नदी झोपते

रानवनात पुन्हा एकदा परकरी पोरीसारखी झरा होत माहेरच्या अंगणात नाचणारी नदी. स्त्रीने प्रपंचात प्रत्येक माणसाशी नातं जोडावं आणि नदीने वाटेत येणार्‍या प्रत्येक गावाशी.

Story: ललित | नेहा उपाध्ये |
11th June 2022, 12:23 am
नदी झोपते

पुलावर गाडीचा वेग कमी झाला. पुलाखाली समुद्राची धीर गंभीरता असणारी "काळी" नदी. तिच्या विशाल व्याप्तीमुळे किनाराही अंग चोरून बिचकत उभा असावा. साड्यांच्या दुकानात बर्‍याच साड्या पाहून एखादा नाजूक काठाचा पण भरीव नक्षीकाम असलेल्या अंगाचा शालू नजरेस येऊन बायकांनी डोळे विस्फारावे तसं सगळे नदीकडे पाहत होते. मनात अशा कवि कल्पनांची दाटी होत असताना एका गोड आवाजाने या गर्दीत शिरकाव केला " आणि नदी झोपते!"  गाडीत सगळे "नदी वाहते " हे वाक्य नदी खळखळते, नदी धावते, नदी  प्रवाहित होते असे  शब्दप्रयोग करुन बघत असताना लहानग्या पाच- सहा वर्षाच्या मनूनं  " नदी झोपते! "असं म्हणताचं मी अवाक् झाले. नकळत दोनच शब्दात ती खूप काही बोलली. कित्येक कवितेतून, निबंधातून, पेपरवरच्या लेखातून तेच तेच नदीचं वर्णन आपण चघळत होतो, त्या सगळ्या  विचारांच्या क्षणात ठिकर्‍या झाल्या होत्या. नदी झोपते ! 

नेहमी समुद्राच्या ओढीने पळणारी नदी कधीतरी  उसंत घेत असेल का? समुद्रासाठी पळणारी नदी म्हणजे घरातली बाईमाणूस. सतत सासरची काळजी करणारी, घरभर वावरणारी आणि माहेरी आईच्या मांडीवर डोकं टेकवून सुख दुःख सांगणारी नदी. रानवनात पुन्हा एकदा परकरी पोरीसारखी झरा होत माहेरच्या अंगणात नाचणारी नदी. स्त्रीने प्रपंचात प्रत्येक माणसाशी नातं जोडावं आणि नदीने  वाटेत येणार्‍या प्रत्येक गावाशी. ती जुन्या नात्यांची शाल अंगावर लेऊन नवी नाती विणते.

सासर आणि माहेर दोन्ही घरांचं कल्याण करते म्हणून स्त्रीला आपण दुहिता म्हणतो. पण नदी मात्र रानातून, खेड्यापाड्यातून, शहरातून, नाल्यातून, आगरातून वाहताना सार्‍यांचं हित साधत जाते. 

ज्याची त्याची होऊन जाते नदी.  कड्या कपारीतून ठेचकाळत, मैलोन् मैल पायी तुडवत थकून काठावर गर्द रानी नदी शांत पहुडलेली असेल का? काठाच्या मांडीवर डोकं टेकवून वर झाडं पाहता पाहता नदीचा डोळा लागवा आणि थंड सावलीने थोपटावं, वार्‍याने शीळ घालत तिच्यासाठी अंगाई गुणगुणावी. कोण बरं असं तिला जोजवत असेल? 

गजबजलेलं गावं झोपी गेलं की नदी सुद्धा उसासा टाकते अन् विश्रांती घेते की डोळे सताड उघडे ठेवून झोपेची वाट पहाते ? पुलावरची नेत्रदीपक रोषणाई, रंगीबेरंगी प्रकाशाने आकाशही व्यापून टाकणार्‍या नौका नदीला आपल्या रंगात रंगवतात. काठावर दिमाखात झळकणाऱ्या जाहिराती अन् शहरातील गाड्यांच्या प्रखर डोळ्यांचे उमटलेले प्रतिबिंब. चंद्रालाही स्वतःच प्रतिबिंब  न्याहाळता येऊ नये एवढ्या रंगात नदी रंगून जाते. नदी कधी बरं डोळे मिटत असेल?  लेकरू परिक्रमा करत असताना नर्मदामैया झोपी जात असेल? परिक्रमावासीचं बोट धरून त्याला ती परिक्रमा घडवताना नर्मदामैय्याला क्षणभर उसंत मिळत नसावी. युगानुयुगे गंगा पापक्षालन करताना कधी घाटावरती तिने विसावा घेतला नाही. नदी आईच्या मायेने जगासाठी झटत राहिली.  पण गजबजलेल्या शहराला सांगावसं वाटत आता जरा दिवे मालवा, नौकांनो थोडा नदीचा तीरसुध्दा पहा, चंद्रा तुझे हे भरती ओहोटीचे खेळ काही प्रहर थांबव बरं!  पुन्हा कधीतरी गाडी पुलावरून जाईल आणि मनुसोबत सारे म्हणतील ती पहा नदी झोपलीये !