पति देवराया जातं मांडिलं तुम्हां गाया

जात्यापाशी औक्ष मागणाऱ्या स्त्रीचे दर्शन घडते. नवऱ्याने केलेल्या प्रत्येक कामाचे ती कौतुक करते. दळताना त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

Story: जात्या माज्या ईस्वरा | सरोजिनी भिवा गा |
21st May 2022, 09:04 pm
पति देवराया जातं मांडिलं तुम्हां गाया

पुरुषाचे जीवन फुलण्यासाठी, बहरण्यासाठी त्याचे स्वतःचे कष्ट, परिश्रम, स्वतःवरील विश्वास तसेच कौटुंबिक परिस्थिती कारणीभूत असते; तर स्त्रीचे जीवन बहरण्यासाठी माहेराबरोबरच सासरही खूप जबाबदार असते. मग सासरची माणसे तर त्यात असतातच पण त्यात तिच्या नवर्‍याची भूमिका फार महत्त्वाची असते कारण तो तिचा जीवनाचा साथीदार असतो. लग्नाच्यावेळी पवित्र अग्नीच्या साक्षीने एकमेकाची कोणत्याही परिस्थितीत साथ देण्याची त्यांनी शपथ घेतलेली असते. माहेरी त्या स्त्रीला जितके सुख, आनंद, समाधान मिळालेले असते त्याहीपेक्षा अधिक सुखी ठेवण्याची प्रतिज्ञा जणू प्रत्येक पुरुष लग्नावेळी घेत असतो. म्हणून वैवाहिक जीवनातील प्रारंभीचे दिवस सुखद, गुलाबी रंगाचे असतात ते कायमचे तसेच रहावेत हीच प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. सुरुवातीच्या काळात ती स्त्री माहेर व सासरची तुलना करते. दळायला बसल्यावर दोन्ही कुटुंबांसाठी सुख मागते. दळताना सुपातील धान्य जरी संपले तरी ती संपले म्हणत नाही. ती म्हणते तिचे माहेर व सासर धनधान्याने परिपूर्ण आहे. दोन्हीकडचे मोठेपण जात्यापाशी व्यक्त करताना म्हणते,

सरलं दळन ग, बाई सरलं म्हनू कशी 

सासर माह्याराच्या भरलेल्या दोनी राशी ॥

सरल दळन ग, सूप सारीते पलिकडे 

सासर माह्यार, सूक मागीते दोनीकडे || 

सरल दळन ग सरलं म्हनू न्हायी 

सासर माह्यार ग सुक नांदत ग सई ।|

अशाप्रकारे इंदिरा संतानी 'मालन गाथा' या पुस्तकातून जात्यावरील ओव्यातून सासर व माहेरचे तितक्याच बरोबरीने वर्णन केलेले आहे. तरीपण लग्नानंतर माहेर थोडेसे विसरणे व सासरची ओढ लागणे हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच लग्नगीतातही त्याचे समर्पकपणे वर्णन केलेले नकळतपणे तिला सासरच्या माणसाची ओढ लागते आणि महिरची माया, प्रेम कमी होते. सासरी रमण्यासाठी व संसार सुखाने करण्यासाठी ते फार आवश्यक असते. अनोळख्या व्यक्तिबरोबर ती स्त्री एकरूप होऊन जाते. जात्यापाशी औक्ष मागणाऱ्या स्त्रीचे दर्शन घडते. नवऱ्याने केलेल्या प्रत्येक कामाचे ती कौतुक करते. दळताना त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

सरलं दळन ग माझी उरली वंजयीळ

कंथ माझा देवळात  करी भजन मंजूयीळ |

सरलं दळन ग आल सुपायया कोनायाला

औक्ष मी ग मागी माझ्या जात्याच्या धनीयाला||

नवरा व बायको ही संसाररूपी रथाची दोन चाके असतात. ही दोन्ही चाकं एकमेकांना समजून घेत, एकमेकाच्या सुखात आणि दुःखातही सहभागी होत व्यवस्थित चालली तरच तो संसाररूपी रथ सुरळीत चालतो. प्रत्येक विवाहित स्त्री आपले सौभाग्य चिरकाल टिकावे याचसाठी सकाळ - संध्याकाळ देवासमोर, तुळशीसमोर प्रार्थना करत असते. त्याचा उल्लेख धालो, फुगडीसारख्या विविध लोकसाहित्य प्रकारातून आपल्याला वाचायला मिळतो. दळायला बसल्यावर सुध्दा आपल्या सौभाग्याची प्रार्थना जात्यावरील ओव्यातून जात्यापाशी व्यक्त करायला स्त्री विसरत नाही,

सरलं दळनं ग पीठ भरुन बाई ठेवू 

माझा गं भरतार धनी जात्याचा सूखी रावू ।

 सरलं दळन ग हात जात्याला जोडीते

माझ्या ग कंथाला ग औक्ष मागून उठीते । 

ज्या संसारात नवरा बायको एक दुसऱ्याच्या सावलीप्रमाणे राहतात, आचारविचाराने एकमत असतात तिथे कधीही वाद-विवाद होत नाहीत. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नवऱ्याला देवाचे स्थान दिलेले आहे. ज्यांना त्यांची साथ जन्मभर लाभते त्या स्त्रिया भाग्यवान समजल्या जातात. नवर्‍याशिवाय स्त्री आपले जीवन अपूर्ण समजते. स्त्री कितीही आत्मविश्वासू, आत्मनिर्भर असली तरी नवर्‍याशिवाय ती स्वतःला असुरक्षित समजते.

सवाशीण स्त्री हे देवीचे रुप मानले जाते. कोणत्याही देवकार्यात तिचा पहिला मान असतो. म्हणून प्रत्येक स्त्री उगवत्या सूर्यनारायणाकडे आपले सौभाग्य चिरकाल टिकण्यासाठी प्रार्थना करते. पूर्वी स्त्रिया सकाळी उठल्याबरोबर केस विंचरून कपाळाला कुंकवाचा ठसठशीत टिळा लावायच्या व नंतर अंगणातील, घरातील केरकचरा काढून, मातीची जमीन शेणाने सारवून त्यावर पिठाची रांगोळी घालायच्या. मग देवपूजा व्हायची त्यामुळे घरामध्ये मंगलमय, संस्कारमय वातावरण निर्माण व्हायचे. पहाटे उठून दळायला बसल्यावर त्या स्त्रिया जात्याला सांगायच्या,

उगवल नारायीन तांबडी तेची काया 

लाडकी माझी सया कुंकू मागती ग लेया

उगवल नारायीन उगवता ऊन पड

सया माझ्या मालनीच्या कुंकवाला तेज चढल