निमित्त हार्दिक... काँग्रेसमध्ये तरुण रक्ताची घुसमट कायम !

Story: राज्यरंग | नीलेश करंदीकर |
24th May 2022, 01:13 am
निमित्त हार्दिक... काँग्रेसमध्ये तरुण रक्ताची घुसमट कायम !

गुजरातमधून हार्दिक पटेल व बिहारातून कन्हय्या कुमार हे नवे विचार घेऊन राजकीय क्षितीजावर झेप घेऊ पाहणारे तरुण म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले. विशेष म्हणजे केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या कार्यप्रणालीला त्यांनी वेळोवेळी कृतीतून विरोध दर्शवला. पण, राजकारणात राहून अंगी व्यावसायिकता मुरली की काळाच्या प्रवाहात अनपेक्षित बदलही घडून येतात. डाव्या विचारसरणीचे कन्हय्या कुमार सप्टेंबर २०२१ मध्ये काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर गेली तीन वर्षे काँग्रेससोबत राहून गुजरातेत पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष  म्हणून जबाबदारी सांभाळणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी एकाएकी ‘हात’ सोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गुजरात विधानसभा निवडणुका अवघ्या ६ ते ७ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना काँग्रेससाठी हा ‘हार्दिक’ धक्का मानला जात आहे. 

‘गुजरातमध्ये पुढची २० वर्षे काँग्रेस जिंकू शकणार नाही. पंतप्रधान मोदी जर गुजरातचे असतील तर त्यांचा राग उद्योगपती अदानी, अंबानींवर का काढता’, असा पटेल यांनी सवाल केला आहे. यावरून कधीकाळी मोदींना प्राणपणाने विरोध करणारे हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करतील, या शक्यतेला बळकटी मिळत आहे. 

 गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय उलथापालथी सुरू झाल्या आहेत. पटेल यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देखील त्यातील एक झलक! महत्वाची बाब म्हणजे, हार्दिक यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली सगळी खदखद मांडली आहे. काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्वाचे एकूणच पक्ष आणि कार्यकर्ते यांच्याकडे लक्ष नाही आणि गुजरात काँग्रेस नेते या नेत्यांसाठी चिकन सँडविचची व्यवस्था करण्यातच अधिक गुंतलेले असतात, अशी टीका पटेल यांनी केली आहे. त्यावर काँग्रेसने कानावर हात घेत हे सर्व भाजपनेच घडवून आणले आहे आणि पटेल भाजपात जाणार, असा तत्काळ आरोपही केला.  पटेल हे काही दिवसांपासून अस्वस्थ होतेच. नरेश पटेल की ज्यांची  प्रभावी पाटीदार नेता अशी ओळख आहे, त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू होताच हार्दिक यांच्या मनातील खदखद ओठी आली आणि राजीनाम्याची कृती घडली. उदयपूर येथील काँग्रेसच्या चिंतन शिबिरालाही पटेल उपस्थित नव्हते. तसेच अलिकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुजरातचा दौरा केला तेव्हा पटेलना भेट देण्याचे त्यांनी नाकारले होते. जाहीर सभेत राहुल गांधींनी जिग्नेश मेवानी यांचे कौतुक केले; पण हार्दिक पटेल त्या सभेला उपस्थित असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यातून पटेल आणि काँग्रेस यांच्यात काहीही सुरळीत नाही हे दिसून आले. 

पाटीदार समुदायाला आरक्षण मिळावे यासाठी २०१५ मध्ये गुजरातमध्ये पटेल यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. त्याचे तरुण नेतृत्व अनेकांना भावले. २०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत पटेल यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रचाराला पाठिंबा दिला. त्यामुळे गुजरातमध्ये अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला धक्काही बसला. भाजपला निसटते बहुमत मिळाले होते.  

गेल्या काही वर्षांत काँग्रेसमध्ये विधायक परिवर्तन तर नाहीच, पक्ष अधिकच रसातळाला जात आहे. गांधी घराणे आणि त्यांचे शागिर्द या फेऱ्यात निष्ठावान काँग्रेस नेत्यांचे खच्चीकरण होत आहे. हार्दिक पटेल यांनीही तसेच आरोप केले आहेत. २०१४ पासून अनेक तरुण नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. ज्योतिरादित्य शिंदेसारख्या आश्वासक नेत्याने भाजपची वाट धरली. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्माही हेही काँग्रेसमधूनच भाजपत गेले. एकीकडे तरुणांना वाव देण्याचे धोरण स्वीकारल्याचे काँग्रेसने जाहीर केले असताना हार्दिक पटेल काँग्रेसमधून बाहेर पडतात, याचा अर्थ काय? काँग्रेसमधील तरुण नेते अस्वस्थ आहेत हे सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री गहलोत यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून स्पष्ट होते. हार्दिक पटेल यांना राजकीय पटलावर स्वत:ला नक्कीच सिद्ध करावे लागेल, हे खरेच आहे; पण त्यासोबत तरुण रक्ताची काँग्रेसमध्ये घुसमट होत आहे, हे देखील या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.