शांतादुर्गा फातर्पेकरीणीचा तोपशोत्सव

Story: लोकसंस्कृती | पिरोज नाईक |
18th June 2022, 11:21 pm
शांतादुर्गा फातर्पेकरीणीचा तोपशोत्सव

दक्षिण गोव्यातील केपे तालुक्यात फातर्पा गाव आहे. गावात श्री फातर्पेकरीण शांतादुर्गेचे भव्य मंदिर आहे. मंदिराचा आतील भाग पौराणिक चित्रे व कलाकुसरीने सुशोभित केलेला दृष्टीस पडतो. मंदिराच्या चारही बाजूला डोंगराच्या कडा असून हिरवागार निसर्गरम्य परिसर मनाला भुरळ पाडतो. येथील शांत व पवित्र वातावरणात मनःशांती लाभते. शांतादुर्गा फातर्पेकरीण या सात बहिणी व एक भाऊ. सर्वात मोठी श्रीदेवी फातर्पेकरीण, देवी कुंकळ्ळीकरीण, बाळ्ळीकरीण, किटलकरीण, वेरोडेकरीण, शेल्डेकरीण, सलदोडेकरीण (आसूंथआ सायबिण) व भाऊ खंडेराय. त्यापैकी फातर्पेकरीण, कुंकळ्ळीकरीण व बाळ्ळीकरीण यांच्यात सोयरीक निषिद्ध मानली जाते.

श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवीचे आदिस्थान दिवाडी नावेली-गोलती गाव आहे. चौदाव्या शतकात गोव्यावर मलीक कपूर, महंमद तुघलक, बहामनी हसन यासारख्या मुस्लिमांची आक्रमणे होतच राहिली. ते हिंदूंची मंदिरे तोडून फोडून टाकत होते. हिंदूंचा छळ करीत. त्यामुळे दिवाडी येथील सावंत व नाईक कुटुंबीय आपली दैवते घेऊन दक्षिण गोव्यात आले व मोरपिर्ला येथे स्थायिक झाले. सोळाव्या शतकात व्यापाराच्या नावावर धर्म परिवर्तन करण्यासाठी आलेल्या फिरंग्यांनी एका हातात खुरीस व दुसऱ्या हातात तलवार घेऊन आपले खरे स्वरूप दाखवायला सुरुवात केली. या सुमारास आपली देवदैवते घेऊन ते फातर्पा येथे राहावयास गेले. त्या वेळेपासून देवीला फातर्पेकरीण म्हणून ओळखू लागले. या देवस्थानातील पंचायतन देवतांमध्ये श्री सप्तकोटेश्वर, सिद्ध-माधवनाथ, नारायण, कालभैरव, हनुमान, जल्मी पुरुष,  भूमी पुरुष, पंचा पुरुष आदी दैवते आहेत.

शांतादुर्गा फातर्पेकरीण नवसाला पावणारे जागृत देवस्थान असा नावलौकिक असल्याने व तिचा कौल-प्रसाद तात्काळ अनुकूलता देतो अशी श्रद्धा असल्याने कौल प्रसादासाठी येथे भाविकांची गर्दी असते. मंदिरातील गर्भागाराबाहेरील लाकडी खांबाला तुंब्याची फुले लावून प्रसाद मागतात. उत्सवाच्या दिवसात, सोमवार, एकादशी, पौर्णिमा, अमावास्या या दिवशी प्रसाद बंद असतात. श्रावणात प्रत्येक सोमवारी रंगपूजा असते. येथे बाराही मास उत्सव चालूच असतात. नव्याच्या पंचमीच्या दिवशी नवीन पिकाचे कणसे कापून वाजत-गाजत मिरवणुकीने मंदिरात आणतात तेथे विधिवत पूजाअर्चा करून उपस्थितांना देतात. गावचे लोक घरोघरी प्रवेशद्वारावर त्याची उभारणी करतात.

अश्विन नवरात्रात इथे नऊ दिवस भरगच्च कार्यक्रम असतो. आश्विन शुक्ल प्रतिदेचा दिवशी मृत्तिकामिश्रित सप्तधान्यावर घटस्थापना केली जाते. रोज एक एक माळ घालण्याचा विधी असतो. या नऊ दिवसात वेगवेगळ्या रूपातून साजशृंगार केलेली देवीची रूपे पाहावयास मिळतात. रेणुका, कालीमाता, मनमोहिनी, भवानी, शष्टीमाता, शांताई, अष्टभुजा-नारायणी तर नवव्या दिवशी नवदुर्गा. रुजत घातलेल्या धान्याचे मोड प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी "बोमडामळ" या ठिकाणी पालखीतून देवीची मिरवणूक निघते.

पौष शुक्ल प्रतिपदेपासून सतत चार दिवस देवीची जत्रा असते. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाची पंधरा दिवस अगोदरच जय्यत तयारी सुरू असते. दुकाने, फेरी, खेळणी, सर्कसवाले, फूलवाले पंधरा दिवस ठाण मांडून बसतात. हजारो दर्शनार्थींच्या उपस्थितीमुळे इथे मुंगी शिरायला जागा नसते. या दिवशी रोज दुपारी रात्री महानैवेद्य असतो. पहिल्या दिवशी अभिषेक, लघुरुद्र, आरती, पुराण, कीर्तन, शिबिकोत्सव व रौप्य रथातून देवीची शोभा यात्रा निघते. दुसऱ्या दिवशी मयूरासन, तिसरा दिवस सूर्यरथ व चौथ्या रात्री महारथातून मिरवणूक निघते. मिरवणुकीनंतर नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम असतात. दारूकामाची आतषबाजी असते. रात्रीच्या वेळी विजेचा रोषणाईमुळे पृथ्वीवर जणू स्वर्गच अवतरल्याचा भास होतो. त्यानंतर देवीच्या नवीन वस्त्रांचा, सुवर्णालंकाराचा लिलाव असतो. देवीचा वर्षभरातील सर्वात शेवटचा उत्सव म्हणजे शिगमोत्सवातील तोपशो. फाल्गून शुक्ल अष्टमीपासून सुरू झालेल्या शिमगोत्सवात अष्टमीच्या दिवशी नवचंडी, नवमीस पिंडीकोत्सव, पालख्योत्सव व रात्री पारंपरिक मांडावर नमन घालून देवदेवतांची प्रार्थना केली जाते. त्रयोदशीपर्यंत मांडावर तालगडी, रोमट, टाळो वगैरे खेळ असतात. "घुमचे कटर घुम" च्या निनादात सारा फातर्पे गाव जल्लोषाने नाचत असतो. या दिवसात गडे, दिवजोत्सव, धिंड्याभोवरी असे विविध पारंपरिक विधी साजरे केले जातात. चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी चार वाजता शृंगारलेल्या शिबिकेचे तळीकडे प्रस्थान केले जाते. मैदानावर गुलाल उधळून रंगपंचमी साजरी केली जाते. गुलालोत्सव साजरा करुन "तोपशो" कार्यक्रम पार पाडला जातो. सापसेच्या काठ्यांना पोंगऱ्याच्या मुठी बांधुन त्यांची वाटणी असते. त्यानंतर बाराजणांत होलिकादहन होते. शेवटी देवीची पालखी अग्नीतून जाते व शिमगोत्सवाची सांगता होते. फातर्पे मंदिराच्या परिसरात दिवाडीहून आणलेली नागिनीची झाडे आहेत. याला बाराही महिने बारीक नागली आकाराची फुले फुलतात. या झाडाच्या पानांचा रस सर्पदंशावर उपयोगी पडतो.