शिवलिंग आहे, सोबतच भागवान मंजुनाथ यांची प्रतिमाही स्थापित आहे. संपूर्ण गर्भगृह बाहेरच्या बाजूने मजबूत काचांनी संरक्षित केले गेले आहे. याचे प्रयोजन मात्र आमच्या लक्षात आले नाही कारण, इतकं सुंदर शिल्प असं काचेत बंदिस्त करून ठेवल्याने त्याच्या मूळ सौंदर्यात कुठेतरी कमीपणा जाणवतो. गर्भगृहाच्या बाहेरचा संपूर्ण प्राकार उत्तम काष्ठशिल्पाने बंदिस्त केला आहे. ठिकठिकाणी जुन्या काळातील उत्तम हंड्या, झुंबरे लटकलेली आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराचे छत लाकडी नक्षीकामाने इतके सुशोभित आहे की नजर हटत नाही. रोज या मंदिराची काकड आरती पहाटे सुरू होते. भक्तांसाठी याचवेळी मंदिर खुले केले जाते. असं म्हणतात की,  जे भक्त या काकड आरतीसाठी उपस्थित होतात त्यांना भगवान महादेवाचा विशेष आशीर्वाद मिळतो, यामुळेच मंजुनाथ मंदिराच्या काकड आरतीसाठी भक्तसमुदाय मोठ्या प्रमाणावर हजर असतो. 

मुख्य मंदिरात प्रवेशताना परंपरेनुसार सोवळे पाळण्याची प्रथा आजही आहे. महादेव म्हणजे सर्वस्वाचा त्याग केलेला देवाधिदेव. त्याच्यापुढे इथे नतमस्तक होताना स्वतःतला मी पणा मंदिर प्राकाराच्याबाहेर ठेवूनच यायचे असते. म्हणून ही प्रथा. मंदिरात कुठेही गोंधळ केला जात नाही. इथे पुजारीही भाविकांना सहकार्य करत असतात त्यामुळे दर्शन यथासांग होते. भाविकांसाठी दर्शनरांगेची उत्तम सोय आहे. त्यामुळे गर्दी होत नाही. सेवेकरी असल्याने बऱ्यापैकी स्वच्छता आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील व्हरांड्यात पोलीस बंदोबस्त आहे, तिथे एका भिंतीवर तेलगू लिपीमधील ॐ हे आद्याक्षर प्रदर्शित केले आहे. याच व्हरांड्याच्या दर्शनी स्तंभावर दोन्ही बाजूला जय-विजय या रक्षक देवतांच्या पाषाणी प्रतिमा आहेत. इथेच दगडी तुळयांवर तीन प्रचंड घंटा बांधलेल्या दिसतात. मंदिराच्या प्रांगणात प्रचंड लाकडी सुशोभित रथ संरक्षित आहे. रथावर असलेली अंबारी पितळी आहे. त्यामुळे उन्हाची तिरीप पडताच या रथाचं सोनेरी तेज चमकून उठते. 

या मंदिराला देशातील महनीय व्यक्तिमत्त्वांनी अनेकदा भेट दिली आहे. २९ ऑक्टोबर २०१७ मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या मंदिराला भेट दिली होती. त्या प्रसंगीचे छायाचित्र मंदिराच्या दर्शनी भागात लावले आहे. प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकरजी दरवर्षी न चुकता इथे पूजेसाठी येत असतात. हिंदू परंपरेत शैव आणि वैष्णव मंदिराची परंपरा आहे. मंजुनाथ हे शैव मंदिर अर्थात महादेवाच्या मंजुनाथ अवताराचं मंदिर. मात्र तरीही इथले एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचे व्यवस्थापन वैष्णव पंथाचे जैन समुदायी लोक पाहतात तर पूजाअर्चा शैव पुजारी करतात. असं असले तरीही इथले आगळे दैवसोपस्कार यथासांग अव्याहतपणें गेली आठशे वर्षे चालू आहेत. हेगडे (पूर्वीचे पेरगडे) या घराण्यात या ट्रस्टचे मुख्याधिकारी पद वंशपरंपरागत चालू आहे. बिरमन्ना पेरगडे (आत्ताचे हेगडे) यांची सध्याची पिढी मंदिराच्या व्यवस्थापनाचे काम पाहतात. 

हे संपूर्ण मंदिर न्याहाळताना आमच्या मनात अनेक कुतुहलांचे वादळ उठले होते. मंजुनाथ हा शिवाचा अवतार आहे हेही आम्हाला नव्यानेच कळले. देवस्थान प्रचंड परिसरात पसरलेले आहे. लाखो भाविकांची रोज इथे उपस्थिती असते. त्यादृष्टीने मंदिर व्यवस्थापनाने अनेक धर्मशाळा उपलब्ध करून दिल्या आहेत मात्र तरीही ही व्यवस्था कमी पडतेय. त्यासाठी आणखी सुधारित सोय गरजेची आहे. भारताच्या प्राचीन इतिहासाचा वारसा असलेले हे मंदिर भारताच्या प्राचिनतेचा वारसा मोठ्या दिमाखात मिरवत आहे. कर्नाटकच्या धार्मिक पटलावर स्वतःचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या देवनगरी धर्मस्थळाला प्रत्येकाने भेट द्यावी. सर्वांनी मंदिराच्या दर्शनार्थ एकदातरी नक्की जाऊन या. एक विशेष आनंद मिळाल्याची अनुभूती नक्की येईल...