औरंगाबाद येथून संशयित ताब्यात; चौकशी सुरू

मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट व्हॉट्सअॅप अकाऊंट प्रकरण


18th June 2022, 12:00 am
औरंगाबाद येथून संशयित ताब्यात; चौकशी सुरू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र वापरून बनावट व्हॉट्सअॅप अकाऊंट उघडून राजकीय नेते आणि नागरिक यांना संदेश पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी गुन्हा शाखेच्या सायबर विभागाने औरंगाबाद-महाराष्ट्र येथून सय्यद ईजाझ (४२) या संशयिताला ताब्यात घेतला आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे सचिव अजित राॅय यांनी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, ९५२९७९३३७७ या क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र वापरून बनावट व्हॉट्सअॅप अकाऊंट उघडून १४ जून रोजी राजकीय नेते आणि नागरिक यांना ‘अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करून पाठवावे’, असा संदेश पाठवला होता.
यासंदर्भातील तक्रारीची दखल घेऊन सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी अज्ञाताविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ सी नुसार गुन्हा दाखल केला करून तपास सुरू केला. या दरम्यान संशयित औरंगाबाद परिसरात असल्याची माहिती विभागाला मिळाली. त्यानुसार, विभागाचे अधीक्षक निधीन वालसन आणि सहाय्यक अधीक्षक शिवेंदु भूषण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश गावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाला बुधवारी औरंगाबादला रवाना करण्यात आले. त्यानंतर पथकाने गुरुवारी (दि.१६) संशयिताला ताब्यात घेऊन शुक्रवारी सकाळी गोव्यात आणले. त्यानंतर विभागाने त्याचा मोबाईल जप्त करून त्याची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केली.                                

हेही वाचा