संशयिताचे कृत्य सीसीटीव्हीमध्ये झाले होते कैद

वाळपई : होंडा येथील प्रसिद्ध नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताने केलेले कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. मात्र, संबंधित संशयित हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्याचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये या उदात्त हेतूने देवस्थान समितीने त्याच्याविरुद्धची तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देवस्थान समितीचे अध्यक्ष रोहिदास सातार्डेकर, पदाधिकारी रमेश म्हाऊसकर आणि सचिन पाटील उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी नवनाथ मंदिराच्या परिसरात एक संशयित व्यक्ती वावरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आला होता. त्याने मंदिराची फंडपेटी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यात यशस्वी झाला नाही. या घटनेमुळे भाविकांमध्ये आणि होंडा परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षिततेचा उपाय म्हणून समितीने सुरुवातीला वाळपई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही भाविकांनी स्वतःहून या प्रकरणाची चौकशी केली असता, संशयित मुलगा हा अल्पवयीन असल्याचे समोर आले.
संशयित मुलगा लहान आहे, पोलीस कारवाईमुळे त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे केवळ माणुसकीच्या दृष्टिकोनातून आम्ही हा विषय सामोपचाराने मिटवण्याचे ठरवले आहे, असे अध्यक्ष रोहिदास सातार्डेकर यांनी स्पष्ट केले.
समितीने ही तक्रार मागे घेतानाच, पोलिसांनी संबंधित मुलाचे योग्य समुपदेशन करावे आणि भविष्यात त्याच्याकडून अशा चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी विनंतीही केली आहे.
पोलिसांनी गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी
नवनाथ मंदिर हे श्रद्धास्थान असून येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ असते. या चोरीच्या प्रयत्नानंतर नागरिकांनी परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल.