आशिया चषक : भारताने विजयाची संधी गमावली

अखेरच्या क्षणी पाकिस्तानचा गोल : सामना १-१ बरोबरीत


23rd May 2022, 11:45 pm
आशिया चषक : भारताने विजयाची संधी गमावली

जकार्ता : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सोमवारी झालेला सामना चांगलाच रंगला. भारताने सुरुवातीपासूनच दमदार खेळ केला आणि सामन्यावर वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले होते. अखेरची पाच मिनिटे शिल्लक असतानाही भारताकडे दमदार आघाडी होती. भारताने ही आघाडी अखेरचे दोन मिनिटे असेपर्यंत कायम ठेवली होती. पण, सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना पाकिस्तानच्या अब्दूल राणाने गोल करत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली आणि भारताने विजयाची संधी गमावली.

सामन्याच्या ८ व्या मिनिटालाच भारताकडे गोल करण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. भारताला आठव्या मिनिटाला पेनेल्टी कॉर्नर मिळाला. यापूर्वी भारताने तीन कॉर्नरवर गोल करण्याची संधी गमावली होती. पण, यावेळी मात्र भारताने संधी सोडली नाही. या सामन्यात पदार्पण करण्याची करण्याची सेल्वम कार्थीला देण्यात आली होती आणि त्याने या संधीचे सोने केल्याचे पाहायला मिळाले. कारण सेल्वमने या पेनेल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केले आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
भारताला पहिल्याच सत्रात आघाडी मिळाली आणि त्यानंतर पाकिस्तानने जोरदार आक्रमण करत बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. पण, पहिल्या सत्रात भारताने पाकिस्तानचे आक्रमण थोपवून लावले. दुसऱ्या सत्रातही पाकिस्ताने भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण, भारताच्या संघाने यावेळी दमदार बचाव करत पाकिस्तानचे आघाडी घेण्याचे प्रयत्न हाणून पाडले. तिसऱ्या सत्रात भारताला एक मोठा धक्का बसला. कारण यावेळी भारताच्या कर्णधाराला ग्रीनन कार्ड दाखवण्यात आले आणि तो संघाबाहेर गेला. त्यावेळी पाकिस्तानकडे गोल करून सामन्यात बरोबरी करण्याची चांगली संधी होती. पण, यावेळी भारताने बचावावर अधिक भर दिला आणि पाकिस्तानचे तिसऱ्या सत्रात गोल करण्याच स्वप्न बेचिराख केले.
दुसऱ्या हाफमध्ये पाकिस्तानने आक्रमक खेळ केला आणि तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळवला. पण, रिजवान अलीचा शॉट बाहेर गेला. काही मिनिटांनी भारतीय गोलकीपर सूरज करकेराने अब्दुल राणाचा जवळचा शॉट वाचवला आणि रिबाऊंडवरही अफराजलाही गोल करू दिला नाही. भारतासाठी राजभर आणि उत्तम सिंग यांनी संधी तयार केल्या, पण पाकिस्तानी गोलकीपरने त्यांना यश मिळवून दिले नाही.
अखेरच्या क्षणांमध्ये भारतीय टीमला एकाग्रता भंग झाल्याचा फटका बसला आणि पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. गोल लाईनवर यशदीप सिवाचने बचाव केला. पण, राणाने रिबाऊंडवर गोल करून पाकिस्तानला बरोबरी करून दिली. दरम्यान, टीम इंडिया आपला पुढचा सामना २४ मे रोजी जपान आणि २६ मे रोजी इंडोनेशियाविरुद्ध खेळणार आहे.

भारत या स्पर्धेचा प्रबळ विजयी दावेदार
- यापूर्वी २१ डिसेंबर २०२१ रोजी खेळल्या गेलेल्या एशियन चॅम्पियन्स स्पर्धेत टीम इंडियाने पाकला ४-३ने धूळ चारली होती. वीरेंद्र लाकडाच्या नेतृत्वातील टीम इंडिया स्पर्धेची विजयाने सुरुवात करण्याची इच्छा होती. पण, ती पूर्ण झाली नाही. भारत या स्पर्धेचा प्रबळ विजयी दावेदार आहे.
- भारत आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी ३ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. भारताने २०१७ साली अखेरचे विजेतेपद ढाका येथे मलेशियाचा पराभव करून मिळवले होते. त्यामुळे या आशिया चषकात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.